रात्रीं दोघे गॅलरींत झोंपत. एके दिवशीं थंडी होती. परंतु त्यांच्या अंगावर कोणी तरी पांघरुण घातलें. सकाळी पाहतात तों अंगावर पांघरुण ! किती प्रेमळ तो कामगारांचा पुढारी ! कसें बारीकसारीक सारें पाहणारा ! एके दिवशीं ट्रॅममधून येतांना कल्याण व विश्वास चुकले. घरीं यायला उशीर झाला.
“उशीरसा झाला ?” त्या पुढा-यानें विचारलें.
“ट्रॅम चुकलों ! “विश्वास म्हणाला.
“अशी कशी चुकली ? क्रांतिकारक व्यवस्थित हवा. एकदां पाहिलेली जागा त्याच्या ध्यानांत हवी. एकदां पाहिलेला माणूस ध्यानांत हवा. क्रांतिकारक बावळट नये असतां कामा.”
“आम्ही बोलत होतों. भानच राहिलं नाहीं. कोणत्या गाडींत बसतों तें पाहिलं नाहीं.”
“बरं, चला. मला लागली आहे भूक.” तो पुढारी म्हणाला.
सारे जेवायला बसले. परंतु त्या पुढा-याचें जेवण पटकन् संपलें.
“हे काय, झालं जेवण ?” विश्वासनें विचारलें.
“तुम्हांला भूक ना लागली होती ?” कल्याण म्हणाला.
“अरें, त्यांना खरी भूक आहे ती म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची ! आपली ही भारतमाता पारतंत्र्याच्या पंकांतून वर आली आहे, तिचीं लेकरं तिच्या अंकावर सुखासमाधानानं खेळत आहेत आणि तिच्या नैसर्गिक वैभवाचा उपभोग घेत आहेत, कला, विद्या आणि शास्त्र यांचा अभ्यास करून जगांतील सर्व राष्ट्रांच्या आणि संस्कृतींच्या मेळाव्यांत भारतीय संस्कृतीला अग्रपूजेचा मान मिळत आहे, अशा त-हेचं भारताचं वैभवशाली दृश्य पाहण्याची आतुरता त्यांना लागली आहे. रात्रंदिवस हेच विचार त्यांच्या डोक्यांत घोळत असतात. किंबहुना याच विचारांवर ते जगतात. हे विचार म्हणजे त्यांचं मुख्य खाणंपिणं. ते वरून शांत दिसतात, परंतु आंत नुसती खाई पेटलेली आहे, आग भडकलेली आहे.” त्या पुढा-याची पत्नी म्हणाली.
“आणि तूं काय कमी पेटलेली आहेस ? अंगावरची लहान मुलगी मोलकरणीच्या स्वाधीन करून कामगार बायांबरोबर मिलच्या फाटकांत तूं उपाशी बसतेस. विश्वास, ही सुध्दां आग आहे हो. मी थंड झालों तर हीच मला पेटवते. मला पेटवणारी ही फुंकणी.”
“शेवटीं आम्हांला चुलीजवळच बसवलंत.”
“चुलीसाठीं तर सारा झगडा. गरिबाची चूल नीट पेटावी, ती थंड राहूं नये, त्याला पोटभर भाकर मिळावी म्हणून तर क्रांति.” अशीं बोलणीं होत जेवणें झालीं. विश्वास व कल्याण गॅलरींत पडले.
“हें आणखी घ्या पांघरुण. पहाटे थंडी पडते.”
“काय तुम्ही अंगावर टाकलंत आमच्या ?”
“आणि तुम्हांला उशाला हवं का कांहीं ?”
“नको; लागलं तर पुस्तकं घेऊं.”
“ठीक. तुरुंगांत आम्ही थाळी घेत असू.”
असे दिवस चालले. ठिणगीचा अंक कल्याण व विश्वास खूप खपवीत. त्यांना कामाचा जणूं कैफ चढला होता. आणि त्या एक दिवसाच्या संपाची तारीख जवळ आली. प्रचार जोरात सुरू झाला. कल्याण व विश्वास दोघांचे घसे बसले. तरी ते कर्ण्यांतून ओरडतच असत.