“बाबा, तुम्ही तर आज मला प्रकाश देत आहांत. तुम्ही मला देव देत आहांत, दिवा देत आहांत; ध्येय देत आहांत. बाबा, तुमच्या मनांत रोज कोणते विचार चालत असतील त्याची थोडी कल्पना मला अलीकडे येऊं लागली होती. तुम्ही जणू रोज देवाजवळ बोलत असतां, होय ना ? बाबा, मी अजून लहान आहें. तुमचं सारं बोलणं मला नीट समजत नसलं, तरी तें मला आवडतं. गाणं समजत नसलं तरी मला गोड वाटतं, ऐकावंसं वाटतं. नाहीं बाबा ? बोला, मजजवळ बोला, खूप बोला. कुणाला माहीत कीं पुन्हां तुम्ही अस बोलाल कीं नाहीं तें ?”

संध्येचा आवाज सद्गदित झाला होता. ती थांबली. भीमराव म्हणाले, “चल बाळ, घरीं जाऊं. घरची मंडळी वाट पाहात असेल. आधींच घरांत दु:ख आहे. संध्ये, दुस-याला आपल्याकडून फार तकलीफ होणार नाहीं, असं वागावं या जगांत. दुसरं काय करतां येईल ?”

“होय बाबा; चला. आपण जाऊं. घरांत कसं सारं शोकमय आहे. कोणी हंसत नाहीं, बोलत नाहीं. आजी गेली. काका गेले. आणि घरांतील सारा आनंद गेला. खावंप्यावंसं वाटत नाहीं. कांही सुचत नाहीं. आजी गेली असं अजून वाटतहि नाहीं. काल रात्रीं मी अंगणांत उभी होतें. मी एकटीच होतें. आजी येते का मी वाट पाहात होते. “संध्ये, अशी अंधारांत तूं कां उभी ?” असं आजी येऊन मला म्हणेल असं वाटत होतं. परंतु कोणीं आलं नाहीं. बाबा, आजी कुठं गेली ? काका कुठं गेले ? कुठं असतील त्यांचीं मनं, त्यांचे आत्मे ?”

“संध्ये, त्यांची मनं, त्यांचे आत्मे आपणांमध्यें मिसळून गेले असतील. तुझ्यांत, माझ्यांत, आपणां सर्वांत त्यांचीं मनं शिरलीं असतील. कोणाला माहित ? सारे तर्क. त्यांच्या इच्छा, त्यांचे विचार, त्यांचीं ध्येयं आपणांजवळ आहेत. त्यांची स्मृति आपणांजवळ आहे. स्मृति म्हणजे मृतीवर विजय. स्मृतिरूपानं मनुष्य अमर होत असतो. आजीच प्रेम जीवंत असतांना तुम्हां सर्वांना मिळे. आतां तें जगांतील सर्वांना मिळेल. आजीचं मर्यादित प्रेम देह पडल्यानंतर अमर्याद झालं असेल. सर्वांच्या हृदयाला ऊब द्यायला गेलं असेल.”

“बाबा, प्रेमाची परीक्षा कशी करावी ?”

“आजीनं तुला कसोटी दाखवली आहे. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, त्यांच्या सुखानं आपण सुखी होतो. त्याच्यांत आपण आपलं स्वत्व जणूं विसरतो. आजीला स्वत:ची इच्छा नव्हती. काकांची आवड ती जणूं तिची. संध्ये, मी काय सांगू ? परंतु एक सांगतों. आपल्या प्रेमानं जगाचं नुकसान नये होतां कामा. एवढं जपलं पाहिजे.”

“बाबा, तुमचं आईवर प्रेम आहे ?”

“संध्ये, खरं सांगूं का, माझं कोणावरच तसं प्रेम नाहीं. एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे संकुचित होणं. परंतु झाड कुठंच जर मूळ धरणार नाही, तर त्याचा विकास तरी कसा होईल ? प्रेम कुठं तरी खोल करावं, म्हणजे त्याचा विकास होईल; कुठं तरी तें बांधूं, तरच तें वाढेल. तें पुढं शेंकडोंना छाया देईल. फुलफळं देईल. मला ही गोष्ट आज समजते. आहे. परंतु पूर्वी हें समजत नव्हतं. पूर्वी मला वाटे कीं एका व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे आत्म्याचा अपमान आहे. जे प्रेम सर्वांसाठीं ते एकाला कसं द्यायचं ? पण एकाला पोटभर देऊं तरच पुढं अनेकांना देतां येईल हो संध्ये.”

अशीं बोलणीं करीत दोघें घरीं आलीं. पित्याचा हात धरून पुत्री आली. घरांत सारीं वाट पाहात होतीं. पुंडलिकराव केव्हांच घरीं आले होते. भीमराव व संध्या यांनी उशीर केला म्हणून पुंडलिकाला राग आला होता.

“अप्पा, किती रे उशीर ! कांहीं काळवेळ आहे कीं नाहीं ! घरांत अशी परिस्थिति, आणि तुम्हांला फिकीर नाहीं. खुशाल आपली बाहेर गप्पा मारीत बसतां. आणि अप्पा, घर-कारभारांतहि तूं आतां कांहीं भाग उचलला पाहिजेस; मी एकटा काय काय करूं ?” पुंडलिक म्हणाला.

“पुंडलिक काळवेळ मीं ओळखली म्हणूनच आज फिरायला गेलों, व संध्येजवळ बोलून घेतलं. संसारांत माझं लक्ष नाहीं. कर्मांत पडणं म्हणजे डबक्यांत पडणं; मर्यादित होणं, स्थानबध्द होणं. माझा आत्मा कर्मांत रमायला भितो.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel