माझ्या रक्तात हिंदुस्थान होता.  भारतात असे कितीतरी होते की ज्याने माझ्या अंगावर आपोआप रोमांच उभे राहात.  असे असूनही या भारताकडे एखाद्या परकीय टीकाकाराप्रमाणे मी बघत असे, आजच्या स्थितीबद्दल मला तिटकारा वाटे; भूतकाळातील पुष्कळ उर्वरित गोष्टींबद्दल मला घृणा वाटे.  भारताकडे मी पाहू लागलो तो थोडा पाश्चिमात्य दृष्टीने व म्हणून जसा एखादा पाश्चिमात्य मित्र भारताकडे पाहील तशी माझी दृष्टी त्या वेळी होती.  भारताचा सर्वसाधारण देखावा, रूप बदलून टाकावे, त्याला अर्वाचीन वेष चढवावा म्हणून मी अधरी झालो होतो.  तथापि माझ्या मनात संशय उभे राहात.  भारताचे स्वरूप मला समजले तरी आहे का ?  भारताच्या भूतकालीन वारशातील बराचसा भाग त्याज्य म्हणून फेकून द्यायला मी तयार झालो आहे.  परंतु या देशाचा आत्मा मला सापडला आहे का ?  जुन्यातले पुष्कळसे टाकून देण्याजोगे होते खरे; पण हिंदुस्थानजवळ चैतन्यमय, शाश्वत फार महत्त्वाचे असे काहीच जर नसते तर हिंदुस्थान म्हणून जे काही वैशिष्ट्य खात्रीने होते व हिंदुस्थानने हजारो वर्षे जे सुसंस्कृत जीवन अखंड चालवले ते शक्य तरी होते का ?  असा हा फार महत्त्वाचा भाग कोणता ?

हिंदुस्थानच्या वायव्य कोपर्‍यात सिंधू नदीच्या खोर्‍यात मोहोंजोदारो येथे उंचवट्यावर मी उभा होतो.  त्या प्राचीन शहरातील घरे, रस्ते माझ्या सभोवार होते.  पाच हजार वर्षांपूर्वीची ती संस्कृती होती म्हणतात.  आणि त्या काळीही संस्कृती विकास पावलेली अशी होती.  प्राध्यापक चाइल्ड लिहितात, ''विशिष्ट परिस्थितीशी मानवी जीवनाचा परिपूर्ण मेळ कसा घालावा त्याचे सिंधू नदीच्या खोर्‍यातील ही संस्कृती म्हणजे प्रतीक आहे.  शेकडो वर्षांच्या धीमेपणाच्या अविरत प्रयत्नांनीच ही गोष्ट साधणे शक्य आहे.  आणि ही संस्कृती टिकून आहे. तिचे विशिष्ट भारतीय स्वरूप स्वच्छ दिसून येते.  अर्वाचीन भारतीय संस्कृतीचा पाया ही सिंधू नदीच्या तीरावरील संस्कृती आहे.''  आश्चर्य वाटते की एखादी संस्कृती एक उच्च विचार, आचार, व्यवहारपध्दती अव्याहतपणे पाचसहा हजार वर्षे चालत आली, आणि तीही निर्जीव, स्थिर नव्हे तर सारखी बदलत वाढत असलेली—कारण हिंदुस्थानातही सारखा बदल, सारखा उत्कर्ष चालू होता.  इराण, इजिप्त, ग्रीस, चीन, अरबस्तान, मध्य आशिया, भूमध्यसमुद्राजवळचे प्रदेश या सर्वांशी हिंदुस्थानचा घनिष्ठ संबंध सतत येत होता.  हिंदुस्थानचा त्यांच्यावर नि त्यांचा हिंदुस्थानवर जरी परिणाम होत होता तरी भारतीय संस्कृतीचा पाया अभंग होता.  तो खचला नाही, वाहून गेला नाही.  या सामर्थ्याचे रहस्य कशात होते ?  हे सामर्थ्य कोठून आले ?

मी भारताचा इतिहास वाचला व विपुल अशा प्राचीन साहित्यातील काही भाग वाचला आणि हे सर्व वाङ्मय ज्यांनी निर्माण केले, हा सर्व इतिहास ज्यांनी घडवला त्यांच्या विचारांचा जोरकसपणा, भाषेची स्पष्टोक्ती व बुध्दीचे वैभव यांचा माझ्यावर फार परिणाम झाला.  प्राचीन काळी चीनमधून, पश्चिम व मध्य आशियातून मोठमोठे प्रवासी येऊन त्यांनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी फिरून आपली प्रवासवृत्ते लिहून ठेवली आहेत.  त्यांच्या वाचनातच मनाने मी सारा देश पाहिला.  तसेच इकडे आशियाच्या पूर्व बाजूला, अंगकोर, बोरोबडर आणि अशा कितीतरी ठिकाणी भारताने प्राचीन काळी काय काय मिळविले, काय काय निर्मिले, त्याचाही विचार माझ्या मनात आला.  आमच्या वाङ्मयावर नि विचारांवर ज्याचा अपाप परिणाम झालेला आहे, प्राचीन कथा, दंतकथा यांच्याशी ज्याचा चिरसंबंध आला आहे असा हिमालयही मी भटकून आलो.  पर्वतांबद्दल आधीच मला फार प्रेम आणि काश्मिरशी पुन्हा माझे नाते, यामुळे हिमालयाचे मला फार आकर्षण वाटे.  मला आजही तेथे उत्साह, शक्ती, सौंदर्य दिसत होतीच.  परंतु आजच्या जीवनाबरोबरच प्राचीन युगातील स्मृतिरूप सौंदर्याचा साक्षात्कार तेथे मला होत होता.  आणि या पर्वतातून वाहणार्‍या या विशाल नद्यांमुळे माझे लक्ष तिकडे जाऊन आमच्या इतिहासातील कितीतरी विविध पर्वे माझ्या डोळ्यांसमोर आली.  सिंधू नदी-जिच्यामुळे या देशाला आजचे हिंदूस्थान हे नाव मिळाले आहे, जिला ओलांडून हजारो जातिजमाती, मालाची ने-आण करणारे लमाण, सैन्ये, हजारो वर्षे येत होते, पूर्वेकडची ती ब्रह्मपुत्रा-इतिहासाच्या मुख्य प्रवाहापासून जरा बाजूला असलेली; ईशान्येकडील पर्वतांना फोडून खोल दर्‍यांतून वेगाने मार्ग काढीत खाली येणारी आणि नंतर पर्वत आणि वृक्षाच्छादित मैदाने यांच्यामधून शांतपणे सर्वत्र पसरणारी ती यमुना, तिच्याभोवती कितीतरी कथा, रासक्रीडा, खोड्या, खेळ यांच्या अनेक गोष्टींचा गोफ विणला आहे.  आणि सर्वांपेक्षा हिंदुस्थानची खरी नदी गंगा !  भारताच्या हृदयाला तिने कायमचे बध्द करून ठेवले आहे व भारताच्या हृदयावर तिची सत्ता चालत आली आहे.  इतिहासाच्या उष:कालापासून असंख्य, लक्षावधी लोकांना गंगातीराचा ध्यास लागला आहे.  गंगेची कथा म्हणजेच भारताचा इतिहास.  उगमापासून सागरसंगमापर्यंत गंगेची कथा ऐकणे, प्राचीन काळापासून आतापर्यंतची कथा ऐकणे, म्हणजे भारतीय संस्कृतीच्या विकासाचा इतिहास ऐकणे आहे.  नाना राज्ये, साम्राज्ये, त्यांचे उदय नि अस्त, मोठमोठी पुरे, पट्टणे, वैभवशाली नगरे, भारतीय ॠषींना व्यग्र करणारा आत्म्याचा शोध; मानवाची अनेक साहसे, जीवनाची विपुलता व सफलता, तसेच त्याग नि वैराग्य, चढउतार, भरती-ओहोटी, विकास-र्‍हास, जीवनमरण या सर्वांचा इतिहास गंगेच्या इतिहासाशी एकरूप झालेला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel