“तुला मीं सांगितलं होतं कीं या फंदांत पडूं नको म्हणून.”
“हे वेडे फंद नाहींत. हें आम्हां तरुणांचं कर्तव्य आहे.”
“परंतु कर्तव्य गळयाला फांस लावील.”
“तुम्ही उगीच भितां. कांहीं होणार नाहीं.”
त्या दिवशीं प्रश्न तेवढाचं राहिला. जिकडे तिकडे आतां परीक्षा संपल्या होत्या. उन्हाळयाचे दिवस होते. कल्याण, विश्वास व त्यांचे आणखी कांहीं मित्र यांनीं पुणें जिल्ह्यांतील एका तालुक्याची शेतकरी परिषद् घेण्याचें ठरविलें. तुफानी प्रचार करावयास ते निघाले. उन्हातान्हांतून ते हिंडत होते. परिषदेचीं आमंत्रणें देत होते. त्यांना निरनिराळे बरेवाईट अनुभव येत होते. त्यांची ही पहिलीच वेळ. शेतक-यांत हिंडण्याफिरण्याची पहिलीच वेळ. शेतकरी उदासीन झालेला त्यांना दिसला. आपलें कोणी नाहीं या निराशेनें शेतकरी पडून राहिला होता.
एकदां एका गांवी कल्याण व विश्वास गेले होते. सायंकाळीं ते पोंचले. गांवांत सभा कोठें होते तें त्यांनीं मुलांना विचारलें. गाणीं गात त्यांनीं दवंडी दिली. पुन्हा घरोघर जाऊनहि त्यांनीं सांगितलें.
“बाप्पा, सभेला या हां.”
“हां, येऊं.”
येणार नाहीं असें कोणी म्हणालें नाहीं. त्या दोघांना वाटलें कीं खूप लोक येणार. कल्याण व विश्वास दोघे भुकेले होते. परंतु कोठें जेवणार ? उपाशींच सभेच्या ठिकाणीं ते गेले. दिवा कोठून आणायचा ? सभेची जागा घाण होती. दोघांनीं ती झाडली. नंतर ते दिवा मागूं लागले. दिवा मिळेना. शेवटीं एका घरीं एक कंदील मिळाला. पांचदहा मुलें होतीं. मोठी मंडळी कोणी दिसेना. विश्वास पुन्हां घरोघर बोलवायला गेला. “चला येतो.” लोक म्हणत; परंतु कोणी येईल तर शपथ ! शेवटीं निराशेच्या त्वेषानें विश्वासनें सभा सुरू केली. पहाडी आवाजांत त्यानें गाणें सुरू गेलें. मुलें म्हणूं लागलीं. कल्याणनें पोवाडा म्हटला. पुन्हां विश्वासनें गाणें म्हटलें. विश्वासच्या आवाजावरून वाटे कीं, सभेंत दहा हजार लोक असतील. गांवांतील लोकांना वाटलें कीं, मोठी सभा जमली आहे बहुधा. या विचारानें जो तो हळूहळू येऊं लागला. आणि शेवटीं चांगलीच सभा जमली. विश्वास आनंदला. कल्याण रोमांचित झाला. त्यांचीं भाषणें सुंदर झालीं. माहितीपूर्ण अशीं ती भाषणें होतीं. त्यांच्या भाषणांत आढ्यता नव्हती. कळकळ व तीव्रता होती. लोकांचीं मनें त्यांनीं जिंकून घेतलीं. शेतकरी माना डोलवूं लागले, त्या तरुणांचें कौतुक करूं लागले.
“उठाव झेंडा क्रांतीचा” हें गाणं होऊन सभा संपली. आम्हांला गाणीं टिपून द्या असें मुलें म्हणूं लागलीं. छापलेले कागद आम्ही आणून देऊं हां, असें त्यांनीं त्या मुलांना आश्वासन दिलें. कल्याण व विश्वास निघाले; परंतु कुठें जाणार ? कुठें झोंपणार ?
“तुम्ही कुठं जाणार झोंपायला ?” एका म्हाता-यानें विचारलें.
“मारुतीचं देऊळ असेल तिथं जाऊं.” कल्याण म्हणाला.
“तुमचं जेवण झालं का ?”
“आतांच झालं ?” विश्वास म्हणाला.
“कोणाकडे ?”
“ही सभा हेंच आमचं जेवण. शेवटीं का होईना, शेतकरी आले. आमचं पोट भरलं. या आजच्या आनंदावर आणखी दोन दिवस अन्नाशिवाय हिंडतां येईल.” कल्याण म्हणाला.
“माझ्याकडे चला.” म्हातारा म्हणाला.
“इतक्या रात्री ?” कल्याणनें विचारलें.
“मग का उपाशीं राहणार ? “
“शेतकरी उपाशीं असतो. आम्हांला एक दिवस राहूं दे. उपाशीं राहायचं दु:ख अनुभवूं दे. बाप्पाजी, तुम्हीं विचारलंत, यानंच समाधान झालं. आम्ही नवीन तरुण. सहानुभूति मिळाली तरी आनंद होतो.”
“शेतकरी त्रस्त झाला आहे. सभा होतात. मतं घेतात. पुढं कांहीं नाहीं. कर्ज आहे, शेतसारे वाढले आहेत. कांही परवडत नाहीं, राजांनो. सारी शेती सावकाराची होऊं लागली. म्हणून शेतकरी उदासीन राहतो. इथं तुम्हाला आधीं नाहीं मिळाली सहानुभूति. परंतु आतां चला. पुन्हां या गांवीं आलेत तर माझ्याकडे उतरा. चला.”