शिलालेख, मंदिरे, स्तंभ वगैरे प्राचीन स्मृतिचिन्हे व प्राचीन शिल्पकला, चित्रकला यांचे अजिंठा, वेरुळ, घारापुरी लेणी यांसारखे नमुने मी पाहिले. पुढील काळातील दिल्ली, आग्रा येथील रमणीय असे शिल्पकलांचे नमुने पाहिले. तेथील प्रसिध्द दगड भारताच्या इतिहासातील स्वत:ची कथा सांगत होता.
माझ्या अलाहाबाद शहरात, तसेच हरद्वार येथे मी मोठमोठ्या पर्वण्यांच्या वेळेस, कुंभमेळ्यासारख्या प्रसंगी जात असे तेव्हा हजारो वर्षापासून गंगेत स्नान करण्यासाठी पूर्वज येत त्याप्रमाणे येणारे लाखो लोक. सर्व हिंदुस्थानातून ठिकठिकाणचे लोक आलेले दिसत. तेराशे वर्षांपूर्वी चिनी व इतर प्रवाशांनी गंगास्नानोत्सवांची ही वर्णने लिहून ठेवलेली मला आठवत. त्या वेळेसही हे कुंभमेळे फार पुरातन झालेले होते. केव्हापासून, कोणत्या अनादिकालापासून त्यांचा आरंभ झाला असेल देव जाणे ! असंख्य पिढ्यान् पिढ्या ह्या प्रसिध्द नदीकडे आमच्या मनाची ओढ कशामुळे ? असा प्रश्न मला सारखा पडे.
माझे हे प्रवास, मी घेतलेली ही दर्शने, आणि त्यांच्यापाठीमागे असलेली वाचनाची माझी पार्श्वभूमी, यामुळे भारताच्या भूतकाळाकडे पाहण्याची मला विशिष्ट दृष्टी लाभली. नुसत्या बुध्दीने सारे समजून घेणे म्हणजे काही अंशी नीरस, कोरडे त्याच्या जोडीला आता भावनात्मक रसग्रही दृष्टीही आली. त्यामुळे भारतासंबंधीच्या माझ्या मनोमय मूर्तीत हळूहळू एक प्रकारचा जिवंतपणा, यथार्थपणा येऊ लागला आणि माझ्या पूर्वजांची ही प्राचीन भूमी पुन: जिवंत माणसांनी गजबजलेली मला दिसू लागली. त्यांचे हास्य, त्यांचे अश्रू, त्यांचे प्रेम, त्यांचे क्लेष सारे मला प्रत्यक्ष दिसू लागले; ऐकू येऊ लागले. आणि या असंख्य जनतेत मला अशा व्यक्ती दिसल्या की, ज्यांना हे जीवन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हे समजले होते; ज्यांनी आपल्या परिणत प्रज्ञेतून अशी काही एक समाजव्यवस्था निर्माण केली की त्यामुळे, संस्कृतीचे एकजिनसी स्थिररूप भारतात हजारो वर्षे टिकले. भूतकालातील हजारो स्पष्ट चित्रे माझ्या मनोमंदिरात उभी राहू लागली. त्यांच्याशी संबध्द अशा एखाद्या ठिकाणी जाताच ती सारी चित्रे पटकन माझ्या डोळ्यांसमोर येत. काशीजवळ सारनाथ येथे जाताच भगवान बुध्द प्रत्यक्ष समोर आहेत, ते आपले पहिले प्रवचन देत आहेत असे वाटे व भगवान बुध्दांच्या त्या प्रवचनाचा प्रत्यक्ष प्रतिध्वनी अडीच हजार वर्षांच्या अंतरावरून ऐकू येतो आहे असे वाटे. सम्राट असूनही माणुसकीने कोणत्याही नृपसम्राटापेक्षा थोर अशा त्या अशोकाचा इतिहास, त्याचे स्तंभ, त्यांवरील शिलालेख त्यांच्या उदात्त भाषेत मला सांगत. आणि फत्तेपूर शिक्रीला जाताच साम्राज्याची क्षणभर विस्मृती पडून सर्व धर्मांच्या पंडितांशी चर्चा करणारा, मानवाच्या त्या सनातन, शाश्वत प्रश्नाला उत्तर मिळवू पहाणारा, सदैव नवीन शिकण्याची जिज्ञासा असणारा अकबर डोळ्यांसमोर येई.
अशा रीतीने भारताच्या इतिहासाचा विविध विपुल असा भव्य चित्रपट हळूहळू माझ्या दृष्टीसमोर उलगडला गेला. ते जयपराजय, ते अभ्युदय, ते अध:पतन, सारे डोळ्यांसमोरून चालले. पाच हजार वर्षांच्या इतिहासात किती स्वार्या, किती उत्पात झाले. परंतु सांस्कृतिक परंपरा सदैव टिकून राहिली याचे मला राहून राहून विशेष वाटे. ही सांस्कृतिक परंपरा सर्व जनतेला व्यापून पुन्हा उभी आहे. जनतेच्या जीवनावर ती अपार परिणाम करीत आली आहे. खरोखरच ही अपूर्व वस्तू आहे. फक्त चीनमधेच अशी अखंड परंपरा, असे सांस्कृतिक जीवन आपणास दिसून येते आणि या भव्य भूतकाळातून पुढे पुढे आजचा अभागी हिंदुस्थान डोळ्यांसमोर येऊ लागला. ते प्राचीन वैभव, ती अखंड परंपरा. परंतु आज तो परतंत्र आहे, ब्रिटनच्या अंकित आहे, ब्रिटनचे शेपूट बनला आहे. तिकडे जगात महायुध्द पेटले आहे, मानवजातीला सळो की पळो करीत आहेत, माणसाला पशू बनवीत आहे. परंतु पाच हजार वर्षे डोळ्यांसमोर असल्यामुळे मला एक नवीन दृष्टी लाभली होती. आणि वर्तमानकाळाचे आजचे ओझे जरा हलके वाटले. भारताच्या प्रदीर्घ इतिहासात ब्रिटिश सत्तेची ही १८० वर्षे म्हणजे थोड्या क्षणांचे किरकोळ दु:ख. भारताला हरपलेले स्वत्व पुन: सापडेल.
या ब्रिटिश प्रकरणातील शेवटचेच पान आता लिहिले जाते आहे. हे जगही आजच्या प्रलयातून तरेल आणि नवीन पायांवर नवरचना उभी करील.