भाईजी गेले व पुन्हां संध्याताईजवळ बसले. तिच्या डोक्यावरून ते हात फिरवीत होते. तिचे केंस ते सारखे करीत होते. तिचीं बारीक झालेलीं बोटें ते पाहात होते. नख दाबून रक्त किती कमी झालें तें ते पाहात होते.

“संध्ये, बाळ आतां मी जाणार आहें.”

“भाईजी, आणखी राहा असं कोणत्या तोंडानं मी सांगूं ? बाळ असतं तर सांगितलं असतं. परंतु या अभागिनीसाठीं राहा असं कशाला सांगूं ? परंतु मनांत वाटे, कीं मी घरीं आल्यावर मग तुम्हीं जावं. मला घरीं तुमच्याजवळ दोन घांस खाऊं द्या. मग तुम्ही जा. भाईजी, तुमचा आधार वाटतो हो.”

“संध्ये, खरंच का राहूं ? परंतु तुला घरीं यायला बरेच दिवस लागतील. अद्याप तूं बरी नाहींस.”

“आतां मी घरीं येईन. तेव्हांच बरी होईन. इथं सारखी बाळाची आठवण होते. आणि आतां त्या दुस-या बायका बाळंत झाल्या आहेत. त्यांचीं मुलं त्यांच्याजवळ पाळण्यांत आहेत. मला माझं बाळ आठवतं. कसं होतं ! इथं नकोच, भाईजी. मला घरीं न्या. तुमच्याशीं बोलेन, तुमचं बोलणं ऐकेन. कल्याणच्या मांडीवर डोकं ठेवीन. हरणीची थट्टा करीन. विश्वासला चिडवीन. मी लौकर बरी होईन. मला घरीं न्या; आणि मग तुम्ही जा. माझं नाहीं का ऐकणार ? भाईजी, तुम्ही सर्वांचं ऐकतां. माझं नाहीं ऐकणार ? मीं कधीं घातली होती का तुम्हांला गळ ? मी तुमचं नेहमीं ऐकतें. तुम्हांला स्वयंपाकहि करूं दिला. आतां एवढं माझं ऐका.”

“बरं हो संध्ये, तूं घरीं ये, व मगच मी जाईन.”

“तुम्ही माझ्या केंसांवरून हात फिरवूं लागलेत कीं भाईजी, मला आजीची आठवण होते. माझी आजी का तुमच्यांत आली आहे ? मला तुमच्याबद्दल असं इतकं कां बरं वाटतं ? फिरवा ना केंसांवरून हात. खरंच, आजीचाच जणूं हात.”

“संध्ये, आतां मी जाऊं ?”

“इतक्या लौकर ? किती दिवसांनीं आलांत. मी रोज तुमची वाट पाहायची; परंतु कल्याण सांगे कीं, त्यांना यायला धीर होत नाहीं. भाईजी, तुम्ही न येतांहि येत असां. माझ्या स्वप्नांत तुम्ही येत असां व “संध्याताई, रडूं नको बाळ,” असं म्हणत असां. तुमच्या तोंडून एकाद वेळेस सहज “बाळ” शब्द निघ्तो, तो किती गोड वाटतो ! सा-या लहानपणच्या स्मृति तो शब्द ऐकतांच एकदम उचंबळून येतात. भीमेच्या तीरावर बाबा शेवटचं मजजवळ बोलत होते व मला बाळ म्हणून म्हणत होते. जाऊं दे भाईजी, कुठं काम असलं, तर जा हो !”

“कोणी तरी येणार होते माझ्याकडे; कोणी विद्यार्थी.”

“कशाला येणार होते ?”

“ते चिठी ठेवून गेले होते. आम्हांला तुम्हांला पाहायचं आहे, एवढंच त्या चिठींत होतं. ते येतील व पुन्हां मी नाहीं असं पाहून निराश होऊन जातील. म्हणून जाऊं का ?”

“जा हो !” संध्या म्हणाली.

भाईजी घरीं आले. घरीं कल्याण, विश्वास व त्यांचे सारे मित्र बसले होते.

“हे आमचे भाईजी.” कल्याणनें नवीन मित्रांना सांगितलें.

“तुम्ही त्यांना आपल्या पक्षांत कां घेत नाहीं ?”

“विश्वासचे प्रयत्न चालले आहेत.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel