“कल्याण, तूं शांत पडून राहा.”
“कसा शांत पडून राहूं ? माझं डोकं भणाणलं आहे. या फॅसिस्टी संघटनांना कसा आळा घालतां येईल याचा मी विचार करीत आहें. आपण शेतक-यांच्या, कामगारांच्या नि त्यांच्याविषयीं सहानुभूति असणा-या पांढरपेशी तरुणांच्या प्रचंड संघटना ठायीं ठायीं उभ्या केल्या पाहिजेत. सारं श्रमजीवि जग उठवलं पाहिजे. कोटयवधि किसान कामगार कवाइती करूं लागले कीं जुनाट संस्कृतीच्या क्षुद्र गप्पा मारणा-या या भांडवलशाही स्वरूपाच्या संघटना निस्तेज होतील.”
“अरे कल्याण, हे संघवालेहि समाजवादाच्या गप्पा मारूं लागले आहेत. म्हणतात, आम्ही हिंदुसमाजवाद स्थापूं. यांना समाजवाद कशाशीं खातात तें तरी कळतं का ? हिंदु जमीनदार, सावकार, इनामदार यांची पदोपदीं तरफदारी करणा-यांनीं समाजवादाच्या गप्पा मारणं हास्यास्पद आहे. सारे भांडवलदार शेवटीं एक होत असतात. सारे श्रमणारे शेवटीं एक होतात. परंतु ही गोष्ट यांना केव्हां कळणार ? कोंकणांतील हिंदु व मुसलमान खोत एक होतात नि कुळांना नाडतात. आणि पुन्हां तेच हिंदु खोत हिंदुमहासभेंतहि असणार ! सारा चावटपणा आहे.”
“परंतु बहुजनसमाजाला समजेल तेव्हां. धर्माच्या नांवानं अडाणी जनतेच्या भावना भडकवतां येतात. परंतु एक दिवस असा येईल कीं, ज्या दिवशीं त्यांना हा सारा ढोंगीपणा कळेल. विश्वास, आपलं काम आहे त्यांना सारं समजावून द्यायचं. आपण सर्वत्र गेलं पाहिजे. नव-विचारांची संघटना बांधली पाहिजे. किसान कामगार यांचीं पथकं ठायीं ठायीं उभारलीं पाहिजेत.”
“तूं म्हणतोस तें खरं. परंतु हें सारं व्हायचं कसं ? आपल्या मनांत किती तरी कल्पना येतात, योजना येतात. परंतु जवळ दिडकी नाही. कसा करायचा प्रचार ? भाईजी नि मी सर्व महाराष्ट्रभर हिंडणार होतों. परंतु मनांतील विचार मनांतच राहिले.
संघटनेसाठीं पैसा हवा.”
“विश्वास, जेवढं होईल तेवढं आपण करूं. मनांतील सारं कोणाला साधलं आहे ? पैसा-पैसा असं म्हणत का रडत बसायचं ? निराश होऊन का कोंप-यांत पडून राहायचं ?”
“कल्याण, असली बेगडी भ्रामक समाधानवृत्ति माझ्याजवळ नाहीं. होईल तेवढं म्हणे करा. मला नाहीं ही मिळमिळीत वृत्ति आवडत. आपण त्यागी नि ध्येयवादी म्हणून मिरवतों. परंतु हातून तर कांहींहि होत नाहीं. हा कर्मशून्य ध्येयवाद काय कामाचा ? ध्येयाची पूजा करीत असं इथं माशा मारीत पडून राहायचं. कोंप-यांत उपाशी पडून ध्येयवादाच्या चर्चा चालवायच्या. यापेक्षां कुठं नोकरी मिळाली तर करावी. पोटभर खावंप्यावं. कांहींहि न करतां आपण कांहीं तरी करीत आहोंत असं भ्रमजाल तरी स्वत:भोंवतीं निर्मूं नये. आत्मवंचना तरी नको. लोक आपणांपासून प्रत्यक्ष कार्याची अपेक्षा करतात. ती अपेक्षा आपण कधीं कशी पुरी करणार ? कित्येक दिवस झाले, मी घरांतून बाहेर पडलों नाहीं. एक तर आजारी आहें; परंतु बाहेर पडावं असं वाटतच नाहीं; कारण कोणी ओळखीचे भेटले तर लगेच विचारतात, “काय चाललं आहे सध्यां काम ?” त्यांना काय द्यायचं उत्तर ? मागं आपण हवेली तालुक्यांत हिंडलों. अनेक तरुणांच्या ओळखी करून घेतल्या; परंतु त्या ओळखी टिकवण्यासाठीं तिकडे जातां येत नाहीं, पत्रहि पाठवतां येत नाहीं. आपल्याजवळ दिडकीहि नाहीं. ना काढतां येत पत्रक, ना लिहितां येत कोणाला पत्र. फुकट सारं जीवन. हा निरर्थक त्याग आहे. नाहीं धड ध्येयपूजा, नाहीं सांसारिक सुखोपभोग.”
“विश्वास, ध्येयाला मिठी मारून कोप-यांत उपाशी मरणं हेंहि महान् कार्य आहे. पुढल्या पिढीला हें तुमचं मरण स्फूर्ति देईल. तूं असा निराश नको होऊं. क्रान्तिकारकांच्या चरित्रांतून किती निराशा, किती विपत्ति आपण पाहतों. अशामधूनच जायचं असतं. तुझी प्रकृति आधींच बिघडलेली आहे. मनस्ताप करून नको घेऊं. आपलीं जीवनं फुकट नाहीं जाणार. मनांत खेळवलेले विचारहि सभोवतालच्या वातावरणांत जात असतात. या जगांत कांहींहि फुकट जात नसतं.”
दोघे मित्र शांत होते. सायंकाळ होत आली. कल्याण बाहेर गेला. त्यानं बाजारांतून ब्रेड आणला. दोघां मित्रांनीं तो खाल्ला. विश्वासला थोडा ताप आला होता. त्याचें डोकें थोपटीत कल्याण बसला होता. त्याला संध्येची का आठवण येत होती ? थोडया वेळानें तो जाणार होता.