“वेडी आहेस तूं! मला अलिकडे खूप आनंद वाटत असतो, कॉलेजांत जातो, त्यामुळें वर्ष फुकट नाही जाणार. नोकरी करतों म्हणून घरींहि मदत होते. त्या दिवशीं मीं आईला लुगडे आणलें, तिला किती आनंद
झाला! बाबांनाहि बरें वाटलें असेल. लहान वयाची मुलें खेड्यांपाड्यांतून आईबापांस मदत करतात. सातआठ वर्षांचा मुलगा गुराखी होतो, घरीं मदत आणतो. पांढरपेशांचीं मुलें घराला भार असतास. आम्हींहि खपलें पाहिजे. वर्तमानपत्रें विकावीं, दुसरे कांहीं करावें. पांढरपेशा कुटुंबांत एक मिळविणारा आणि दहा खाणारीं! ही बदलली पाहिजे परिस्थिति.”
“जयन्ता, तूं मला एक हातमशीन घेऊन दे. मी घरीं शिवणकाम करीत जायीन.”
“आधी बरी हो. तुझ्या येत्या वाढ दिवसाला मी ती भेट देईन. दोघे घरीं आलीं. आणि जयन्ताची परीक्षा आली. त्याने चार दिवसांची रजा घेतली. पेपर चांगले जात होते. आज शेवटचा पेपर, घरीं बहीण वाट पहात होती. कां बरें जयन्ता अजून आला नाहीं ? – जयन्ता पेपर लिहून उठला. सारीं मुलें निघालीं; परंतु जयन्ता एकदम घेरी येउन पडला. मित्र धांवले. त्यांनी त्याला उचललें. एक टॅक्सी करून ते त्याला घरीं घेऊन आले. “काय झालें ?” गंगूनें घाबरून विचारलें. “घेरी आली होती.” मित्र म्हणाले.
ते मित्र गेले. गंगू भावाजवळ बसली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. वडील कामावर गेले होते. भावंडें शाळेंतून अजून आलीं नव्हतीं. आई दळण घेऊन गेली होती. गंगू एकटी होती.
“जयन्ता, जयन्ता” तिनें हाकां मारल्या. तिचे डोळे भरून आले होते. थोड्या वेळानें आई आली.
“बाळ जयन्ता.” आईनें हांक मारली.
जयन्ता शुद्धीवर आला. त्यानें डोळें उघडलें, तो एकदम उठला, त्याने आईला मिठी मारली.
‘मला मृत्यु नेणार नाहीं.’ तो म्हणाला.
‘पडून राहा बाळा’ आई म्हणाली.
‘तुझ्या मांडीवर निजतों.’
‘ठेव डोकें.’
‘आई, डॉक्टरला आणूं ?’ गंगूनें विचारलें.
‘गंगू, डॉक्टर कशाला ? गरिबाला डॉक्टर नकोत. ते पैसे घरीं उपयोगीं पडतील’- जयन्ता म्हणाला.
‘बाळ डॉक्टरला आणू दे हो.’ आईनें समजूत घातली. गंगू गेली. आणि थोड्या वेळाने ती डॉक्टरना घेऊन आली. त्यांनी तपासलें.