“हो. ऊन पाहा कसं पडलं आहे. माणसंहि वाळतील.”

“तूं उन्हांत बसूनच वाळलीस वाटतं ?”

“कल्याण, ताप का फक्त सूर्याचाच असतो ?”

“आणखी कसला असतो ?”

“सर्वांत असह्य म्हणजे मनस्ताप हो.”

पानें वाढण्यांत आलीं. सारीं जेवायला बसलीं. आई वाढीत होती.

“कल्याण, पोटभर जेव.” संध्या म्हणाली.

“हे लाजतात वाटतं ?”

“ते मुलगी आहेत वाटतं लाजायला ?” अनु म्हणाली.

“आणि मुली का लाजतात ? त्या माझ्यासारख्या पाहुण्यालाहि चिडवतात.” कल्याण हंसून म्हणाला.

“आणि तुम्ही का पाहुणे ?” अनूनें विचारले.

“पाहुणा नाहीं का मी ?” कल्याण म्हणाला.

“तुम्ही पाहुणे नाहीं. तुम्ही आमचेच. संध्याताई तुमच्या आम्हांला गोष्टी सांगते. नाहीं का रे शरद् ?”

“काय सांगते गोष्टी ?”

“एक आहे कल्याण, तो कुस्ती खेळतो. नदींत पोहतो. इंग्रजी शिकतो. पुण्याला राहतो. त्याला त्याचे काका छळतात. तो शाळेवर झेंडा लावतो. तुरुंगांत जातो. कधीं हंसतो, कधीं रडतो.”

“मी नाहीं बा रडत.”

“तुम्ही आतां मोठे झालांत. संध्याताईसुध्दां रडते.”

“जेवा रे. फार हवं तुम्हांला बोलायला.” आई म्हणाली.

“संध्याताई तुमचीं पत्रं वाचते व रडते. अशीं कशीं तुमचीं रडवणारीं पत्रं ? मी चुलींत टाकणार होतो तीं.” शरद् म्हणाला.

“ताई तुमच्याशीं लग्न लावणार आहे. आम्हांला आहे माहीत.” अनु म्हणाली.

“अनु ?” संध्या रागाने बोलली.

“भारी वाहावत चाललींत हो ! मार हवा वाटतं ?” आई म्हणाली.

“तुमचीं पत्रं ताईला रडवतात, मग तुम्ही किती रडवाल ? ताई, नको ग यांच्याशीं लग्न करूं !”

“मार हवा आहे तुम्हांला ?” संध्या म्हणाली.

“चिडली, ताई चिडली.”

“मोठीं माणसंसुध्दां चिडतात ?”

असें म्हणत शरद् व अनु उठून गेलीं. कल्याण जरा गंभीर झाला होता. संध्या पानावर स्वस्थ बसली होती. वातावरण बरें आहे असें पाहून संध्येची आई म्हणाली, “कल्याण, तुम्ही दोघं पानावर आहांत. समोर अन्न आहे. अन्न म्हणजे परब्रह्मच. मी तुम्हांला सांगतें कीं, संध्या तुमच्यासाठीं राहिली आहे. तिनं तसं स्पष्ट सांगितलं. भावजीं तिच्या लग्नाची खटपट करीत होते. एक चांगलं श्रीमंताचं स्थळ आलं होतं. परंतु संध्येनं स्पष्ट सांगितलं कीं, मीं मनानं कल्याणला वरलं आहे. कल्याण, संध्या तुमची आहे. तुम्ही काय तें ठरवा. संध्येचं जीवन सुखी करणं तुमच्या स्वाधीन आहे. मी काय सांगूं ?”

“आई, मी गरीब आहें.”

“मनानं श्रीमंत आहांत ना ? संध्येला आवडतां ना ?”

“नुसत्या प्रेमानं का पोट भरतां येतं, आई ?”

“गरीब का लग्नं करीत नाहींत ? संध्या दु:खी आहे. मी काय सांगूं ?”

“बरं, बघूं.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel