“हें रे काय कल्याण, असं नको बोलूं. वीक हो या बांगडया. कामगारांत काम करणा-याच्या पत्नीला बांगडया शोभत नाहींत. कुडीं शोभत नाहींत. या दागिन्यांची मला लाज वाटते. मी त्या दिवशीं तुझ्याबरोबर त्या कामगार-बायांच्या सभेत आलें होतें. मला तिथें लाज वाटत होती. मीं माझे हात माझ्या ओंच्यांत लपवून ठेवले होते. ज्यानं मनाला मोकळेपणा नाहीं, तें कशाला जवळ ठेवा ? कल्याण, आणि दुकानदारांचं देणं आहे. देऊन नको का टाकायला ?”

शेवटी बांगडया विकण्यांत आल्या. कांही उधारी देण्यांत आली. पुन्हां उधार माल मिळूं लागला. परंतु पुन्हां बाकी थकत चालली, चाळींत फारसें शिवणकाम मिळत नसे. संध्या व कल्याण दोघें खिन्न, सचिंत व उदास असत.
संध्ये, आज विश्वास येणार आहे. कांहीं तरी चांगली भाजी कर; मी स्टेशनवर जातों.”

“कसली करूं भाजी ?”

“आज कोबीची भाजी कर. तुला आवडते ना ?”

“आमचा मळा होता तेव्हां आवडत असे. आतां मला कांहीं आवडत नाहीं. फक्त एक आवड आहे, ती मात्र कधीं जाणार नाहीं. मी मरेन, परंतु ती आवड मरणार नाहीं.”

“कोणती अशी धन्य वस्तु ?”

“तुझं प्रेम.”

“प्रेम पुरं पडत नाहीं, संध्ये. शेवटीं ज्याला तुम्ही जड वस्तु म्हणतां, त्या भातभाजीशिवाय सारं फुकट आहे !”

“परंतु केवळ भातभाजीहि पुरेशी नाहीं हो !”

“दोन्हीं हवींत. जड व चैतन्य दोहोंचा खेळ हवा. दोहों मिळून जीवन पूर्ण आहे. दोहों मिळून विकास आहे.”

“बरं, तूं जा. कोबीचीच आज भाजी करीन.”

कल्याण गेला. संध्येनें किती तरी दिवसांत आज छानसा स्वयंपाक केला. थोडी टमाटोची कोशिंबीरहि तिनें केली होती. तिनें चार बोंडें तळलीं. विश्वासला दैन्य दिसूं नये, म्हणून का तिची खटपट होती ?

संध्या स्वयंपाक करून खालीं रस्त्यावर गेली. बराच वेळ झाला तरी कल्याण व विश्वास यांचा पत्ता नाहीं. इतक्यांत तिच्या पाठीवर कोणीतरी थाप मारली. ती चमकून मागें पाहते तों कल्याण व विश्वास तेथें उभे !

“मी इकडे पाहात होतें.” संध्या म्हणाली.

“संध्ये, स्टेशन या बाजूला आहे. तिकडून आम्ही कसे येऊं ?”

“माझ्या नाहीं हो लक्षांत आलं.” ती म्हणाली.

सारीं वर आलीं. विश्वास जरा थकल्यासारखा दिसत होता.

“विश्वास, बरं नाहीं का वाटत तुला ?”

“न वाटायला काय झालं ?”

“मग असा कां दिसतोस ?”

“प्रवासाचा शीण; बरेच दिवस भटकत होतों.”

“आतां इथं राहा महिनाभर.”

“आणि खाऊं काय ?”

“संध्येकडे दुष्काळ नाहीं हो, विश्वास. तुला भरपूर वाढीन. जरा अंगानं नीट होऊन मगच पुण्याला जा. म्हणजे हरिणीला आनंद होईल. तुला मधून मधून ताप येतो. तिला किती वाईट वाटतं. ती मला म्हणे, “संध्ये, काय करूं म्हणजे विश्वासची प्रकृति नीट सुधारेल ? परंतु कांहीं करायचं झालं तरी मी स्वतंत्र कुठं आहें ?” विश्वास, तूं हरिणीसाठीं तरी प्रकृतीला जप.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel