अर्वाचीन हिंदुस्थानात सगळीकडे पराजयामुळे आलेली निराशा पसरली आहे व शांतीचे निवृत्तिमार्गाचे फार स्तोम मातल्याने नुकसान झालेले आहे.  त्यामुळे हा कर्ममार्गाचा संदेश मनाला विशेष पटतो.  गीतेत सांगितलेल्या कर्तव्यकर्माचा आजच्या परिस्थितीतला अर्थ, समाजाच्या सेवेकरता, समाजाच्या कल्याणाकरता, तारतम्य राखून, परोपकार, राष्ट्रहित व मानवी समाजाचे मंगल व्हावे या बुध्दीने केलेले कर्म, असा करणे, शक्य आहे.  गीतेचा उपदेश असा आहे की, ही अशी केलेली कर्मे सत्कर्मे होत.  मात्र त्या कर्मातील बुध्दीला व कर्मापाठीमागच्या हेतूला आध्यात्मिक ध्येयाचे पाठबळ पाहिजे.  तसेच जे कर्म करायचे ते अनासक्त रीतीने करावे, फळाची आशा बाळगून फार हिशेब करीत बसू नये.  योग्य कर्माला योग्य फळे लागतीलच, ती ताबडतोब कदाचित दिसणार नाहीत, परंतु कार्यकारणभावाचा नियम सर्वत्र चालतो आहे हे विसरता कामा नये.

गीतेचा संदेश सांप्रदायिक नाही, एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या पंथाला उद्देशून नाही.  गीतेचा संदेश विश्वव्यापी आहे, सर्व काळातील, सर्व लोकांसाठी आहे, तो ब्राह्मणांसाठी आहे, तो परित्यक्तांसाठी आहे.  गीतेतला ईश्वर सांगतो, ''सारे मार्ग माझ्याकडेच येतात.''  गीतेतील या विश्वव्यापी दृष्टीमुळे सर्व वर्गाना, सर्व पंथांना ती मान्य आहे.  जिज्ञासा व शोध या कामी दिसणारी तळमळ, चिंतन व प्रत्यक्ष कृती, विरोध किंवा संघर्ष चालू असतानाही मनाचा तोल संभाळून समन्वय साधणे असे विविध गुण गीतेच्या अंतरंगात भरलेले आहेत; त्यामुळे काळ बदलला तरी गीता जुनी टाकाऊ कधी होत नाही व त्या त्या काळात अनुरूप असे नवेनवे निर्माण करण्याची गूढ शक्ती, चिरंतन तत्त्व गीतेत आहे.  विवेचनात समतोलपणा राखून विविध वादांतून एक सारतत्त्व काढले आहे.  परिस्थिती बदलली तरी परिस्थितीला भिऊन पळून जाऊन जीव बचावण्याची खटपट करण्यापेक्षा जशास तसे होऊन त्या बदललेल्या परिस्थितीवर मात करावी अशी गीतेची वृत्ती आहे.  गीतेचा अवतार झाल्यापासून गेल्या अडीच हजार वर्षांत भारतीय जनता घडामोड, उन्नती, अवनती या चक्राच्या फेर्‍यात कितीदातरी फिरत राहिली आहे.  नवेनवे अनुभव, नवेनवे विचार सारखे येत राहिले, परंतु अशा प्रत्येक प्रसंगी भारतीय जनतेला गीतेत असे काही जिवंत पाणी सापडत गेले आहे की, ते नव्या वाढत्या विचाराला मानवत गेले व आध्यात्मिक संकटाने वेळोवेळी व्याकुळ होणार्‍या मनाला ते पाणी ताजे व योग्य असेच निघाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel