भगवद्गीता

भगवद्गीता महाभारतातील एक भाग आहे.  त्या विराट नाटकातील हे एक लहानसे प्रकरण आहे.  परंतु त्याचे वैशिष्ट्य अपूर्व आहे, व ती स्वयंपूर्ण आहे.  ७०० श्रलोकांचे हे लहानसे काव्य आहे.  वुइल्यम् व्हॉन हंब्रोल्ड्ट म्हणतो, ''आपल्याला माहीत असलेल्या कोणत्याही भाषेत इतके सुंदर, इतके खर्‍या अर्थाने तात्त्विक दुसरे काव्य नाही.''  बुध्दपूर्वकालात गीता रचली गेली, त्या वेळेपासून तो आतापर्यंत तिची लोकप्रियता, तिची जनमनावरील पकड यत्किंचितही कमी झालेली नाही.  हिंदुस्थानात गीता म्हणताच पूर्वी ज्याप्रमाणे हृदय उचंबळे तसेच आजही उचंबळते, पूर्वी तिची हाक हृदयाला पोचे तशी आजही पोचते.  प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक दर्शन स्वत:ला अनुरूप असा तिचा अर्थ लावते.  जेव्हा जेव्हा आणीबाणीचा काळ येऊन संशय आणि शंका यांनी मनुष्याचे मन जर्जर झाले, बुध्दी ग्रस्त झाली, कर्तव्याकर्तव्यांचा संघर्ष उपस्थित होऊन व्यामोह पडला, तेव्हातेव्हा प्रकाश मिळावा, मार्गदर्शन व्हावे म्हणून गीतामाउलीकडेच सारे वळले आहेत.  कारण हे काव्यच मुळी अशा आणीबाणीच्या प्रसंगी राजकीय आणि सामाजिक प्रक्षोभकाळात, मानवी मनाची ओढाताण चाललेली असताना, गीता अवतरली आहे.  भूतकाळात कितीतरी भाष्ये व टीका गीतेवर झाली, आणि हल्लीच्या चालू काळातही तीच परंपरा अखंड सुरू आहे, गीतेवर भाष्ये निघत आहेत.  आजकालच्या काळातही थोरथोर विचारवंत आणि कर्मवीर, यांनी गीतेवर लिहिले आहे.  टिळक, अरविंद घोष, गांधी यांनी ग्रंथ लिहून आपापले गीतेचे अर्थ दिले आहेत.  अहिंसेचा स्वत:चा अर्थ गांधीजी गीतेतूनच काढतात, व गीतेचा ते अहिंसेला आधार दाखवितात.  तर दुसरे टीकाकार सत्यासाठी आणि न्यायासाठी हिंसा व युध्द धर्म्य आहेत असे गीतेच्याच आधाराने म्हणतात.

गीतेचा आरंभ युध्दाला आरंभ होण्यापूर्वी, युध्दभूमीवर कुरुक्षेत्रावरच कृष्णार्जुनातील संवादाच्या रूपाने झाला आहे.  युध्दात होणार्‍या संकुल संहाराच्या, आप्तेष्टमित्रांच्या कराव्या लागणार्‍या वधाच्या विचाराने अर्जुन व्याकुळ होतो व त्याची मनोदेवता या विरुध्द ओरडून उठते की, ही हिंसा कशासाठी ?  हे पाप, हा कुलक्षय ज्यामुळे क्षम्य ठरेल असा कोणता मोठा लक्षात येण्यासारखा लाभ व्हायचा ?  प्रस्तुत कर्तव्य काय ते निश्चित करण्यात अर्जुनाची मती कुंठित होते व त्याची इष्टा-निष्टाबद्दलची जुनी मूल्ये कोलमडून पडतात.  परस्परविरोधी कर्तव्ये व नीतितत्त्वे यांच्या कचाट्यात सापडून द्विधा होणारे मानवी मन- त्या त्या युगात अशा प्रकारे व्याकुळ होऊन जाणारे मानवी मन याचे प्रतीक म्हणजे हा अर्जुन होय.  या खाजगी व्यक्तिगत संभाषणातून हळूहळू हा वाद उच्चतर, उदात्ततर अशा व्यापक वातावरणात जातो व व्यक्तीचे कर्तव्य, सामाजिक आचार, नीतिशास्त्राचा मानवी जीवनाला उपयोग, व या विषयात अवश्य ठेवावी लागणारी अध्यात्मदृष्टी यांची व्यक्तिनिरपेक्ष तात्त्विक चर्चा येते.  गीतेत पुष्कळसे अध्यात्मशास्त्र आहे.  बुध्दीचा ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तिमार्ग हे जे मानवी विकासाचे तीन मार्ग, त्यांचा समन्वय करण्याचा, त्यांच्यात अविरोध निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.  भक्तीवर अधिक भर दिलेला वाटतो आणि होता होता सगुण ईश्वराचे दर्शन झालेले आहे, परंतु तो सगुण ईश्वर निर्गुण परब्रह्माचा एक अवतार मानला आहे.  मानवी जीवनाच्या मागे जी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे तिच्याविषयीच गीतेत मुख्यत्वेकरून ऊहापोह आहे आणि या संदर्भातच जीवनातील प्रत्यहींचे नानाविध प्रश्न, अनुभवास येणार्‍या घटकोघटकीच्या अडचणी मांडल्या आहेत.  जन्माचे ॠण फेडण्याकरता कर्तव्य नीट रीतीने पार पाडण्याकरता कर्म करीत राहिलेच पाहिजे अशी गीतेची हाक आहे.  मात्र हे सारे करीत असताना जीवनाची आध्यात्मिक पार्श्वभूमी व त्याहीपेक्षा व्यापक असलेला विश्वाचा हेतू, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजेत असे बजावले आहे.  कर्माचा त्याग करणे, निष्क्रिय राहणे यांचा निंद्य म्हणून धिक्कार केला आहे.  आपले जीवन, आपली कर्मे आपल्या युगातील, आपल्या काळातील परमोच्च आदर्शांना अनुरूप अशी असावीत, कारण ध्येये आदर्श काळानुरूप बदलत असतात.  म्हणून युगधर्म, त्या त्या विशिष्ट काळातील ध्येयवाद या गोष्टींकडे कधी दुर्लक्ष होता कामा नये असे सांगितले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel