भाईजींचे डोळे भरून आले. थोडया वेळानें ते पुन्हा म्हणाले :
“जा आतां. प्रेम मनांत राहिलं तर ठेवूं या; परंतु आपले पंथ आजपासून अलग झाले.”
“भाईजी, विचार करा. लढा करायचाच, तर कांहीं योजना तरी नको का ?” कल्याण बोलला.
“तुम्ही मागं लढा पुकारा असं ओरडत होतेत, तेव्हां कोणती योजना तुमच्याजवळ होती ? मी मागं एकदां कामगारांचा प्रश्न सुटावा, म्हणून प्राण हातीं घेऊन उभा राहिलो होतो. तेव्हां तुमच्या एका आवडत्या थोर कामगार पुढा-यानं मला लिहिलं होतं,
“भाईजी, अशा रीतीनं मरणं आम्हांला पसंत नाहीं. उद्यां स्वातंत्र्याच्या युध्दांत रस्त्यारस्त्यांत बॅरिकेड्स् रचून आपण लढूं, लढतां लढतां मरूं.” मग आज जो देशांत महान् स्वातंत्र्यसंग्राम चालला आहे, त्यांत लोकांनीं हेच प्रकार नाहीं का ठायीं ठायीं केले ? तुमच्याजवळ तरी दुस-या कोणत्या योजना आहेत ? आणि नि:शस्त्र राष्ट्राजवळ असणार तरी कुठल्या ? उगीच मुद्दे मांडित बसूं नका. स्वच्छ सांगा कीं, “रशिया युध्दांत असल्यामुळं ब्रिटिशांना आम्ही मुळींच आज दुखवणार नाहीं. रशिया ही आमची पहिली मातृभूमि; ती जगली पाहिजे.” दुसरे दांभिक प्रचार करूं नका. परंतु प्रामाणिकपणा नि सत्य यांचं तर तुम्हांला वावडं. जाऊं दे. कशाला अधिक बोलूं ? मला आतां गेलं पाहिजे. इथं अधिक थांबणं बरं नव्हे. विश्वास, कल्याण, जातो मी.”
“बरं तर. आम्हीं शेवटचा यत्न करून पाहिला.” ते म्हणाले.
कल्याण नि विश्वास परत पुण्याला आले. विश्वास कामासाठीं कोठें तरी तसाच गेला. खोलींच कल्याण एकटाच आला.
“कल्याण, भाईजी बरे आहेत ना ? काय म्हणतात ते ?” उत्सुकतेनें संध्येनें विचारलें.
“ते आपला हट्ट सोडायला तयार नपाहींत. ते आज आंधळे झाले आहेत. उघडतील, एक दिवस ह्या सर्व भावनांध देशभक्तांचे डोळे उघडतील. केवळ भावनेच्या भरीं पडून कार्य होत नसतं, ही गोष्ट त्यांना कळेल.” कल्याण म्हणाला.
“परंतु भाईजींचं म्हणणं खरं नाहीं का ? देशांतील अनन्वित प्रकार पाहून कोणाला संताप येणार नाहीं ? मलाहि वाटतं कीं, या स्वातंत्र्ययुध्दांत भाग घ्यावा. देशांतील लाखों लोक प्रचंड लढा लढात असतां आपण का घरीं बसावं ?”
“संध्ये, तुला कांहीं कळत नाहीं. हा का स्वातंत्र्याचा लढा आहे ? ही का क्रांति ? ही केवळ हाराकिरी आहे. मूर्खपणानं मरण आहे. आम्ही सांगत होतों, तेव्हां यांनीं लढा केला नाहीं; आणि युध्दाचं स्वरूप पालटल्यावर, आणि देशांत इंग्रजी लष्करी सामर्थ्य अपरंपार वाढल्यावर हे लढा पुकारतात !”
“जणूं तुम्ही लढा पुकारा म्हणत होतेत, तेव्हां लढा सुरू झाला असता तर यशस्वीच झाला असता ! इंग्रजांची लष्करी सत्ता आज वाढली असली तरी तेव्हां नव्हती असं नाहीं; आणि त्या वेळीं काँग्रेसनं लढा सुरू केला असता, तर कांहीं तरी निमित्त काढून तुम्ही पुन्हां दूर राहिले असतेत. तुमचं राजकारण मला आतां समजूं लागलं आहे.”
“संध्ये, तूं असं कांही बोलत जाऊं नकोस. पक्षाच्या शिस्तीच्या हें विरुध्द आहे. राजकारण म्हणजे गंमत नाहीं. तिथं डावपेंच असतात. नाना प्रकारची भाषा वापरावी लागते.”
“परंतु थोडी तरी सत्यता नको का ?”
“तूं केव्हांपासून सत्य-अहिंसेची दीक्षा घेतलीस ? भाईजी देऊन गेले कीं काय ?”
“सत्याची उपासना संध्येला कोणी शिकवायला नको.”
“संध्ये, तूं एका कम्युनिस्टाची पत्नी आहेस, हें सत्य आधीं ध्यानांत ठेवून वागत जा; बोलत जा.”
“कल्याण, उद्यां मी या चळवळींत पडून तुरुंगांत गेलें तर ? देशाची मानखंडना नि विटंबना पदोपदीं हात असतां तुम्ही हें लोकयुध्द म्हणतां तरी कसं ? निष्पाप रक्त सांडलं जात असतां, सतींचे अश्रु गळत असतां, आपण का एकमेकांना मिठया मारीत बसायचं ?”