भाईजी, खिन्न नका होऊं. तुम्ही तुमचें आवडतें आकाश पाहा. तारे पाहा. संध्याकाळचे रंग पाहा. पावसांत नाचा. चिमण्या-कावळयांबरोबर बोला. तुरुंगांतील वाळूमधील रंगीत खडे ते तुमचे हिरे गोळा करा. हंसा, खेळा. नाचा, कुदा. मधून गंमतीनें रुसा. आनंदी राहा. दु:ख कशाचें करता ? शेवटीं सारें चांगलें होईल. तुमची श्रध्दा तुम्हांला असें नाहीं का सांगत ?

भाईजींना फारसें कधीं कोणाचें पत्र येत नसे. ते तेथील नवीन तरुण मित्रांना म्हणत, “तुम्ही सुटल्यावर मला रोज पत्रं पाठवा. मोठमोठीं पत्रं. सध्यां तुम्हांला पत्रं येतात तीं मलाच असं मी समाधान मानीत असतों.”

परंतु एके दिवशीं सुंदर अक्षरांत पत्ता लिहिलेलें एक पत्र आलें.

“भाईजी, तुमचं पत्र. तुमचं पत्र.” असें म्हणत मित्र धांवत आले. ते पत्र हातांत घेऊन ते दूर गेले. कोणाचें होतें ते पत्र ? तें संध्येनें लिहिलेलें पत्र होतें. भाईजींबरोबर हळुवार हृदयानें आपणहि तें पत्र वाचूं या :

“प्रिय भाईजींचे सेवेशीं
संध्येचे सप्रेम भक्तिमय प्रणाम.

“तुम्हांला मी काय लिहूं ? किती तरी दिवसांत तुम्हांला मी भेटलें नाहीं; तुम्हांला पत्रहि लिहिलें नाहीं. तुम्हांला भेटणें, तुम्हांला पत्र लिहिणें हासुध्दां गुन्हा आहे. इंग्रज सरकारच्या दृष्टीनें नव्हे, परंतु कल्याणच्या पक्षाच्या दृष्टीनें. त्याचे मन तुम्ही जाणतां. परंतु पक्षाची शिस्त आहे ना ? भाईजी, तुम्हांला हें सारें समजतेंच; परंतु आज राहवेना, म्हणून हें पत्र लिहीत आहें. कितीदां तरी वाटे, कीं आपण स्वातंत्र्याच्या लढयांत सामील व्हावें; परंतु लढयांत पडलें असतें, तर कल्याणला सोडावें लागलें असतें ! आणि कल्याणला सोडून संध्येचें कल्याण कसें व्हायचें ? कल्याण माझ्या रोमरोमांत आहे. त्याला कसें सोडूं, कसें तोडूं ? मी घरींच राहिलें. तुमची आठवण येऊन डोळयांत पाणी येई. भाईजी, तुम्ही तुरुंगांत गेल्यापासून मीं गोड खाल्लें नाहीं. कल्याण चिडतो, संतापतो. परंतु मी सारे सहन करतें. सारें सहन करणें हाच स्त्रियांचा पुरुषार्थ. होय ना ?

“भाईजी, तुम्हांला माहीत नसेल. परंतु तुमची संध्या लौकरच बाळंत होईल. तुमच्या संध्येला आशीर्वाद पाठवा. सारें सुखरूप पार पडो. म्हणून प्रार्थना करा. का तुम्ही रागवाल, संतापाल ? देशांत स्वातंत्र्याचे बाळ जन्माला यावें म्हणून सर्वांनीं बलिदान करण्याच्या वेळेस यांनीं का आपल्या घरीं नवीन पाळणे हालवावे ? असें का तुम्ही म्हणाल ? खरें म्हणजे आम्हीं घरीं असणें पाप आहे. आम्हीं मेलें पाहिजे होतें. निदान तुरुंगांत तरी येऊन बसलें पाहिजे होतें. परंतु देशांत अग्निदिव्य होत असतां आम्ही घरीं सुखोपभोगांत दंग होतों. अरेरे ! भाईजी, खरेंच का तुम्हांला राग येईल.

“परंतु मी मनानें खरोखर स्वातंत्र्याच्या लढयांत होतें. मी घरीं नव्हतें. एक प्रकारें तुरुंगांतच होतें. तुम्ही रागावूं नका. संध्येची कींव करा. परंतु तुम्ही रागवाल असे मी मनांत आणणें म्हणजेच तुमचा अपमान करणें आहे. तुम्ही रागवणार नाहीं. संध्येला तुम्ही रोज मनानें आशीर्वाद पाठवीत असाल.

“आणि भाईजी, सुटल्यावर तुम्ही या हो. त्या वेळीं माझें बाळ असेल त्याला खेळवायला या. चिमणीचीं गाणीं म्हणायला या. तुम्ही याल तों बाळ मोठें झालेलें असेल. तुम्ही तें खेळवा. त्याला घेऊन फिरायला जा. त्या सृष्टिसौंदर्य दाखवा. याल ना ? आईप्रमाणें या संध्येच्याहि केंसांवरून हात फिरवायला याल ना ? तुम्ही कां पक्षेपपक्ष पाहाल ? कल्याण म्हणाला, भाईजी आतां आपल्याकडे येणार नाहींत. खरें का हें ? तुम्ही नाहीं आलेत, तर मी तुमच्याकडे येईन. त्या वेळी झगडा थांबलेला असेल. पक्षद्वेष शमलेले असतील. उडालेला धुरळा खालीं बसलेला असेल. मनें शांत व समतोल झालेली असतील. त्या वेळीं मी तुमच्याकडे आलें, तर कल्याणचा पक्ष कांहीं रागावणार नाहीं. का हे विरोध वाढतच जातील ? देवाला ठाऊक !

“परंतु तुम्हीच याल. संध्येसाठीं याल, तिच्या बाळाला बघायला याल. तोंवर मी बाळाला तुमच्या गोष्टी सांगेन. तुमच्या आठवणी सांगेन; परंतु त्याला समजतील का ? समजतील. बाळ हंसेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel