गेल्या शेदीडशे वर्षांत भारतीय तत्त्वज्ञानाचा युरोपला पुन्हा शोध लागला आणि त्याचा युरोपियन तत्त्वज्ञान्यांवर, विचारवंतांवर फार प्रभाव पडला.  निराशावादी शोपेनहार याचे तर नेहमी उदाहरण देण्यात येते.  तो लिहितो, ''उपनिषदांतील वाक्यावाक्यातून गंभीर, स्वतंत्र आणि भव्य विचार दिसून येतात.  सर्वत्र एक प्रकारचे पवित्र, उदात्त व उत्कट असे वातावरण अनुभवाला येते, ... उपनिषदांचा अभ्यास जितका उपकारक व उन्नतिप्रद आहे तितका दुसर्‍या कशाचाही नाही.  परामोच्च ज्ञान व अनुभवाची ही निर्मिती आहे.  सार्‍या मानवजातीचा आज ना उद्या हा धर्म झाल्याशिवाय राहणार नाही.''  अन्यत्र शोपेनहारच लिहितात, ''उपनिषदांच्या अभ्यासाने मला जीवनात शांती मिळाली, ''मृत्युसमयी समाधान राहील.''  मॅक्समुल्लर शोपेनहारच्या या उद्‍गाराविषयी म्हणतात, ''जो विचार, जे तत्त्वज्ञान अतिगूढ व वाचातीत आहे असे म्हणण्यात येते, त्या तत्त्वज्ञानासंबंधी बोलताना शोपेनहारचे मन उचंबळून, तो देहभान विसरून गेला आहे. आणि तो उगीच काहीतरी लिहिणारा, वाहून जाणारा लेखक नाही.  शोपेनहारप्रमाणेच मीही वेदान्तात रंगून जातो व माझ्या जीवनयात्रेत मला वेदान्ताची पदोपदी अमोल मदत झाली आहे.  मी वेदान्ताचा ॠणी आहे हे सांगण्यात मला कसलीही भीती किंवा लाज नाही.''

अन्यत्र मॅक्समुल्लर लिहितो, ''मानवी मनाने अद्वैत तत्त्वज्ञानात परामोच्च बिन्दू गाठला आहे आणि या अद्वैत तत्त्वज्ञानाचा, वेदान्ताचा आधार म्हणजे उपनिषदे होत.''  ते आणखी म्हणतात, ''उभ्या जन्मात सगळ्यात जास्त आनंदी आनंद मला झाला तो वेदान्ताचे ग्रंथ वाचताना झाला.  एकदा त्यांचा खरा अर्थ समजला की हे ग्रंथ डोंगरमाथ्यावरच्या स्वच्छ हवेसारखे, प्रभातकालच्या प्रकाशासारखे निर्मळ, खरे खरे वाटतात.''

परंतु उपनिषदांची व नंतरच्या भगवद्गीतेची रसपूर्ण शब्दांत जर कोणी थोरवी गाइली असेल तर ती आयरिश कवी एई. (जी. डब्ल्यू रसेल) याने.  अर्वाचीनांपैकी गटे, वर्डस्वर्थ, इमर्सन, थोरो यांच्यामध्ये काही जिवंतपणा, काही परिणतप्रज्ञा आढळते.  परंतु पूर्वेकडील ह्या पवित्र मोठ्या ग्रंथांमध्ये त्यांनी सांगितलेले सारे असूनही शिवाय कितीतरी अधिक आहे.  भगवद्गीता आणि उपनिषदे यांमध्ये सर्व विषयांत ज्ञानाची प्रज्ञेची इतकी देवतुल्य परिपूर्णता आहे की, ती पाहून मला वाटते ही गीता व उपनिषदे सांगणार्‍या राजर्षिमहर्षींना स्वत:च्या हजारो पूर्वजन्मांचे स्मरण असेल.  त्या जन्मजन्मांतरी कधी मृगजळातल्या छायेमागे धावत, तर कधी छायांशी झुंजत घालविलेल्या आवेशपूर्ण जीवनाचे त्यांनी शांत चित्ताने अवलोकन केले असल्याशिवाय आत्म्याला खर्‍या पटणार्‍या गोष्टी त्यांना इतक्या नि:संदेहाने, इतक्या नि:शंकपणे सांगता आल्या नसत्या. *

---------------------------

* छांदोग्य उपनिषदात पुढील जरा चमत्कारिक परंतु मनोरंजक उतारा आहे.  ''सूर्य कधी मावळत नाही, उगवत नाही.  तुम्हांला जे सूर्याचे मावळणे वाटते ते खरोखर असे आहे.  दिवस संपल्यावर तो पलीकडे वळतो त्यामुळे आपल्याकडे खाली अंधार होतो; पलीकडच्या बाजूला प्रकाश होतो.  इकडे रात्र, तिकडे दिवस आणि पुन्हा सकाळी वाटते की सूर्य उगवत आहे.  तसे काही नाही.  तेव्हा तो तिकडे पाठ करतो आणि पुन्हा आपल्याकडे तोंड करतो.  म्हणून इकडे दिवस सुरू होतो, आणि त्या बाजूला रात्र होते.  खरे म्हणजे तो कधीच मावळत नसतो.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel