“मिठया नाहीं मारायच्या, लोकयुध्दाचा तुफानी प्रचार करायचा; ही पंचमस्तंभी चळवळ हाणून पाडायची.”

“काँग्रेस का पंचमस्तंभी ? श्री.जयप्रकाशांसारखे का पंचमस्तंभी ? मागं तुमच्या कम्युनिस्ट पक्षावरची सरकारनं बंदी उठवली, तर आचार्य नरेन्द्र देवांनीं पत्रक काढून आनंद व्यक्त केला होता. काँग्रेस समाजवादी पक्षाची थोडी दिलदारी शिका. प्रतिपक्षी म्हटला, कीं कांहींहि करून त्याला बदनाम करणं ही आसुरी नीति आहे.”

“तूं मला शिकवायला नकोस. जयप्रकाशासारख्या देशद्रोह्याच्या नांवापाठीमागं श्री.उपपद लावायला तुला कांहीं कसं वाटत नाहीं ? पक्षाच्या कोणा सभासदानं तुझं बोलणं ऐकलं तर ? जपून बोलत जा-वागत जा. नाहीं तर खरंच तुझ्याजवळचा संबंध मला सोडावा लागेल.”

“काय बोलतोस, कल्याण ?”

“मी खरं ते सांगतो. आमचं आधीं पक्षाशीं लग्न लागलेलं असतं. पक्षाचं धोरण म्हणजे आमचा वेद, आमचं शास्त्र. पक्षाची शिस्त म्हणजे आमचा प्राण. पक्षाचं धोरण चूक कीं बरोबर ते आम्ही पाहात नाहीं. वरचे पुढारी ठरवतात. आम्ही त्या धोरणाचा ते सांगतील ते मुद्दे घेऊन प्रचार करतों. पक्षाच्या विरुध्द असणा-यांशीं आम्ही संबंध ठेवीत नाहीं. आमच्यांतील एखादा एकांडा शिलेदार निघाला, तर आम्ही त्याच्यावर संपूर्ण बहिष्कार घालतों. तिथं दयामाया नाहीं. स्वत:चील पत्नी का असेना, ती जर पक्षाविरुध्द जाऊन कांहीं करील, तर तिचा त्याग करणं हीच आमची नीति.”

“कल्याणं, कसं हें तुला बोलवतं ? तुला का कांही भावना नाहींत ?”

आम्ही क्रांतिकारक भावनांना मारून टाकतो. वैयक्तिक भावना आम्ही नष्ट करतों; क्रांतीला पेटवतील अशा भावना फक्त ठेवतों. कोमल, प्रेमळ, हळुवार, रडक्या भावना आम्ही फेकून देतों. संध्ये, आमचे एक थोर कम्युनिष्ट कार्यकर्ते आहेत. त्यांची मीं एकदां एक गोष्ट ऐकली होती. त्यांची तान्ही मुलगी वारली. तिला त्यांनीं एका पिशवींत घातलं. त्यांनीं सायकल घेतली. एका बाजूला तान्ह्या मुलीचा मृत देह आंत असलेली ती पिशवी त्यांनी अडकवली व दुसरीकडे बाजारांतील सामान आणण्यासाठीं घेतलेली पिशवी अडकवली आणि ते निघाले. वाटेंत त्यांना एक मित्र भेटला. हे सायकलवरून उतरले. “पिशवींत रे काय ?” मित्रानं विचारले. मेलेली मुलगी. वाटेंत तिची व्यवस्था लावून, तसाच पुढं बाजारांत जाईन, असं त्या कार्यकर्त्यानं उत्तर दिलं. तो मित्र चकित झाला. संध्ये, क्रांतिकारकांना असं व्हावं लागतं. कठोरपणा त्यांना शिकावा लागतो.”

“कल्याण, माझं बाळहि का तूं असंच भाजीपाल्यासारखं पिशवींत घालून नेलंस ? आणि लगेच मंडईंत गेलास ?”

“नाहीं, संध्ये. मी रडत गेलों. बाळ जिवंत होईल का असं छातीची ऊब देऊन वाटेंत जातांना मी करून पाहात होतों. संध्ये, मी अद्याप कच्चा आहें. मी पक्का क्रांतिकारक नाहीं.”

“असा कच्चाच राहा. पक्का नको होऊंस. कल्याण, काय बोलूं, काय सांगूं ? जाऊं दे हे बोलणं. मला नाही ऐकवत. परंतु हल्लीं माझ्या मनाचा कोंडमारा होतो. भाईजींचं करणं मला बरोबर वाटतं. परंतु तुझं प्रेम तरी कसं तोडूं ? तुम्ही पुरुष कर्तव्यासाठीं प्रेमं झुगारतां. भाईजींनीं तुमचे प्रेमबंध तोडले. तूं माझा त्याग करायला तयार झालास; परंतु मी काय करूं ? मी का तुझा त्याग करूं ? आणि स्वत:च्या आत्म्याची मी हांक ऐकूं ? परंतु कुठं आहे माझा स्वत:चा असा मुक्त, स्वतंत्र आत्मा ? माझा आत्मा कधींच तुझ्यांत मिसळून गेला आहे. परंतु जर मिसळून गेला आहे, तर हे तुझ्याशीं विरोधी असे स्वतंत्र विचार माझ्या मनांत कां येतात ? कल्याण, संपूर्णपणें दुस-यांत मिळून जाणं शेवटीं कठिणच आहे.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel