२१
सारीं तुरुंगांत
भाईजी निघून गेले. कल्याण नि विश्वास आपापल्या कामाला लागणार होते. पुढचें सारें ते ठरवीत होते. इतक्यांत एके दिवशीं त्यांच्या घरासमोर एक मोटर आली. पोलीस आले. विश्वास नि कल्याण चकित झाले. तुम्ही बाहेर फार दिवस राहूं शकणार नाहीं हें भाईजींचें भविष्य खरें ठरलें.
“संध्ये, जातों हं. पुन्हां वेळ येईल तेव्हां भेटूं. आनंदी राहा.” कल्याण सकंप वाणीनें म्हणाला.
“हरणे, योग्य वाटेल त्याप्रमाणं तुम्हीं सारं करा. तुम्ही एकमेकींना अंतर देऊं नका. आम्ही वागत होतों त्याप्रमाणं तुम्हीहि वागा. रंगाहि आधाराला आहे.” विश्वास म्हणाला.
दोघांचें सामान बांधून देण्यांत आलें. कांहीं कपडे, कांहीं पुस्तकें; दुसरें काय असणार सामान ? मोटरीपर्यंत संध्या नि हरणी पोंचवायला गेल्या. कल्याण, विश्वास आंत बसले.
“अच्छा !” दोघे म्हणाले.
मोटर क्षणांत गेली. हरणी नि संध्या तेथें उभ्या होत्या. नंतर त्या खोलींत आल्या. हरणी संध्येच्या गळयांत गळा घालून रडली.
“उगी, हरणे. विश्वास पुन्हां लौकर भेटेल. लग्न झालं नाहीं तों तुरुंग. परंतु आपण हें सारं समजूनच आहोंत. क्रान्तिकारक पतिपत्नींच्या मनोमय भेटी, मनोमय सुखसंवाद ! मनोमय भेटीच्या वेळेसहि क्रान्तिच आपलं तोंड पुढंपुढं करील.”
“संध्ये, ते तुरुंगांत बसणार नि आपण का घरीं राहायचं ?”
“वेळ आली तर आपणहि जाऊं.”
“वेळ आणली तर येईल.”
“बघूं.”
दुस-या दिवशींच्या वर्तमानपत्रांत कल्याण नि विश्वास यांच्या अचानक झालेल्या अटकेसंबंधीं उलगडा होता. इंदूरकडे बाळहि पकडला गेला होता. बाळला अटक झाल्याचें ऐकून त्याच्या आईला अश्रु आवरेनात. बाळला दमा आहे, ताप आहे, त्याचें तुरुंगांत कसें होईल, असें तिच्या सारखें मनांत येईल. परंतु संध्या नि हरणी या पोरींच्या संसाराचें चित्र डोळयांसमोर येऊन ती स्वत:चें दु:ख विसरे; एके दिवशीं ती त्या मुलांकडे आली. त्यांचें ती समाधान करीत होती.
“आई, किती दिवस हे तुरुंगांत राहणार ?” हरणीनें विचारलें.
“सरकार ठेवील तोंवर.”
“चौकशीशिवाय तुरुंगांत बेमुदत डांबून ठेवणं हा काय न्याय ? ही का माणुसकी ?”
“हरणे, न्याय नाहीं म्हणून तर हे झगडे. एक दिवस न्याय येईल. तरुणांची ही तपश्चर्या का फुकट जाईल ? हीं बलिदानं व्यर्थ नाहीं जाणार. आणि आपले हे मुके अश्रु ! हेहि फुकट नाहीं जाणार. या बलिदानांतून, या अश्रूंतून क्रांतीच्या गर्जना उठतील; यांतून ज्वाला पेटतील. जगांतील दंभ, जुलूम, पिळणूक, अन्याय, विषमकता यांचं भस्म होईल.” ती माता जणूं भविष्यवाणी बोलत होती.
“आई, तुमची भविष्यवाणी आम्हांला धीर देवो.”