जीवन प्रवृत्ती व निवृत्ती
प्राचीन काळातील हे जे विचारांचे अंधुक आरंभ ह्यातून हिंदी विचार व तत्त्वज्ञान यांच्या गंगायमुना वाहू लागल्या. हिंदी जीवन, हिंदी साहित्य व संस्कृती इत्यादींचे प्रवाह त्यातूनच निघाले आणि या सार्या सरिता पुढे विशाल, खोल, मोठ्या होत गेल्या, त्यांना मधूनमधून अपरंपार पूर आले ते केव्हा केव्हा किनार्याबाहेर पसरून ओसरताना त्यांनी आसपासच्या जमिनीत बहुमोल गाळाची भर घातलेली आहे. त्या युगानुयुगाच्या अजस्त्र कालात केव्हा केव्हा या नद्यांचे पात्र बदललेले दिसते, तर केव्हा केव्हा पात्राचा संकोच होऊनही नदी अगदी लहान झालेली दिसते, पण ओळखू येण्याइतपत त्या नदीचे वैशिष्ट्य व स्वत्व अखंड राहिलेले आहे, मूळ रूप टिकलेले आहे. जीवनाची अचून ओढ नसती तर हा अखंडपणा टिकलाच नसता. ही टिकाव धरून राहण्याची शक्ती म्हणजे मोठा गुणच आहे असे नाही; त्याचा अर्थ साचीव डबके करून राहणे; सडत जाणे, असाही होणे शक्य आहे. आणि गेली कित्येक शतके हिन्दुस्थान अशाच रीतीने जगत आहे असे मला तरी वाटते. परंतु हजारो वर्षे अस्तित्व टिकविणे ही लक्षात घेण्याइतकी ठळक गोष्ट आहे. विशेषत: आज आपल्या डोळ्यांदेखत एका पुढारलेल्या गर्विष्ठ संस्कृतीचा पाया सारख्या पुन्हा पुन्हा होत असलेल्या महायुध्दांनी व अनेक क्रांतींनी पोखरला जात असताना या गोष्टीचे महत्व ध्यानात घेणे आवश्यक आहे. या महायुध्दाच्या मुशीत आज सारे वितळत आहे. त्यातून पौर्वात्य व पाश्चिमात्य या दोघांकरता काहीतरी अधिक चांगले निघेल व आजपर्यंत मानवजातीने प्रयासाने जे काय साधलेले आहे ते कायम राहून, जे आजपर्यंत साधले नाही म्हणून उणीव भासते त्याची त्यात भर पडेल अशी आपली सर्वांची इच्छा आहे. परंतु पुन: पुन: होणारा हा सार्वत्रिक संहार, साधनसंपत्ती व मानवी जीवन यांचाच केवळ नव्हे, तर जीवनाला अर्थ देणार्या मौलिक मूल्यांचाही संहार अर्थगर्भ व सूचक आहे. विविध दिशांनी नाना क्षेत्रांत थक्क करून सोडणारी प्रगती होत असूनही, उच्चतर पातळीवर अर्वाचीन संस्कृती उभी असूनही, पूर्वी कधी स्वप्नातही वाटले नसेल इतक्या पराकोटीला पोचूनही या आधुनिक यांत्रिक संस्कृतीला हा रोग का ? संस्कृती टिकून राहण्याला आवश्यक अशा एखाद्या घटकाची उणीव पडून या संस्कृतीच्या नाशाची बीजे या संस्कृतीच्या पोटातच आहेत की काय ?
परतंत्र देश गतकालाच्या स्वप्नात शिरून, वर्तमानकाळ विसरू इच्छित असतो. गत इतिहासाच्या देखाव्याच्या वैभवात समाधान मानतो. या मूर्खपणाच्या व घातक खेळात वेळ घालविण्याची सवय आपल्यापैकी बर्याच लोकांना लागली आहे. दुसरीही अशीच दुष्ट खोड आपल्याला जडलेली आहे. इतर अनेक बाबतींत जरी आम्ही निकृष्ट स्थितीला पोचलो असलो तरी आध्यात्मिक दृष्ट्या अद्यापही इतरांहून आम्ही थोर आहोत, अशी कल्पना आपण उराशी धरून असतो. स्वातंत्र्य नाही, गुण दाखविण्याची संधी नाही, उपासमार, हालअपेष्टा सुरू आहेत अशा परिस्थितीच्या पायावर आध्यात्मिक किंवा कोणत्याच प्रकारच्या मोठेपणाची इमारत उभारता येत नसते. हिंदी लोक परलोकाचाच अधिक विचार करणारे आहेत असे पुष्कळ पाश्चिमात्य लेखक प्रतिपादित असतात. देश कोणताही का असेना त्यातील दुर्दैवी व दरिद्री लोक एकतर परलोकाच्या आशेवर असतात. नाहीतर क्रांतीच्या मार्गाला लागतात. कारण इहलोक त्यांच्याकरता नाही हे स्पष्टच दिसते. हीच स्थिती परतंत्र राष्ट्रांचीही होते.