भारतीय कलेचा बाहेरच्या देशांवर पडलेला प्रभाव

प्राचीन साम्राज्यांचे आणि राजघराण्यांचे हे वृत्तांत प्राचीन इतिहास-संशोधकांना मनोरंजक वाटतील; परंतु संस्कृती आणि कला यांच्या इतिहासात या गोष्टींचे महत्त्व विशेष आहे.  हिंदुस्थानच्या दृष्टीने तर या गोष्टींना अधिकच महत्त्व आहे.  कारण तेथे स्वत: भारत देशच नाना स्वरूपात काम करीत होता; स्वत:चे चैतन्य व बुध्दी विविध मार्गांनी प्रकट करीत होता.  भारताच्या उत्साहाची भरती देशातल्या देशात मावेनाशी होऊन त्या भरतीच्या लाटा दूरवर पसरत होत्या, व त्या लाटांबरोबर नसते विचारधनच नव्हे, तर भारताची इतर ध्येये, कला, व्यापार, भाषा व वाङ्मय, राज्यपध्दती हीही पसरत चालली होती.  भारत गतिरहित मंद झालेला नव्हता.  सभोवताच्या सागरामुळे किंवा पर्वतामुळे तो जगापासून वेगळा पडला नव्हता, त्याचा जगाशी संबंध तुटला नव्हता.  उंच उर्वत पदाक्रांत करून संकटपूर्ण सागर ओलांडून भारतीयांना बृहद्-भारताचे विशाल मंदिर उभे केले.  एम्. नेने. ग्राऊसेट म्हणतो, ''हा बृहद्-भारत विशाल ग्रीसप्रमाणेच राजकीय दृष्ट्या फारसा संघटित नव्हता.  परंतु नैतिक दृष्ट्या अत्यंत सुसंवादी आणि सुसंबध्द होता.  खरे पाहिले तर भारतीय राज्याचा एक प्रत्यक्ष भाग म्हणून समावेश नसलेली मलेशियाची ही राज्ये-साम्राज्येही राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने अती उच्च दर्जाची, नीट व्यवस्थित, सुसंघटित होती.  ती स्वतत्र असूनही भारतीय होती.''  भारतीय संस्कृती मलेशियाखेरीज दूरवर कशी कोठे इतरत्र पसरत गेली ते ग्राऊसेटने सांगितले आहे.  ''पूर्व इराणच्या उंच पठारावर, सरहिंदच्या प्रदेशात, तिबेट, मंगोलिया आणि मांचुरियाच्या रेताड वाळवंटात, चीन-जपानच्या प्राचीन सुसंस्कृत देशांत, मलाया-पॉलिनेशियाच्या भागात, इंडोनेशियात सर्वत्र हिंदी संस्कृती गेली; तेथील धर्मावरच नव्हे, तर तेथील कला, वाङ्मय-थोडक्यात म्हणजे आत्मप्रकटीकरणाच्या सर्व उच्चतर प्रांतात भारतीय संस्कृतीने आपला ठसा कायम उमटवून ठेवला.''*

विशेषेकरून आग्नेय आशियातील देशांत हिंदी संस्कृतीने चांगलेच मूळ धरले.  या सर्व भागांत याचे पुरावे ठायी ठायी दिसतात.  चंपा, अंग्कोर, श्रीविजय, मजपहित इत्यादी ठिकाणी संस्कृत विद्येची मोठी केन्द्रे होती.  तेथे स्थापन झालेल्या निरनिराळ्या राज्यांतील, साम्राज्यांतील राजांची नावे शुध्द भारतीय आहेत, संस्कृत आहेत.  ते राजे शुध्द भारतीय होते असे नव्हे, परंतु त्यांच्यावर भारतीय संस्कृतीचे संस्कार इतके होते की ते मूळचे नसले तरी संस्कृतीने, विचाराने भारतीय झाले होते.  राज्य-महोत्सव भारतीय असत आणि समारंभांचे मंत्र वगैरे विधींची भाषा संस्कृत असे.

-------------------------

* रेने गाऊसेट 'पूर्वेच्या संस्कृती', खंड दुसरा, पृष्ठ २७६.

राज्यातील अधिकार्‍यांची नावे संस्कृत आहेत आणि त्यांच्या पदव्या व अधिकार दाखविणारी काही संस्कृत नावे आजही थायलंडमध्ये आणि मलायाच्या मुस्लिम भागातही आहेत.  इंडोनेशियातील प्राचीन साहित्यात भारतीय पुराणे व आख्यायिक खच्चून भरल्या आहेत.  जावा आणि बाली द्वीपांतील सुप्रसिध्द नृत्यप्रकार भारतीय आहेत, एवढेच नव्हे, तर लहानशा बाली बेटाने आपली प्राचीन भारतीय संस्कृती अर्वाचीन काळापर्यंत सांभाळली.  हिंदुधर्मही तेथे टिकून राहिला.  फिलीपाईन्समध्ये लेखनकला हिंदुस्थानातूनच गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel