“भाईजी, संध्या तुम्हांला जाऊं देणार नाहीं.” कल्याण म्हणाला.

“मी तिची समजूत घालीन.” भाईजी म्हणाले.

“ती सारखी तुमची आठवण काढते.” कल्याणनें सांगितलें.

भाईजी निघाले. दवाखान्यांत आले. संध्या खाटेवर पडलेली होती. शांत होती. आणि भाईजी तिच्याजवळ गेले. ते खाटेवर बसले. संध्येचा हात त्यांनीं हातांत घेतला.

“भाईजी, अरेरे !” असें म्हणून संध्येला रडूं आलें. तिचे डोळे शांतपणें भरून आले. भाईजींनीं तिचे डोळे पुसले. तिच्या केंसांवरून त्यांनीं हात फिरविला. तिला थोपटले.

“संध्याताई, नको हो रडूं. आपला काय बरं इलाज ?”

“असा कसा तुमचा देव, भाईजी ?”

“त्याचे हेतु काय कळणार ? अशा वेळींच संध्ये, श्रध्देची कसोटी असते. आपल्या मनासारखं सारं होत आहे अशा वेळीं ईश्वरावर श्रध्दा ठेवणं सोपं आहे. परंतु आपत्ति कोसळत आहेत, संकटं येत आहेत, आशा मातींत मिळत आहेत, सुखस्वप्नं भंगत आहेत, अशा वेळींहि जो श्रध्दा राखतो, तोच श्रध्दावान्. उगी हो. संध्ये.”

इतक्यांत तेथील त्या मुख्य सूतिकाबाई तेथें आल्या.

“भाईजी, तुम्ही मला ओळखीत नाहीं; परंतु मी तुम्हांला ओळखतें. तुमचं एक व्याख्यान एकदां मीं ऐकलं होतं. तें माझ्या कानांत अद्याप गुणगुणतं आहे. जें कांहीं लहानमोठं कर्म कराल तें ईश्वराच्या पूजेसाठीं आहे या भावनेनं करा, असं तुम्हीं त्या व्याख्यानांत सांगितलं होतंत. भाईजी, मी इथं त्याप्रमाणं करायला धडपडत असतें. तितकं यश येत नाहीं; परंतु प्रयत्न करतें. मी संध्याताईंनाहि खूप धीर देतें, शांत करूं पाहतें. परंतु अद्याप त्यांचे अश्रु ताजे आहेत. भाईजी, जरा तिकडे येतां थोडा वेळ ?”

“संध्ये, मी जाऊन येतों हं.”

पलीकडे त्या बाईची खोली होती. कामाची कचेरी. भाईजी खुर्चीवर बसले. त्या बाईंनीं भाईजींच्या हातीं दोन पेढे दिले.

भाईजींनीं हातांत घेतले.

“घ्या ना, खा ना. मी दुसरं काय देतें ? ते पेढे खा व वर हें दूध प्या. तुम्ही संध्येच्या घरीं स्वयंपाक करीत होतेत. तिला मऊ भात करून पाठवीत होतेत. तुम्ही पुरुष असून बाई बनलांत. मी स्त्री असून या सर्वांची, इथं येणा-या स्त्रियांची आई नाहीं का होऊं शकणार ? होईन; मी होण्याचा प्रयत्न करीन; तुमचा आशीर्वाद द्या. खा ना ते पेढे, भाईजी.”

तिकडे संध्या रडत आहे. तिचे डोळे ओले आहेत, आणि मी का इकडे एकटा पेढे खात बसूं, दूध पीत बसूं ? आणि संध्येला नेऊन दिला एक पेढा तर ? तिला तो का गोड वाटेल ? ती का पेढा खायच्या मन:स्थितींत आहे ? बरें, पेढा न घ्यावा, न खावा, हें दूध न घ्यावें, तर ह्या भगिनीला वाईट वाटेल. शेवटीं भाईजींनीं पेढे खाल्ले. तें दूध ते प्याले. तेथे सुपारी होती.

“सुपारी नको. मी खात नाहीं.” ते म्हणाले.

“ही लवंग घ्या.”

“जातों मी.”

“ओळख ठेवा, कधीं आलेत तर भेटत जा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel