आश्चर्य हे की, मध्ययुगातच नव्हे, तर आता आतापर्यंतही संस्कृत नाटकाची परंपरा टिकून राहिली आहे.  शेक्सपिअरच्या 'मधुयामिनी स्वप्न' या नाटकाचे संस्कृत रूपांतर १८९२ मध्ये प्रसिध्द झाले.  जुनी संस्कृत नाटके सारखी उपलब्ध होतच आहेत.  प्रो. सिल्व्हॉ लेव्ही यांनी १८९० मध्ये १८९ नाटककारांच्या ३७७ नाटकांची यादी तयार केली होती.  अगदी अलीकडील यादीत ६५० नाटके आहेत.

कालिदासाच्या आणि इतरही प्राचीन नाटककारांच्या नाटकात संस्कृत आणि संस्कृतोद्भव प्राकृत अशा दोन्ही भाषा आहेत.  त्याच नाटकातील सुशिक्षित पात्रे संस्कृत भाषा बोलतात आणि इतर सामान्य पात्रे, विशेषत: सर्व स्त्रीपात्रे त्याच नाटकात प्राकृत भाषा बोलतात.  थोडेसे अपवाद आहेत, परंतु सर्वसाधारणपणे स्त्रियांना व सामान्य अशिक्षित पात्रांना प्राकृत भाषा असा नियम दिसतो.  काव्यमय रचना, श्लोक, गीते नाटकांत पुष्कळशी आहेत.  ती संस्कृतात आहेत.  या संमिश्रणामुळे नाटके बहुजनसमाजाच्याही अवाक्यात येत.  वाङ्मयीन भाषा आणि जनतेच्या कलेची मागणी यांची ही तडजोड होती.  तथापि एकंदरीत संस्कृत नाट्यकला ही प्रामुख्याने प्रतिष्ठितांची होती, असेच म्हणणे प्राप्त आहे.  बुध्दिमान प्रेक्षकांसमोर बहुतेक राजदरबारात त्यांचे प्रयोग होत.  सिल्व्हॉ लेव्हीने संस्कृत नाट्यकलेची फ्रेंच शोकान्त नाटकांशी तुलना केली आहे.  विषयांची निवडच अशी असे की, बहुजनसमाजाचा त्यांच्याशी संबंध नसे.  प्रत्यक्ष जीवनापासून ही कला दूर जात चालली, त्यात दाखविलेला समाज कृत्रिम असे.

परंतु वरिष्ठ वर्गाची ही रंगभूमी सोडली तर बहुजनसमाजाचीही एक रंगभूमी कायम चालू होती.  तेथे प्राचीन महाकाव्यातील निरनिराळ्या कथानकावरची नाटके केली जात.  नाना आख्यायिका, दंतकथा, पौराणिक गोष्टी-यांतून कथानके मिळत ती बहुजनसमाजाला माहीत असत.  या नाट्यप्रयोगांतून अभिनय किंवा नाट्यतंत्रापेक्षा घडलेले प्रसंग प्रत्यक्ष दाखविण्याकडेच जास्त लक्ष दिले जाई.  त्या त्या प्रदेशातील लोकांच्या भाषेतच ही नाटके असल्यामुळे, त्या त्या प्रदेशातच ती चालत.  संस्कृत नाटके मात्र हिंदुस्थानभरच्या सुशिक्षितांच्या भाषेत असल्यामुळे सर्वत्र चालत व देशभर त्यांचा प्रचार होई.

संस्कृत नाटके रंगभूमीवर अभिनय करून दाखविण्यासाठीच असत.  म्हणून रंगभूमीसंबंधीच्या नाना सूचना त्यात सविस्तर दिलेल्या आढळतात व प्रेक्षकांना कसे बसवावे त्याचे नियमही दिलेले आहेत.  ग्रीस देशात स्त्रिया नाटकात काम करीत नसत, परंतु हिंदुस्थानात स्त्रियाही भूमिका घेत.  ग्रीक व संस्कृत दोन्ही नाटकांतून आपण व्यापक निसर्गातील एक भाग आहोत.  सभोवती सर्वत्र सृष्टी आहे, याचा विसर पडलेला दिसत नाही.  सृष्टीशी सतत संबंध आहे.  नाटकातून काव्याचा भाग खूप आहे व ते काव्य अर्थगंभीर व सूचक असून जीवनाचा सहजस्फूर्त नैसर्गिक भाग आहे असे वाटते.  पुष्कळ प्रसंगी त्या काव्याचे गायन चाले.  ग्रीक नाटके वाचताना तिकडील चालीरीती, जीवन, विचार यांचे दर्शन होताना एकदम आपणांस हिंदी जीवनाची, प्राचीन हिंदी चालीरीतींची आठवण येते.  असे असले तरी ग्रीक नाट्यकला भारतीय नाट्यकलेपेक्षा निराळी आहे, स्वतंत्र्य आहे.

ग्रीक नाट्याचा मुख्य मूलभूत विषय मानवी जीवनातील अरिष्ट, त्या जीवनाचे शोकपर्यवसान हा आहे.  मनुष्याला क्लेश, यातना का भोगाव्या लागतात ?  जगात पाप, अरिष्ट काय म्हणून ?  धर्म ईश्वर हे अज्ञात गूढ आहे काय ?  मानवी जीवन किती केविलवाणे, दीनवाणे, किती क्षणभंगुर !  सभोवती सर्वशक्तिमान अशा नियतीची निष्ठुर लीला सुरू आहे आणि हे क्षणाचे लेकरू दृष्टिहीन, हेतुशून्य, दुबळे बापडे, त्या सर्वसमर्थ दैवाविरुध्द धडपडत असते.  ''दैवाचा कायदा अभांग आहे, तो बदलत नाही, जुना होत नाही.''  मनुष्याने अपत्तीतूनच शिकले पाहिजे.  दैव अनुकूल असेल तर तो यशस्वी होईल, धडपडीतून डोके वर काढील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel