प्राचीन हिंदी-आर्य युध्दनीतीचे कडक नियम होते, त्यात अधर्मयुध्द निषिध्द मानले जाई.  न्याय्य हेतूने सुरू झालेले युध्द न्याय्य मार्गांनीच चालविले पाहिजे असा दंडक होता.  प्रत्यक्ष व्यवहारात हा युध्दधर्म कितपत पाळला जात असे ते वेगळे.  विषारी बाण व लपविलेली शस्त्रे वापरायला परवानगी नव्हती; झोपलेले तसेच शरणागत व निराधार यांचेही प्राण घ्यायचे नाहीत असा नियम होता.  सुंदर इमारतींचा नाश करावयाचा नाही असे सर्वत्र सांगितलेले असे.  परंतु चाणक्याच्याच काळात या सर्व नीतिनियमांत बदल होत होते असे दिसते.  शत्रूचा पराजय करण्यासाठी जरूर पडलीच तर भयंकर शस्त्रास्त्रेही वापरावी, गुप्त रीतीचाही अवलंब करावा असे तो म्हणतो.

चाणक्याच्या अर्थशास्त्रात युध्दप्रकरण जेव्हा येते तेव्हा त्यात एकदम शंभरांचा प्राण घेणारे यंत्र, किंवा काही स्फोटके यांचे उल्लेख आहेत.  खंदकांच्या लढाईचाही तो उल्लेख करतो.  या सर्व गोष्टींचा आज नीट उलगडा लावता येत नाही.  कदाचित अतिप्राचीन काळातील जादूच्या पराक्रमांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना उद्देशून हे लिहिले असावे.  बंदुकीची दारू असेल असे म्हणायला पुरावा नाही.

हिंदुस्थानच्या प्रदीर्घ इतिहासात युध्दे, दुष्काळ, आग यांनी कितीतरी वेळा विध्वंस झाला.  देशातल्या देशात अंदाधुंदी माजली, परंतु इतिहासाकडे आपण व्यापक दृष्टीने पाहिले तर युरोपपेक्षा एकंदरीत शांतीची-सुव्यवस्थित जीवनाची अशी मधूनमधून अनेक शतके लाभलेली दिसतात.  तुर्की आणि अफगाण लोकांच्या स्वार्‍यांनंतरच्या शतकांतही थेट मोगल साम्राज्य मोडू लागेपर्यंत आपणास ही गोष्ट दिसून येईल.  ब्रिटिश सत्तेनेच इतिहासात प्रथम शांती आणि सुव्यवस्था आणिली ही कल्पना म्हणजे एक मोठा विचित्र भ्रम आहे.  ज्या वेळी ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात दृढमूल झाली त्या वेळी हा देश अत्यंत ओहोटीस लागला होता.  राजकीय व आर्थिक इमारत पार ढासळून जात होती.  ही गोष्ट खरी आणि म्हणून तर ब्रिटिश सत्ता येथे दृढमूल झाली.

स्वातंत्र्याची हिंदी मनातील प्रेरणा

झंझावातापुढे नमविले प्राग्देवीने शीर आपुले ।
धीरवृत्तीने तुच्छ दृष्टीने एकवार त्या निरीक्षिले ।
भूमी थरथर कापविणार्‍या अक्षौहिणींना जाऊ दिले ।
शांत मनाने पुन्हा चिंतनी चित्त आपुले स्थिर केले ।

असे का कवीने म्हटले आहे.  हे चरण पुन:पुन्हा उद्‍धृत करण्यात येतात.  हे खरे आहे की, पूर्वेला त्यातल्या त्यात भारत या नावाच्या देशाला चिंतन फार प्रिय झाले आहे; आणि तेही पुन्हा अशा विचारांचे की जे विचार स्वत:ला व्यवहारी समजणार्‍या लोकांना मूर्खपणाचे आणि अप्रयोजक वाटतात.  भारताने विचारांची आणि विचारवंतांची, ज्ञानाची आणि ज्ञानधनाची सदैव पूजा केली आहे.  धनिकांना आणि तरवारबहाद्दरांना त्याने तितका मान कधी दिला नाही.  अवनतीच्या काळीसुध्दा त्याने विचारधन हृदयाशी धरून ठेवले, आणि त्यातच त्याला थोडे समाधान लाभले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel