“पुणं आणि ढेंकूण नसणं अशक्य गोष्टी आहेत. पुण्याला काल बांधलेलं जरी घर घेतलंत, तरी तिथं ढेंकूण असतील. पुण्यांतील मुलांना जन्मतांच ज्याप्रमाणं राजकारण मिळतं, त्याप्रमाणं पुण्यांतील घरंहि जन्मतांच ढेंकूण घेऊन येत असतात. पुणं कशासाठीं प्रसिध्द, तर ढेंकणासाठीं असे भूगोलांत कां देत नाहींत, कुणाला ठाऊक ?” विश्वास म्हणाला.
“ढेंकणांना पुण्यांतील लोक फार आवडतात. ढेंकणासारखाच त्यांचाहि स्वभाव आहे. सर्वांना ते चिमटे घेतील. पुन्हां गनिमी काव्यांत तरबेज, ढेंकूण का पटकन सांपडतो ? बचावासाठीं तो वाटेल तिथं घुसेल.” कल्याण म्हणाला.
“कल्याण, पुण्याला नांवं नको हो ठेवूं.” विश्वास म्हणाला.
“न्यायमूर्ति रानडयांना पुण्याची आठवण येऊन रडूं येत असे; पुण्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. पुण्याला कोण नांव ठेवील ? पुण्याला पूर्वींच्या पुण्यस्मृति आहेतच, परंतु हल्लींच्याहि आहेत. लोकमान्य पुण्याचे, नामदार गोखले पुण्याचे, न्यायमूर्ति पुण्याचे, कर्मवीर कर्वे पुण्याचे, पहिले रँग्लर पुण्याचे; महात्मा ज्योतिबांची पुणं हीच कर्मभूमि, आणि थोर अण्णासाहेब शिंदे यांची हीच कर्मभूमि. निबंधमाला इथूनच निघे. केसरी इथूनच गर्जे. इथंच इतिहास संशोधकमंडळ; इथंच मोठमोठया शिक्षणसंस्था; इथंच स्त्रियांत स्वावलंबन व स्वाभिमान उत्पन्न करणारं थोर सेवासदन; पुण्याला प्रणाम करावा.” भाईजी म्हणाले.
“भाईजी, पुण्याचं जागतिक आंवळेल तेल राहिलं ना ?” विश्वास म्हणाला.
“भाईजींची यादी संपते कीं नाहीं म्हटलं ! “संध्या म्हणाली.
“परंतु या यादींत आपलं घर घालायचं राहिलं.” कल्याण म्हणाला.
“आपलं घर कुठं घ्यायचं तें कुठं अद्याप ठरलं आहे ?” विश्वास म्हणाला.
“तें आपण हरणीला विचारूं. ती सर्वत्र हिंडते. ती आतां मॅट्रिक होईल. तिला नोकरी मिळेल. तिच्या शब्दाला अधिक किंमत दिली पाहिजे. सारे प्रश्न आर्थिक असतात.” संध्या हंसून म्हणाली.
“संध्ये, खरंच मिळणार आहे हरणीला नोकरी. तिचे पेपर्स चांगले गेले आहेत. ती पास तर होणारच. निकाल लागला कीं दुस-या दिवशीं नोकरी. चाळीस तरी देतील ?” विश्वास म्हणाला.
“आशेचे खेळ, कल्पनांचे खेळ ! “संध्या म्हणाली.
“घर बांधायच्या आधीं संध्ये, प्लॅन करावा लागतो, नकाशा करावा लागतो. प्रत्यक्षाच्या आधीं मानसिक क्रिया असते. आधीं कल्पना, मग प्रत्यक्ष सर्जन, प्रत्यक्ष निर्मिति.” विश्वास म्हणाला.
“मींहि तेंच सांगितलं. मीं कानडींत सांगितलं वाटतं ? सर्जन, निर्मिति शब्द घातलेस म्हणजे कांहीं नवीन सांगितलंस असं नाहीं होत, विश्वास. आशेचे सारे खेळ.”
“मनुष्यप्राणी सुधारेल या आशेवरच ईश्वराचाहि विश्वखेळ चालला आहे. आशेनंच तो फुलं फुलवीत आहे, मुलं वाढवीत आहे.” भाईजी म्हणाले.