कुशान हे हिंदीच झाले होते.  हिंदी संस्कृतीचे ते पुरस्कर्ते होते.  परंतु कुशानांच्या सत्तेला विरोध करणारा एक राष्ट्रीय अंत:प्रवाह वाहत होता, आणि जेव्हा पुढे आणखी नवीन टोळ्या हिंदुस्थानात घुसू लागल्या तेव्हा या विदेशी विरोधी राष्ट्रीय प्रवाहाला चांगलेच जोरदार रूप आले.  इ. सनाच्या चौथ्या शतकात चंद्रगुप्त नावाचाच दुसरा एक मोठा राज्यकर्ता उदयाला आला.  त्याने या विदेशीयांना पिटाळले आणि पुन्हा एका सर्वव्यापी बलाढ्य साम्राज्याची त्याने स्थापना केली.

अशा रीतीने साम्राज्यशाही गुप्त राजवट इ.सन ३२० मध्ये जी सुरू झाली तिच्यात एकामागून एक अनेक थोर राज्यकर्ते झाले, व ते युध्दाच्या आणि शांतीच्या दोन्ही कलांत प्रवीण निघाले.  परकीयांच्या पुन: पुन्हा होणार्‍या आक्रमणामुळे विदेशी-विरोधी भावना देशात बळावली होती.  स्वत:चा देश आणि स्वत:ची संस्कृती यांच्या संरक्षणासाठी जुन्या ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्गांना पुन्हा नीट विचार करणे प्राप्त होते.  ज्या विदेशीयांचा पूर्वीच समावेश करून घेण्यात आलेला होता, त्यांना तसेच राहू दिले; परंतू इतर परकीयांना सक्त विरोध करण्यात आला, आणि जुन्या ब्राह्मणी ध्येयांना अनुसरून नव्या सुसंघटित एकजिनसी अशा राज्याचा पाया घालण्यात आला.  परंतु पूर्वीचा तो आत्मविश्वास जात चालला होता, आणि वाटेल ते आले तरी त्याला खुशाल येऊ देऊन पचवून टाकण्याच्या त्या बेडर ब्राह्मणी ध्येयांना विसंगत अशी, कडक कोंडी करून राहण्याची वृत्ती बळावली.  अंतर्बाह्य संकोचवृत्ती दिसू लागून भारत पुन्हा एवढ्याशा शिंपेच्या कवचात शिरून बसलेला दिसला.

परंतु हे कवचही लहानसहान नव्हते.  ते खूप खोल होते, लांब रुंद होते.  आर्यावर्तात— या भारतवर्षात आर्य आल्यापासून स्वत:चा मानववंश आणि स्वत:ची संस्कृती यांचा या देशातीलच आधीच्या लोकांच्या वंशाशी आणि संस्कृतीशी समन्वय करण्याचा प्रश्न सदैव असे.  त्या प्रश्नाला त्या लोकांनी वाहून घेऊन तो प्रश्न उत्तम रीतीने सोडविला होता व हिंदी-आर्य संस्कृती निर्मून भक्कम जोड पाया घातला होता.  नंतर आणखी विदेशीय बाहेरून आले, त्यांचाही समावेश करून घेण्यात आला, व त्यामुळे फारसा फरक पडला नाही.  व्यापारामुळे आणि इतर काही कारणांनी जरी भारतीयांचा अन्य देशांशी वरचेवर संबंध येई तरी ते विशेषत: भारतातच चाललेल्या अंतर्गत घडामोडीत गर्क होते, म्हणून अन्यत्र ज्या घडामोडी होत, त्यांच्याकडे ते फारसे लक्ष देत नसत.  परंतु ह्या सुमारास विचित्र चालीरीतींचे विचित्र लोक सारखे पुन:पुन्हा नित्यक्रमाने देशात येऊ लागले.  त्यामुळे भारत जागा झाला.  या घडामोडींकडे, वावटळींकडे अत:पर डोळेझाक करणे शक्य नव्हते; कारण भारतीयांची राजकीय घडीच यामुळे विस्कळीत झाली असे नव्हे, तर त्यांच्या सांस्कृतिक ध्येयांना आणि सामाजिक संस्थांनाही धोका उत्पन्न झाला होता.  त्या धोक्याला तोंड देताना भारतात झालेली प्रतिक्रिया विशेषत: राष्ट्रीय स्वरूपाची होती, व राष्ट्रीय भावनेचे सामर्थ्य व संकुचितपणा दोन्ही तीत आली.  त्या वेळी चालू असलेल्या भारतीय जीवनातील एकूण एक अंगोपांगातील प्रत्येक गोष्टीत प्रमाण मानला जाणारा धर्म आणि तत्त्वज्ञान, इतिहास आणि परंपरा, चालीरीती आणि सामाजिक रचना या सर्वांच्या समुच्चयाने बनलेला एक विशाल धर्म (ज्याला ब्राह्मणी धर्म म्हणता येईल, व जो पुढे हिंदू धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला) राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरला.  हा खरोखर राष्ट्रधर्म ठरला होता.  आजकालच्या सर्व देशांच्या राष्ट्रभावनेत ज्याप्रमाणे सर्वत्र वांशिक आणि सांस्कृतिक वृत्तिप्रवृत्तींना चेतविण्यात येते, त्याचप्रमाणे त्या वेळेस त्या भारतीय राष्ट्रधर्मात चेतना होती.  हिंदी विचाराचेच अपत्य व जो बौध्दधर्म त्याला राष्ट्रीय पार्श्वभूमी होती. जेथे बुध्द जन्मले, प्रचार करते झाले, निर्वाणाप्रत गेले ती हिंदभूमीच बौध्दधर्माची पुण्यभूमी होती; तसेच बौध्दधर्मातील थोर संत आणि पंडित झाले, त्यांनी त्या धर्माचा सर्वत्र प्रसार केला.  परंतु बौध्दधर्म हा आंतरराष्ट्रीय होता, विशेषकरून तो जागतिक धर्म होता; आणि जसजसा तो सर्वत्र पसरत गेला तसतसे त्याचे हे स्वरूपही वाढत गेले.  आणि म्हणून हिंदूस्थानात जेव्हा जेव्हा राष्ट्राभिमानाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा राष्ट्राचे प्रतीक म्हणून पुरातन ब्राह्मण धर्मच— हा सर्वसंग्राहक राष्ट्रधर्मच सर्वांच्या समोर उभा राही आणि ते नैसर्गिकही होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel