“तुम्ही तुरुंगांत दु:खीकष्टी असतां असें ऐकले. असें नका करूं. तुम्ही दु:खी असणें म्हणजे शेंकडोंना दु:खी करणें. तुम्हीच ना म्हणत असां कीं नेहमीं आनंदी असावें ? तुम्हीच ना म्हणत असां “संध्ये, मी नेहमीं हंसत असतों. हंसणं हा माझा खरा धर्म. बाकी तात्पुरतीं वादळं.” मग कुठें गेलें तुमचें हंसणें ? हे कम्युनिस्ट दूर राहिले म्हणून का तुमचें हंसणे लोपलें ? शेवटीं लढा मंदावला, म्हणून का तुम्ही दु:खी होतां ? परंतु कर्तव्य करणें एवढें आपलें काम असें तुम्हीच म्हणत असां. मीं का तुम्हांला शिकवावें, सांगावें ? परंतु तुम्ही हंसत राहा. तुम्हीं आनंदी आहांत असें ऐकलें म्हणजे मला आनंद होईल. भाईजी, तुमची संध्या हातींपायीं नीट सुटावी, तुमच्या संध्येची सुलभ प्रसूति व्हावी असें तुम्हांला वाटतें ना ? उद्यां बाळबाळंतीण सुखरूप असावींत असें वाटतें ना ? तर मग आनंदी राहा. तुम्ही दु:खी आहांत, कष्टी आहांत, रडत बसतां, निराश होतां, मरणाचे विचार मनांत आणतां, हें ऐकून हृदयांत चर्र होतें. मला मग कांहीं सुचत नाहीं. तुमची दिवस भरत आलेली संध्या जर सारखी अशान्त व सचिन्त राहील, ना नीट खाईल, ना पिईल, तर उद्यां सारें नीट कसें व्हायचें ? खरें ना ? म्हणून या संध्येसाठी हंसा. आनंदी राहा. मला पत्र लिहा. मी तुमच्या मुलीसारखी जणूं आहें. तुमच्या लहान बहिणीसारखी आहें. लिहा पत्र. मला आशा द्या. आनंद द्या. “संध्ये, येईन हो तुझ्याकडे, तुझं बाळ पाहायला येईन. तुझ्या हातचं जेवायला येईन. तुझ्यासाठीं मी आनंदी राहीन. तूंहि आनंदी राहा. मनाला कांहीं लावून नको घेऊं.” असें लिहा. लिहाल ना ?

“भाईजी, तुम्ही का आतां दुस-या पक्षांत जाणार ? कल्याण म्हणत होता. भाईजी, तुम्ही मोकळे राहा. सत्य हें पक्षातीतच असावें. खरेंच, तुम्ही कोणत्याहि पक्षांत नका जाऊं. पक्षांत गेलें कीं नाहीं म्हटलें तरी थोडा पक्षाभिमान येतो. अभिनिवेश येतो. प्रहार सोसावे लागतात, करावे लागतात. टीका, प्रतिटीका. तुम्हांला हें कसें मानवेल ? तुम्ही मोकळेच राहा. जेथें लढा असेल, अन्यायाविरुध्द, जुलुमाविरुध्द लढा असेल, तेथें जात जा. परंतु शेवटीं मला काय समजतें ? मी वेडी आहें.

“कोणत्याहि पक्षांत न जाऊं तर आपणांस एकटें एकटें वाटते, असें तुम्ही मागें म्हणालां होतां. निराधार वाटतें. ते खरें आहे. परंतु एखाद्या पक्षाच्या शिस्तींत घालून घ्याल, तर तेथें तुमचा जीव मुदमरेल. ही गोष्टहि खरी. शेवटीं योग्य तें तुम्ही करा.

“आज विश्वास, कल्याण कोणी येथें नाहीं. हरणीहि येथें नाहीं. मी एकटी आहें. सायंकाळ झाली आहे. खिडकींतून दूर सुंदर रंग दिसत आहेत. तुम्ही असतेत, तर काव्य केलें असतेंत; नि ते म्हटलें असतेंत. परंतु मी पत्र लिहितां लिहितां मध्येंच हृदय भरून येऊन थांबतें व समोर बघतें. पुन्हां जरा शांत होऊन लिहूं लागतें. आणि किती लिहूं ? मनांतलें सारें रामायण-भारत मला या लहानशा पत्रांत का लिहितां येईल ? आणि मी मनांतील सारें लिहूं तरी शकेन का ? आणि ते सारें लिहिणें कोणाला आवडेल तरी का ?

“मी आतां पुरें करतें हें पत्र. तुमच्या प्रेमळ आशीर्वादाची मी अपेक्षा करतें. तुम्ही आनंदी राहाल अशी आशा करतें.

तुमची

संध्या.”

तें पत्र हातांत धरून भाईजी बसले होते. तें पत्र ते पुन्हां वाचीत. पुन्हां मुकाटयाने बसत. मध्येंच ते डोळे मिटीत. त्यांच्या डोळयांतून ते अश्रु कां घळघळले ? भाईजी आतां उठले. ते एकटेच फिरुं लागले.

दिवस संपला. आतां रात्र आली. तरीहि भाईजी बाहेरबाहेरच होते.

“भाईजी, आज तुम्ही इतके दु:खी कां ? कोणाचं आलं ते पत्र ?” किसननें येऊन विचारले.

“संध्येचं पत्र.”

“कोण ही संध्या ?”

इतक्यांत आणखीहि प्रेमळ मित्र तेथे जमले; आणि भाईजी संध्येची ती हकीगत सांगूं लागले; तिच्या आठवणी ते सांगूं लागले. आठवणी सांगतां सांगतां ते रंगले. मध्येंच ते गहिंवरत, बोलायचे थांबत; आणि पुन्हां ती गीता सुरु होईल. आणि मग

शेवटीं म्हणाले :

“गडयांनो, अशी हो ही संध्या आहे. संध्येप्रमाणंच रमणीय व गंभीर, प्रशान्त व प्रसन्न, पावन नि सोज्ज्वळ, तिचं मी किती वर्णन करूं ? दु:खांतहि सुख मानणारी, कष्टांना न कंटाळणारी, उपासमारींतहि हंसणारी, दागदागिने दूर करणारी, पति कदाचित् फांशीं जाईल असं दिसत असतांहि त्याला त्याच्या कार्यार्थ जायला परवानगी देणारी, विपत्तींतहि विनोद करणारी, हास्य पिकविणारी, रात्रीं उठून देवाची मूर्ति जवळ घेऊन त्याची करुणा भाकणारी, परंतु पतीला देव आवडत नाहीं म्हणून त्या देवाला ट्रंकेंतच ठेवून त्याचं दर्शन घेणारी, थोर मनाची, उदार हृदयाची, सेवेसाठीं सदैव तत्पर, त्यागी, प्रेमळ, धीर व गंभीर अशी ही संध्या आहे. प्रणाम त्या थोर प्रेममयी संध्येला ! प्रभु तिला सदैव सुखांत ठेवो !”

**********

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel