“विश्वास, तुला ताप आला आहे. परंतु मला जायला हवं. संध्या वाट बघत असेल.”

“तूं जा. ताप उद्यां उतरेल. संध्येला घेऊन ये. तुम्हांला लग्नभेट म्हणून तरी काय देऊं ? कल्याण, विश्वासजवळ काय आहे ?”

“आणि संध्येला द्यायला माझ्याजवळ तरी काय आहे ? मनांतील प्रेम, हीच आपली तिला भेट.”

“आणि आपण आपलीं ध्येयं तिला देऊं. गरिबांबद्दलची आपली तळमळ तिला देऊं. खरं ना ?”

कल्याण जायला निघाला. समोरच्या माडींत गाणें चाललें होतें. आनंद होता. आणि येथे अपार दु:ख होतें. विश्वासजवळ कल्याण उभा होता.

“येतो !” तो बोलला.

“संध्येला घेऊन ये.” विश्वास म्हणाला.

मित्राच्या अंगावर चादर घालून कल्याण निघून गेला. स्टेशनवर येऊन तो आगगाडींत बसला. गाडी सुरू झाली. केव्हां सुरू झाली तें त्याला कळलेंहि नाहीं. तो आपल्याच विचारांत दंग होता.

कल्याण घरीं आला. त्याची आई वाटेकडे डोळे लावूनच होती. तिला आनंद झाला. परंतु पूर्वीं गोटीसारखा गुटगुटीत असणारा कल्याण कृश झाला होता. मातेच्या डोळयांतून पाणी आल्यावांचून राहिलें नाहीं. तिनें त्याला जवळ घेतलें. त्याच्या

डोक्यावरून तिनें हात फिरविला. वात्सल्यपूर्ण हात !

“डोक्याला रे काय लागलं ? तुरुंगांत का मारलं ?”

“नाहीं, आई. पाय घसरून पडलों. जरा लागलं होतं, आतां बरं आहे.”

“आणि किती वाळलास ?”

“आई, कोटयवधि भावंडं माझ्याहूनहि वाळलेलीं आहेत. तिकडे कोंकणांतील गरीब शेतकरी पावसांत उगवणा-या ते-याची भाजी खाऊन जगतात. तुझ्या कल्याणची तितकी वाईट दशा नाहीं म्हणून सुख मान.”

कल्याण घरीं आला, परंतु त्याच्या चेह-यावर कधीं आनंद दिसला नाहीं. तो संध्येकडेहि गेला नाहीं. तो वर खिडकींत बसून राही. शून्य दृष्टीने समोरच्या भीमानदीच्या प्रवाहाकडे पाहात बसे.

“कल्याण, सारखा विचार तरी कसला करतोस ? वरती एकटा बसतोस. काय आहे तुझ्या मनांत ? कोणतं आहे दु:ख ?” एके दिवशीं आईनें विचारलें.

“माझ्या मनांत लग्न करायचे विचार येत असतात. मी संध्येशीं लग्न लावणार. तुला नि बाबांना आहे का पसंत ? का तिकडे पुण्याला जाऊन लग्न लावूं ?”

“अरे, आम्हीं कधीं नाहीं का म्हटलं ?”

“बाबांना तूं सांगशील ?”

“तूंच त्यांना सारं सांग. त्या दिवशींच्या त्या प्रसंगापासून ते घरांत एकहि शब्द बोलत नाहींत. जणूं जन्माचे मुके. मला वाईट वाटतं.”

“मी काढूं बाबांजवळ गोष्ट ?

“काढ. तुझं सारं कांहीं ते ऐकतील.”

कल्याणनें पित्याजवळ गोष्ट काढली. मुका बनलेला पिता त्या दिवशीं बोलला.

“चांगलं आहे बाळ. तुझी आज्ञा होईल त्याप्रमाणं मी वागेन. आपल्या कुळाचाराप्रमाणं विरूपाक्षाच्या देवळांत लग्न लावायला हवं. विरूपाक्षाचं मंदिर कांहीं फार लांब नाहीं. गाडया करून आपण जाऊं.”

वडिलांचा रुकार घेऊन कल्याण एके दिवशीं संध्येकडे आला. सर्वांनाच आनंद झाला. अनु आणि शरद् “ताईचे ते आले, ताईचे ते आले” करीत नाचूं लागलीं.

“संध्ये, बसायला घाल ! “आई प्रसन्नपणानें म्हणाली. संध्येनें सुंदर चटई पसरली. संध्या उभी होती. आई तेथें बसली.

“संध्ये, तूंहि बस ना” कल्याण म्हणाला.

“मी बाहेर जाऊन येतें. जरा काम आहे.”

“लवकर ये.” आई म्हणाली.

संध्या गेली. कल्याण नि आई तेथें होतीं. शेवटीं आई म्हणाली,

“तुम्हांला तुरुंगांत भेटल्यावर संध्या घरीं आली. तुम्ही लग्न करणार म्हणून तिनं सांगितलं. तुमची संमति ऐकून माझा जीव खालीं पडला. आईच्या हृदयाची तुम्ही कल्पना करूं शकाल.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel