“या ना आंत. केव्हां आलेत ?”
“आतांच आलों. “
“पुण्याहून ?”
“नाहीं, घरून आलों.”
कल्याण आंत आला. संध्येनें चटई घातली. दोघे बसलीं. मंदमधुर हंसत होतीं. एकमेकांकडें पाहात होतीं.
“काय करीत होतीस ?”
“वाचीत होतें.”
“मला बरं नसलं वाटत, म्हणजे वाचीत बसतें.”
“कोणतं आहे पुस्तक ?”
“कल्याणचीं पत्रं.”
“नवीन आहे वाटतं पुस्तक ? बघूं दे.”
“तें अद्याप हस्तलिखित आहे.”
“पाहूं दे.”
संध्येनें कल्याणचीं पत्रें आणून दिलीं. सुंदर रुमालांत तीं ठेवलेलीं होतीं. त्यावर फुलें वाहिलेलीं होतीं.
“हीं तर माझींच पत्र !”
“हेंच माझं विसाव्याचं पुस्तक.”
“तूं पहिल्यापासूनचीं माझीं सारीं पत्रं ठेवलीं आहेस ?”
“हो.”
“आई कुठं आहे ?”
“विहिरीवर. मी आणते बोलावून.” संध्या आईला बोलवायला गेली. आई आली.
“बरे आहांत ना ?”
“तुमच्या आशीर्वादानं बरा आहें.”
“चहा घेतां का ?”
“हो, घेतों.”
“आई, कल्याण जेवायलाच राहील.”
“परंतु आधीं चहा व कांहीं तरी त्यांना घेऊं दे.”
“मी घरींच जेवायला जाईन.”
“कल्याण, आम्ही का परकीं ?”
“परकेपणा असता तर मी आलों असतों का ?”
“मग राहाच. जेव व मग सावकाशपणं जा.”
कल्याणला नाहीं म्हणवेना. आणि आतां शाळा सुटली.
शरद् व अनु घरी आलीं. तीं कल्याण पाहात राहिलीं.
“ताई, कोण ग ?”
“ते तुरुंगांतले कल्याण हो.”
“हो का ?” अनु व शरद् एकदम म्हणालीं.
“आंघोळ करतोस ना कल्याण ? चल विहिरीवर. मी पाणी काढून देतें.”
“माझी आंघोळ झालेली आहे.”
“मग कामच आटोपलं. पण कल्याण, तो शर्ट दे काढून. तो धुऊन आणतें. मळला आहे. दे.”
कल्याणनें आढेवेढे घेतले नाहींत. त्यानें शर्ट काढून दिला. संध्येनें तो स्वच्छ धुऊन आणला व ती कल्याणला म्हणाली,
“दे घट्ट पिळून.”
“पण वाळेल का लौकर ?”