मालकांनी युनियनला मान्यता द्यावी, पगारवाढ म्हणजे महागाईभत्ता बारा टक्के द्यावा, अशा स्वरूपाच्या अटींवर तडजोड होणार होती. परंतु २५ टक्के महागाईभत्ता हवा असा आतां हट्ट धरण्यांत आला. मालक ऐकेनात. संप जाहीर करण्यांत आला. कामगार-पुढा-यांची धरपकड सुरु झाली. संभांतून ध्वनिक्षेपक लावायचे नाहींत असा वटहुकूम निघाला. चाळीचाळींतून सभा घेणारेहि पकडले जाऊं लागले. संपाचा विचका उडाला आणि एक दिवस संप मागें घेण्यांत आला. मालक प्रथम देत होते तेवढयावरच संतोष मानून कामगारांना कामावर जावें लागलें.

“कल्याण, मी नि बाळ आतां पुण्याला जातों.” विश्वास म्हणाला.

“आणि मीहि माझ्या जिल्ह्यांत जातों.” भाईजी म्हणाले.

“भाईजी, थोडे दिवस राहा ना.” संध्या म्हणाली.

“संध्ये, मी पुढं येईन. तुझा वाढता संसार बघायला येईन. आज आग्रह नको करूंस.”

“येथील कामगारपुढा-यांच्या वर्तनानं भाईजी दु:खी झाले आहेत. होय ना भाईजी ?” कल्याणनें विचारलें.

“तुमचे होतात खेळ, त्यांचा जातो जीव. सन्मानपूर्वक तडजोड होत असतांहि आपसांतील मत्सरानं कांहीं कामगार-पुढा-यांनीं ती होऊं दिली नाहीं. बिचारे लाखों कामगार इतके दिवस हाल भोगीत राहिले. श्रमणा-या जनतेचं कल्याण आपल्या डोळयांसमोर आधीं हवं. आपल्या डोळयांसमोर दुसरीं राजकारणं असतात. सत्ता कोणाच्या हातीं, सूत्रं कोणाच्या हातीं, याचा विचार आपण करीत असतों. जाऊं दे. मी कशाला कोणाला नांवं ठेवूं ? संध्ये, सध्यां मला जाऊं दे. मी पुढं येईन.” ते म्हणाले.

आणि सारीं गेलीं. कल्याण नि संध्या मुंबईत होतीं. त्यांनीं दुसरीकडे एक लहानशी खोली घेतली. तींत त्यांचा छोटा संसार सुरु झाला. परंतु त्या छोटया खोलींतील संसारांत संध्या महान् आनंद अनुभवीत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel