" मला थोडं पाणी दे."
हरिणीनें त्याच्या तोंडांत पाणी ओतलें.
" बस जरा माझ्याजवळ."
हरिणी विश्वासजवळ बसली. त्याच्या केसांवरून ती हात फिरवीत होती. तिच्या डोळ्यांतील पाणी त्याच्या तोंडावर पडलें.
" हे काय हरणे ?"
" विश्वास, तूं कसा होतास, कसा झालास ?"
"होईन पुन्हां पूर्वीसारखा."
"विश्वास,मी तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला दूध पाठवायला सांगूं का ? त्या आनंदानं पाठवतील."
"सांग. तिलाहि बरं वाटेल."
संध्या धुणी घेऊन आली. तों केर काढलेला, भाजी चिरलेली.
"हरणे, भाजी कशाला चिरलीस?"
"संध्याताई, आपण पुढं दोघी एकत्र राहणार ना ? मी का परकी आहें ? आपलं सर्वांचं एकच घर. खरं म्हटलं म्हणजे तुलाच आता विश्रांति हवी. तीन मजल्यांची चढउतार करणं बरं नाहीं."
" मला अजून तसं काहीं वाटत नाहीं."
" विश्वास, जातें आतां मी."
असे म्हणून त्याच्या अंगावर नीट पांघरूण घालून हरिणी गेली. कल्याण, बाळ वगैरे हल्लीं घरीं फक्त जेवायला येत. दिवसा-रात्रीं बाहेरच असत. रात्री कधीं बाराला, कधी दोनला ते घरीं येत. परंतु संध्या कधीं काहीं बोलली नाहीं. एके दिवशीं विश्वासला घेऊन बाळ दवाखान्यांत गेला. विश्वासची प्रकृति तपासावयाची होती. घरी कल्याण व संध्या दोघेंच होतीं.
" कल्याण, अलीकडे तूं कोणत्या कामांत गुंतला आहेस ? तुला बोलायलाही वेळ नसतो. संध्येची जणूं तुला आठवणहि नाहीं."
" संध्ये, तूं माझ्याबरोबर नेहमींच आहेस."
" कांहीं तरी महत्त्वाच्या कामांत हल्लीं तुम्ही सारे आहांत."
" संध्ये, तुला सांगूं सारं ?"