८
मॅट्रिकच्या मुलांसाठीं पत्रक
कल्याण पुण्याला आला. त्यानें एक लहानशी खोली घेतली. त्याची खोली म्हणजे चैतन्याचें केंद्र बनली. तेथें तरुण जमूं लागले. चर्चा होऊं लागल्या. विश्वासची परीक्षा जवळ आली होती. तरीहि तो तेथें येई. त्याची पूर्वीची वृत्ति पुन्हा वर आली. मध्यंतरीं आलेली सुखासीनता गेली. जणूं क्षणभर आलेलें तें पटल होते !
विश्वास व कल्याण दोघांनीं मिळून मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांत वांटण्यासाठीं म्हणून एक पत्रक तयार केलें. दोघांना ते आवडले.
“विद्यार्थी-बंधुभगिनींना :
तुमची परीक्षा होऊन तुम्ही पुन्हां आपापल्या घरीं जाल. आणि काय कराल ? निकाल लागेपर्यंत वाट पाहाल. खेळाल. निकाल लागल्यावर तुमच्यांतील थोडे उच्च शिक्षण घेण्यास येतील. बाकीचे नोकरी शोधूं लागतील. परंतु नोकरी आहे कोठें ? या देशांत बेकारी आहे. त्या बेकारींत तुमची भर पडेल. परंतु तुम्ही सुशिक्षित बेकार. ही बेकारी कां तें तुम्हीं समजून घेतलें पाहिजे. त्यासाठीं शेतकरी व कामगार यांची संघटना केली पाहिजे. ही संघटना करणारे सैनिक बना. त्यासाठीं ज्ञान मिळवा. स्वच्छ विचार मिळवा. ठिकठिकाणीं अभ्यासमंडळें सुरू करून त्यांतून नवे विचार मिळवा.
शहरांतील कामगार व खेडयांतील शेतकरी यांना जोडणारे तुम्ही जिवंत दुवे व्हा. खेडयापाडयांतील शेतक-यांत त्यांचे प्रश्न घेऊनच संघटना केली पाहिजे. कसणा-याची जमीन, पडित जमिनी लागवडीला आणूं, कर माफक करूं, अशा स्वरूपाचा प्रचार हवा. त्याभोंवतीं शेतकरी-गरीब शेतकरी उभा केला पाहिजे. लहान शेतकरी व शेतीवर कामें करणारे मजूर यांची संघटना केली पाहिजे.
तसेंच मोठमोठया जमिनी असणारे व खेडयांतून सावका-या करणारेहि आपण शेतकरी म्हणून सांगतात व शेतक-यांना झुलवतात. जातगोत दाखवतात. शेतकरी काय व कामकरी काय, सर्व श्रमणा-यांची जात एक. मग इतर जे असतील, ते कोठल्याहि जातीचे असोत, ब्राह्मण वा ब्राह्मणेतर, हिंदु वा मुसलमान, त्यांची जात एक. जगांत ह्या मुख्य दोन जाती आहेत. त्यांचा झगडा आहे. आजपर्यंत श्रमणारे नाडले गेले. त्यांनीं आतां संघटित झालें पाहिजे. ही संघटना आपण विद्यार्थ्यांनीं हे नवसमाजरचनेचे विचार फैलाविले. चीनमध्यें विद्यार्थ्यांच्या ६०० टोळया नाटकें, मेळे करीत सर्वत्र प्रचार करत्या झाल्या. आपल्याकडेहि असें प्रचाराचें वातचक्र सुरू झालें पाहिजे.
विद्यार्थ्यांनो, नवसमाजनिर्मिति करण्याचें आपलें भाग्य आहे. हिंदु-मुसलमान असल्या त्रेतायुगी विचारांत गुरफटूं नका. श्रमणा-याचा छळ कमी झाला पाहिजे, सर्वांचे संसार सुखाचे झाले पाहिजेत, या ख-या मानवी धर्माचे अनुयायी बनून आपण क्रान्तीचे अग्रदूत बनूं या. विचारांची ज्योत सर्वत्र पेटवूं या. आणि सारी गुलामगिरी भस्म करूं या.
समाजवादी समाजरचना झाली पाहिजे. तरच खरी संस्कृति जन्माला येईल. जोंपर्यंत हिंदुस्थानांत दहा कोटी लोक अर्धपोटीं राहात आहेत, तोंपर्यंत संस्कृति शब्द उच्चारणा-यांना पशु म्हटलें पाहिजे. कोठें आहे संस्कृति ? संस्कृति यावयाची आहे. ती आणण्याची पूर्ण तयारी आपण करूं या. शेतक-यांत, कामगारांत जा. त्यांना साक्षर करा. साक्षर करतां करतां नवीन विचार द्या. नवीन क्रान्तीचीं गाणीं द्या. सर्वत्र क्रान्तीचीं गाणीं घुमूं देत.
“भविष्य राज्य तुम्हारा मानो
ए मजदूरो और किसानो”
हे चरण सात लाख खेडयांतील तमाम श्रमणा-या जनतेच्या तोंडीं झाले पाहिजेत. हा नवमंत्र देणारे तुम्ही क्रान्तिकारक बना. हे आजचें कर्तव्य आहे. दुसरें नाहीं. आम्ही आशा राखतों कीं, तुम्हां सर्वांत ही ज्योत पेटेल, ही भावना उचंबळेल. तुम्ही डबक्यांतून बाहेर याल व इन्किलाबाची गर्जना कराल.”
अशा आशयाचें पत्र होतें. एका प्रसिध्द कामगार पुढा-याच्या मदतीनें त्यांनीं तें पत्रक छापून घेतलें. पुण्या-मुंबईला मॅट्रिकसाठीं आलेल्या मुलांत हजारों प्रती वांटल्या गेल्या. त्या पत्रकाखालीं विश्वास व कल्याण यांच्या सह्या होत्या. विद्यार्थ्यांनीं अधाशाप्रमाणें तीं पत्रकें वाचलीं. परंतु सरकारनेंहि तीं पत्रकें वाचलीं. त्या पत्रकाचा सारांश कांहीं वर्तमानपत्रांनीं दिला.
एके दिवशीं विश्वासचे वडील त्याला म्हणाले,
“विश्वास, तुझी त्या पत्रकावर सही आहे.”
“हो.”