१३

पुन्हां मुंबईत

लग्नानंतर कल्याण नि संध्या कांहीं दिवस सुपाणी गांवीं होतीं. संध्या कल्याणच्या आईला कामांत मदत करी. सर्व कामाची तिला संवय होतीच. मामंजींची खोली ती स्वच्छ झाडून ठेवी. त्यांच्या अंथरुणावरची चादर तिनें धुतली. उशीचा अभ्रा धुतला. सासरा प्रसन्न झाला. माझ्या कल्याणनें केलेली निवड कल्याणमयच असणार असें तो गौरवानें म्हणाला. संध्येनें आपल्या सासरीं प्रसन्न व निर्मळ वातावरण निर्माण केलें. संध्याकाळीं कल्याण, रंगा, संध्या सारीं भीमेच्या तीरावर फिरायला जात.

परंतु मुंबईला पुन्हां संप होणार अशा बातम्या वर्तमानपत्रांतून येऊं लागल्या. विश्वासचें कल्याणला निघून येण्याविषयी पत्र आलें.” आपण सारींच मुंबईला राहूं. तिथं एखादी खोली घेऊं. तेथील संपाच्या तयारींत भाग घेऊ” वगैरे त्यानें लिहिलें होतें. कल्याण जायला उत्सुक होता. आणि संध्येलाहि बरोबर नेल्याशिवाय गत्यंतर नव्हतें.

रंगा नि कल्याण बोलत बसले होते. संध्या जवळच कांहीं तरी निवडीत होती.

“रंगा, आमचं तिकडे कसं काय जमतं तें पाहूं. मागून तुला नेईन.” कल्याण म्हणाला.

“दादा, मलाहि तिकडे लौकरच बोलाव. इथं मला कंटाळा येतो. मलाहि तुमच्याजवळ राहूं दे. तुझ्याजवळ राहण्यांत मला आनंद वाटतो.”

“रंगा, तूं सुध्दां ये रे आमच्याबरोबर. आपण राहूं कशीं तरी.” संध्या म्हणाली.

“संध्ये, कशीं तरी राहूं म्हणजे काय ? कल्पनेचं जेवणखाण करून पोट भरत नसतं. मुंबईंत राहणं सोपं का आहे ?” कल्याण खिन्नपणें म्हणाला.

“कल्याण, आपण पुण्याला जायचं, कीं मुंबईला ?” संध्येनें विचारलें.

“पुण्याला एखादा दिवस राहून लगेच मुंबईला जायचं.”

“मुंबईला कुठं राहायचं ?”

“राहूं कुठं तरी. तिथं दुसरे कामगार कार्यकर्ते राहतात, तशीं आपण राहूं. संध्ये, सेवकांना कष्टाचंच जिणं. आपण लग्न करूनहि जणू संन्याशाप्रमाणं राहणार. त्यागांतच आनंद मानणं हेंच आपलं ध्येय.”

“दादा, तूं लग्न तरी कशाला केलंस ? संन्यासीच कां नाहीं झालास ?”

“रंगा, संन्यास म्हणजे केवळ लग्न न करणं असा नाहीं अर्थ. संन्यास म्हणजे ध्येयासाठीं सर्वस्वावर पाणी ओतायची तयारी. संन्यास म्हणजे ध्येयाच्या रंगानं स्वत:चं जीवन अंतर्बाह्य रंगवणं. लग्न करूनहि मी संन्यासीच राहीन. संध्येच्या मोहांत पडून मी ध्येयाला विसरणार नाहीं. वेळ आली तर स्वत:चा, संध्येचा, तुम्हां सर्वांचा ध्येयासाठीं होम करायला मी मागंपुढं बघतां कामा नये. हंसत हंसत मी सर्वांचा त्याग करीन. स्वत:च्या प्राणांचाहि करीन. कुटुंब म्हणजे ध्येयार्थी जीवांचा संघ.”

“संध्याताई, दादाजवळ राहणं म्हणजे होमकुंडाजवळ राहणं आहे.”

“रंगा, ज्योतीला दिव्याजवळ राहण्यांतच आनंद. प्रभेला प्रभाकराशीं एकरूप होऊन राहण्यांतच धन्यता.” ती म्हणाली.

“आणि ज्योतीशिवाय दिव्याला तरी काय अर्थ ?”

“प्रभा नसेल तर प्रभाकराला कोण विचारील ?” रंगा म्हणाला.

थोडा वेळ सारीं स्तब्ध होतीं. एकदम रंगा म्हणाला, “संध्याताई !”

“मला वैनी म्हणा. वैनी म्हणवून घ्यायचा माझा हक्क आहे.”

“मलाहि मग भावजी म्हटलं पाहिजे.”

“काय रंगाभावजी ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel