तें लहानसें पत्र संध्येला मिळालें. तें पत्र लहान होतें. परंतु महान् अर्थानें तें भरलेलें होतें. तें पत्र वाचून संध्या मुकाटयानें अश्रु ढाळीत बसली. ती का सुखासाठीं आसावली होती ? ती का खाण्यापिण्यासाठीं, नटण्या-मुरडण्यासाठीं हपापली होती ? परंतु ती शांत झाली. मनांत तर तिनें स्वत:चा विवाह कल्याणशीं कधींच लावून टाकला होता. त्या बाबतींत तिनें कांहीं न बोलण्याचें ठरविलें.

ती कल्याणच्या घरीं गेली. त्याचें घर विचारीत ती गेली. तों कल्याणच्या घरीं विचित्रच प्रकार तिला दिसला. कल्याणची आई रडत होती. कल्याणचे वडील तेथें होते. लहान रंगा बाहेर आला.

“कोण पाहिजे ?” त्यानें विचारलें.

“तुमचं नांव का रंगा ?”

“हो.”

“तुमच्याजवळ बोलायचं आहे, कल्याणचं पत्र आलं आहे.”

“थांबा, मी बाहेर येतों.”

रंगा व संध्या बाहेर बोलत बोलत भीमातीरीं गेलीं. भीमा वाहात होती. रंगा खिन्न होता.

“तुमच्या बंधूंचं तुरुंगांतून पत्र आलं आहे. त्यांची प्रकृति बरी आहे. तुमच्या घरीं खुशाली कळवायला त्यांनीं सांगितलं म्हणून मी आलें.”

“दादाला घरून जाऊन आतां तीनचार वर्षं होतील. तो घरीं आला नाहीं. मला त्याची फार आठवण येते.”

“सुटले म्हणजे बहुधा घरीं येतील.”

“तुमची त्यांची काय ओळख ?”

“अशीच मागं झाली. आमच्या गांवीं कुस्तीला आले होते. ते विजयी झाले होते. मीं त्यांना माळ घातली होती.”

“मला आठवते ती माळ. ती का तुम्हीं दिली होती ?”

“हो.”

“तुम्ही काय करतां ?”

“घरीं असतें, देवाची प्रार्थना करतें.”

“कोणासाठी प्रार्थना ?”

“तुमच्या दादासाठीं.”

“माझ्या दादासाठीं तुम्ही प्रार्थना करतां ! किती तुम्ही मायाळु, दयाळु.”

“तुमच्या घरीं आज खिन्नता कां होती ? तुमची आई-ती तुमची आईच असावी, रडत कां होती ?

“आईच ती.”

“कां रडत होती ती ? कल्याणचं पत्र नाही म्हणून. होय ना ? मुलगा सारखा तुरुंगात आहे याचं कुणाला वाईट वाटणार नाहीं ? माझ्यासारखी दूरची मुलगी रडते. मग आई-बापांना किती वाईट वाटत असेल ?”

“आईला दादाची आठवण येतेच. परंतु आज त्यासाठीं नव्हती रडत. दुसरंच एक कारण आहे. माझे बाबा एका वेश्येवर प्रेम करतात, आणि उद्यांपासून ते तिला घरींच आणून ठेवणार आहेत. आईच्या अंगाचा तिळपापड झाला. भांडण झालं. “तुला नसेल सहन होत तर चालती हो घरांतून” असं बाबा म्हणाले. आतां ती वेश्या घरीं येईल. आईला तिचं सारं करावं लागेल. तिचीं बोलणीं खावीं लागतील. काय काय नशिबीं असेल तें खरं ! मी तरी काय करूं ? मला सारखं वाईट वाटतं. दादा घरीं असता तर तो कांहीं करता. घर सोडून जावं असं मला वाटतं. प्रत्यक्ष डोळयांसमोर हें सारं बघवत नाहीं.”

“परंतु तुम्ही घरीं आहांत तेवढाच आईला आधार. तुम्ही नका जाऊं कुठं.”

“तुमचं काय नांव ?”

“संध्या.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel