या काळातच इकडे भावाशी यादवी करून, स्वत:च्या बापाला कैद करून औरंगजेब गादीवर आला. अकबरासारख्या एखाद्या महापुरुषालाच काळाचा रागरंग ओळखता आला असता व नवीन शक्ती उदयाला येत होत्या त्यांना आपल्या कह्यात ठेवता आले असते. अकबरासही आपल्या साम्राज्याची अखेरी फार तर थोडे पुढे ढकलता आली असती. जी नवीन तंत्रे पुढे येत होती, आर्थिक परिस्थितीत जे बदल हात होते, त्यांचे महत्त्व समजून घेण्याकडे मात्र जर अकबराची जिज्ञासा, त्याची ज्ञानलालसा वळली असती तरच हा प्रसंग कदाचित टळता. औरंगजेब समोरची वर्तमानकालीन परिस्थिती समजू शकत नव्हात, एवढेच नव्हे, तर त्याला जवळच्या भूतकालाचेही आकलन होऊ शकले नाही. एखादे घराणे सुधारून पिढ्यांपुढची पिढी जास्त सुधारत असता मध्येच एखादा वंशज कैक पिढ्यांच्या मागच्या वृत्तीचा निघावा तसा औरंगजेब होता व इतका बुध्दिमान व कळकळीने सतत काम करणारा असूनही त्याच्या अगोदरच्या राजांनी केलेले कार्य त्याने मोडून टाकण्याचा प्रयत्न केला. तो धर्मांध होता व वृत्तीने प्रखर विरक्त होता त्यामुळे कला व साहित्य असल्या प्रकारांचे व त्याचे कधीच जमले नाही. लोकांना जिझिया कराची मोठी चीड होती. तो जुना जिझिया कर त्याने पुन्हा बसविला व हिंदूंची अनेक मंदिरे त्याने उद्ध्दस्त केली. यामुळे त्याची बहुसंख्य प्रजा संतापली. मोगल साम्राज्याचे रजपूत हे आधार होते. परंतु औरंगजेबाने त्या मानधन लोकांना दुखावले. उत्तरेकडे शिखांना त्याने चेतविले. हिंदू व इस्लामी धर्ममतांचा एक प्रकारे समन्वय शीख पंथात होता. हे शीख शांतिप्रधान होते. परंतु छळामुळे आणि दडपशाहीमुळे ते अत:पर लढवय्ये झुंजार होऊन त्यांचा लष्करी पंथ झाला. हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्यालगत प्राचीन राष्ट्रकूटांचे वंशज लढवय्ये मराठे होते त्यांचाही त्याने राग ओढवून घेतला, आणि याच सुमारास मराठ्यांत एक तेजस्वी, महान सेनानी निर्माण झाला होता.
मोगल साम्राज्यातील विस्तृत प्रदेशावर एक प्रकारची खळबळ होत होती व पुनरुज्जीवनाचा लोकांच्या अंगात संचार होऊन तो वाढत होता. हे पुनरुज्जीवन धर्म व राष्ट्रीयता यांचे मिश्रण होते. तत्कालीन राष्ट्रीयता केवळ राजकीय स्वरूपाची नव्हती; अर्वाचीन राजकीय राष्ट्रीयतेची कल्पना तेव्हा नसेलही. शिवाय त्या राष्ट्रीयतेच्या समोर सर्व हिंदुस्थानही नसे. सरंजामशाही कल्पना, स्थानिक भावना, पांथिक, धार्मिक विचार या सर्वांचे ते एक मिश्रण होते. इतरांपेक्षा अधिक सरंजामशाही वृत्तीचे जे रजपूत ते आपापल्या वंशांना, कुळांना चिकटून असत. त्यांची सारी निष्ठा तेथे केंद्रित झालेली असे. पंजाबातील शिखांची संख्या फारशी मोठी नव्हती. ते स्वसंरक्षणात गर्क होते. पंजाबच्या बाहेर बघायला त्यांना वेळ नव्हता; बघणे शक्यही नव्हते. परंतु धर्म हीच एक प्रबळ अशी राष्ट्रीय पार्श्वभूमी होती. आणि धर्माच्या परंपरा सर्व हिंदुस्थानला व्यापून होत्या; सर्व देशांशी त्यांचा संबंध होता. प्राध्यापक मॅडोनेल लिहितो, ''हिंदी-युरोपियन कुटुंबातील लोकांपैकी राष्ट्रीय धर्म असा हिंदुस्थानातील लोकांनाच निर्माण करता आला, आणि विश्वधर्मही त्यांनीच दिला. ब्राह्मणीधर्म हा त्यांचा राष्ट्रधर्म होता; बौध्दधर्म हा जागतिक धर्म होता. या कुटुंबातील इतर कोणत्याही लोकांना स्वत:चा असा धर्म निर्माण करता आला नाही. त्यांनी दुसर्याचाच धर्म शेवटी घेतला.'' तत्कालीन राष्ट्रीयतेत धर्म आणि देशभक्ती यांची सांगड घातल्याने दोन्ही भावानांना बळी चढले, ऐक्यही वाढले, परंतु या राष्ट्रीयतेत अखेरीस आलेला दुबळेपणा व उणेपणा ही अशी सांगड घातल्यामुळेच आला. कारक अशी राष्ट्रीयता सर्वसंग्राहक होऊ शकत नाही; ती अपुरी व असंग्राहक अशी होते, कारण धर्माच्या क्षेत्राच्या बाहेर असलेल्या हिंदुस्थानातील अनेक गटांचा या राष्ट्रीयतेत समावेश होऊ शकत नाही. हिंदू राष्ट्रवाद ही एक या राष्ट्रभूमीतील नैसर्गिक अशी वस्तू होती; परंतु धर्मभेद व पंथभेद यांच्या अतीत असणार्या व्यापक राष्ट्रीयतेच्या आड ही राष्ट्रीयता येते.
एका बलाढ्य साम्राज्याचे तुकडे होत होते, सर्वत्र मोडतोड होत होती, अनेक देशीविदेशी साहिसी लोक स्वत:पुरती छोटी छोटी राष्ट्रे निर्मू पाहात होते, अशा या काळात आजच्या अर्थाने राष्ट्रवाद कोठेच दिसत नाही ही गोष्ट खरी. जो तो साहसी, पराक्रमी मनुष्य स्वत:ची सत्ता वाढविण्यात मग्न असे, तो तो संघ स्वत:पुरते केवळ पाही. त्या काळाचा जो काही इतिहास लिहिलेला आहे, त्यात या अशा साहसी लोकांच्याच कथा आहेत. परंतु वरच्या घडामोडीखाली समाजात जे महत्त्वाचे फेरबदल होत होते त्यासंबंधी त्या इतिहासात काही दिसणार नाही. परंतु तत्कालीन साहसी लोकांच्या हालचालीत केवळ साहसीपणा होता असे नाही. महत्त्वाकांक्षा, सत्ता, साहस यांचाच पगडा अधिक दिसला तरी मधूनमधून काही उदात्तता, ध्येयात्मताही दिसते. विशेषत: मराठ्यांची दृष्टी अधिक विशाल होती, आणि सत्तावाढीबरोबर त्यांची दृष्टीही अधिकच वाढत गेली. १७८४ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने पुढीलप्रमाणे लिहिले आहे. ''उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातील लोकांपैकी फक्त मराठ्यांजवळ राष्ट्रीय भक्तीची भावना आहे. सर्व मराठ्यांच्या मनावर ही भावना बिंबलेली आहे आणि त्यांच्या सत्तेला जर मोठा धोका आला तर ते सारे एकजुटीने एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत.'' परंतु मराठ्यांची ही राष्ट्रीय भावना बहुधा मराठी बोलण्यापुरतीच मर्यादित होती, परंतु काही असले तरी राजकीय त्याचप्रमाणे लष्करी बाबतीत आणि इतरही चालीरीतींत मराठ्यांची दृष्टी उदार व व्यापक होती, आणि आपसांतही त्यांच्यात एक प्रकारची लोकशाही होती. यामुळे ते बलवान झाले, समर्थ झाले. औरंगजेबाशी लढत असूनही शिवाजीने नि:शंकपणे मुसलमानांस आपल्या नोकरीस ठेविले होते.