“आणि घरांवरून मारे भगवे झेंडे आहेत. पुरंदरे कॉलनी वगैरे सा-या तपासल्या. वाटे कीं भगवा झेंडा घरावर आहे. कांहीं निर्भयता असेल. परंतु पोलिसाचं नांव काढतांच मालक नको म्हणत. आणि विश्वास, तो रे एक म्हातारा. किती गोड बोलला. परंतु पोलीस येतील चौकशी करायला म्हणतांच म्हणाला, “तर मग नको. तसा मी भितों असं नाहीं. तुम्ही तरुणांनीं नाहीं चळवळी करायच्या, तर कोणी ? तुम्हीच खरं हिंदुस्थान. आमचं काय आतां; दस गेले पांच राहिले. तुमचं तरुणांचं कौतुक करावं. आमचं एवढंच भाग्य कीं आमच्या हयातींत तुमच्यासारखे तरुण घरंदारं सोडून चळवळी करूं लागले आहेत. देशाला आशा आहे. हें प्राचीन राष्ट्र नेहमीं का गुलाम राहील ? अहो, आम्हांलासुध्दां कांहीं करावंसं वाटतं. कांहीं नाहीं होत, तर निदान भगवा झेंडा तरी लावावा. सरकारच्या डोळयांत कांहीं तो फारसा खुपत नाहीं. शिवाय हिंदुमहासभा सरकारला लढाईत मदत करायला तयारच आहे. म्हणून भगवा झेंडा दिला लावून. घराला जरा शोभाहि येते. वारा सुटला म्हणजे किती छान दिसतो, सुरेख फडफडतो. भगवा झेंडा म्हणजे मराठयांच्या स्वराज्याचं स्मरण. भगवा झेंडा डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. मनाचं समाधान होतं कीं, आपण थोडं तरी करतों आहोंत. घरावर भगवा का होईना, झेंडा आहे. तुम्ही करा खटपट. तुम्ही लाल झेंडयाचे असाल. लाल रंग म्हणजे धोक्याची सूचना. लाल सिग्नल दाखवला कीं गाडी थांबली. तुम्ही फार पुढं गेलेले आहांत. भगवा झेंडा सतराव्या अठराव्या शतकांतला. आम्ही अजून मागं आहोंत. तुम्ही गेलेत फार पुढं. चांगलं आहे. परंतु आम्हां म्हाता-यांना पुढं फार पाहवत नाहीं. मागंच राहणं बरं. श्रमणारांचं राज्य तुम्ही करणार ना ? झालंच पाहिजे. गरिबांची दैना आहे हो. तुमची धन्य आहे. त्या पलीकडच्या बाजूला चौकशी करून बघा. मिळेल जागा. आणि डेक्कन जिमखान्यावर नाहीं का ?” अशी त्या म्हाता-याची टकळी सुरू होती. आम्हांला हंसावं कीं रडावं समजेना.” कल्याण सांगत होता.

“आणि कल्याण, ते तर काँग्रेसचेच गृहस्थ होते ! केवढा त्यांचा वाडा ! परंतु त्यांनींसुध्दां स्वच्छ सांगितलं कीं, “तुम्हांला जागा मिळणार नाही. तुम्हां तरुणांचा नेम नाहीं. तुम्ही कांहीं अहिंसेला बांधलेले नाहीं. तुमचीं ध्येयं निराळीं, विचार निराळे. तुम्ही दुसरीकडेच पाहा. माझ्या घरावर तिरंगी झेंडा आहे. त्याची पवित्रता मला राखली पाहिजे.” काय आढयता ! एवढाल्या इस्टेटी पवित्र राहूनच केल्या असतील ! असतील मतभेद आमच्याशीं, म्हणून कां जागाहि न द्यावी ? बेटे काँग्रेसच्या नांवानं आपली भीति लपवीत असतात. काँग्रेसचा आत्मा यांना कळतो तरी का ? आपल्या देशांतील कांहीं धडपडणारे तरुण वणवण करीत आहेत, पोलीस त्यांची चौकशी करतात म्हणून भित्रे लोक त्यांना जागा देत नाहींत; अशा वेळीं स्वत:ला काँग्रेसचे म्हणवणा-या या माणसाचं तरी कर्तव्य घर देणं हें होतं. “या, राहा माझ्याकडे, आले पोलीस तर त्यांना काय तें उत्तर देईन.” असं वास्तविक त्यांनीं तरी म्हटलं पाहिजे होतं. परंतु त्यांनींहि आम्हांला घालवून दिलं. हें का सत्य ? ही का अहिंसा ? का हा दंभ, ही भीति ? भाईजी, काय ही आपल्या देशाची स्थिति ? हे मोठमोठे वाडे, का हीं कबरस्तानं ? सारे भूतबंगले आहेत. जिवंत प्रेतं जणूं या घरांतून राहतात.” विश्वास म्हणाला.

“मग आतां काय करायचं, विश्वास ? रागावून काय होणार ? काँग्रेस ही जनतेची संस्था आहे. कांहीं गणंग व दांभिक असणारच तिच्यांत. परंतु माझ्या काँग्रेसवर नको हो रागवूं. पुन्हां जा पाहायला.” भाईजी म्हणाले.

“आतां उद्यां जाऊं पाहायला. आणि तुमचा मंत्र आतां नको. “ते पोलीस वगैरे येतील” असं आपणच आधीं सांगायचं नाहीं. तशानं कांहीं घर मिळणार नाहीं. या भितुरडया पुण्यांत मिळणार नाहीं. जें पुणं राजकारणाचं केंद्र मानतात, जिथं नेहमीं सभा चालतात, जिथं नाना वर्तमानपत्रं, जिथं शेंकडों मेळे, जिथं हजारों विद्यार्थी, जिथं लोकमान्यांसारखे अद्वितीय पुढारी झाले, त्या पुण्यांतील लोकांच्या मनांत आजच्या काळांत एवढी भीति, काळे डगलेवाल्यांचं इतकं भय ? मग आम्ही खेडयांतील लोकांना कुठल्या तोंडानं हंसावं ? ते पोलिसांना भितात म्हणून त्यांना कां नांवं ठेवावीं ? रद्दी पुणं. भिकारडं, भितुरडं पुणं. पुण्याचा वरून सारा देखावा. शेणाचीं रंगीत फळं. वरून सुंदर रंग. आंत शेण, वाळलेलं शेण. पुणं म्हणे भरभराटत आहे. महाराष्ट्राचं पॅरिस होत आहे. केवढाले बंगले म्हणे उठत आहेत. परंतु सारीं विश्राममंदिरं, पेन्शनरी घरं, मरणधामं; चीड आली आज, भाईजी. पुण्याची नाडी कळली आज.” विश्वास रागानें बोलत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel