“जातों मी.”
“माझी माळ ? ती परत ना देत होतेत ?”
“ती मी ठेवीन.”
“वाळली तरी ? सुकली तरी ?”
“हो.”
“वेडेच दिसतां.”
कल्याण व त्याचे मित्र हंसत निघून गेले. संध्या तेथेंच उभी होती. कल्याणनें मागें वळून पाहिले. तरी संध्या तेथेच. कल्याणचे मित्र हंसले. तो लाजला, रागावला, गंभीर झाला. तो बोलेना.
“कल्याण, का बोलत रे कां नाहींस ?”
“तो आतां कशाला बोलेल !”
“तो आजचा विजयी वीर आहे.”
“किती पदकं मिळालीं. “
“---आणि ढाल !”
“---आणि शेवटीं सुंदरशी माळ !”
“कल्याण, काढ की ती माळ आतां गळयांतून.”
“अरे, ती कांहीं लग्नाची माळ नाहीं.”
“परंतु कल्याणला लग्न मुळीं करायचंच नाही.”
“आणि एवढयांत का लग्न ?”
“कल्याणचं सोळासतरा वर्षांच वय.”
“अभिमन्यू लग्नांत सोळा वर्षांचाच होता.”
“कल्याण, बोल ना रे !”
“तूं का खरंच पुण्याला जाणार आहेस ?”
“सांग ना रे !”
“काय सांगू ?” कल्याण शेवटीं एकदांचा बोलला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.