३
शाळेवर झेंडे
१९३० चा सत्याग्रह सुरू होता. देशभर प्रचंड चळवळ सुरू झाली होती. खेडींपाडींहि उठली. मग पुण्यासारख्या शहरांत किती उत्साह असेल त्याची कल्पनाच करावी. एक प्रकारचे नवतेज राष्ट्रांत संचरलें होते. पुण्याला पेठांपेठातून स्त्री-पुरुषांच्या, मुलांमुलींच्या प्रचंड प्रभातफे-या निघत होत्या.
“विश्वास, माझ्या शाळेवर आज मी झेंडा लावणार आहे. काय होईल तें होवो. येऊन जाऊन काय करतील, शाळेंतून काढून टाकतील. टाकू दे काढून. त्याची कशाला हवी भीति.”
“कल्याण, तुझ्या शाळेवर तूं लाव. माझ्या शाळेवर मी लावीन.”
“विश्वास, तूं नकोस या फंदांत पडूं. तुझ्या घरीं कळलं तर वडील तुला बोलतील, मारतील.”
“बोलणीं ऐकायची व मार खायची मला संवयच आहे. त्यावरच हा विश्वास पोसला आहे. त्यांत नवीन काय आहे ?”
“विश्वास, किती रे तुला कष्ट ! सकाळीं चार वाजतां उठायचं; गाईम्हशींचं शेण काढायचं. दुधं काढायचीं. तीं वांटायचीं. क्षणाची तुला विश्रांति नाहीं. ज्या वयांत वाढायचं, त्या वयांतच तुझी आबाळ. शेणाचे डाग पडलेले कपडेच अंगांत घालून तुला शाळेत जावं लागतं. ना रिठे, ना साबण. विश्वास, तूं बंड कां करीत नाहीस ?”
“बंड करून कुठं जाऊं ?”
“आणि त्यांत पुन्हां तुझी सावत्र आई.”
“कल्याण, माझी आई सावत्र असली, तरी सख्ख्या आईपेक्षां ती माझं अधिक करते. तिला नको नाव ठेवू. ती आधीं मला खाऊ देते व मग स्वत:च्या मुलांना देते. ती माझ्यासाठीं रडते. वडील मला मारू लागलें तर तिच्या डोळयांना धारा लागतात. सावत्र आईला कोणीं नाव ठेवलीं तर मला संताप येतो. सावत्र आईची निंदा करायची रूढीच पडली आहे !! “
“विश्वास, तुझी सावत्र आई अपवाद समजूं. दुस-यांच्या मुलांवर प्रेम करणं सोप नाहीं. आपल्या मुलांच्या इस्टेटींत उद्या भागीदार होणारी सावत्र मुलं कोणाला बघवतील ? हा मनुष्यस्वभाव आहे. मनुष्यस्वभावाला ओलांडून पलीकडे जाणारी तुझ्या आईसारखी एखादीच थोर स्त्री असते. परंतु तो नियम नाहीं.”
“तें जाऊं दे. माझी कर्मकथा पुरे. शाळेवर आज झेंडे लावायचे.”
“विश्वास, मी लावीन. परंतु तूं नको लावूस हेडमास्तरांनी मारल तर मी डरणार नाहीं. मी तालीमबाज आहे. तुला मार सोसवणार नाहीं.”
“परंतु घरीं मार खायची सवय असल्यामुळ माझ हे लहानस शरीर माराला कधीं भीत नाहीं. आणि कल्याण, मीं आज झेंडा लावायची प्रतिज्ञाच केली आहे. हरिणीजवळ मीं तसं म्हटलंसुध्दां.”
“केव्हां ?”
“आज सकाळीं दूध घालायला हरिणीकडे गेलो तो तिच्या हातांत झेंडा होता. मीं तिच्याजवळ मागितला. तिनं विचारलं, कशाला ? सांगितलं, कीं शाळेवर लावायचा. तिनं पटकन दिला.”