नादिरशहाच्या स्वारीचा दुसरा परिणाम म्हणजे अफगाणिस्थान हिंदुस्थानपासून अलग झाला.  कितीतरी शतके अफगाणिस्थान हिंदुस्थानचा भाग म्हणून होता.  परंतु तो आता तोडला जाऊन इराणच्या राज्याला-नादिरशहाच्या राज्याला —जोडला गेला.  पुढे काही काळाने एक स्थानिक बंड होऊन नादिरशहाचा त्याच्याच काही अंमलदारांनी खून केला व अफगाणिस्थान स्वतंत्र झाले.

नादिरशहामुळे मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागला नव्हता, ते पंजाबपर्यंत पसरत गेले.  परंतु १७६१ मध्ये अफगाणिस्थावर राज्य करणार्‍या अहमदशहा दुराणीने स्वारी केली. त्यात-पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पुरा मोड झाला.  त्या घोर आपत्तीत मराठ्यांच्या सैन्यातले निवडक लष्कर गारद झाले, त्यांचे हिरे-मोती हरपले.  क्षणभर साम्राज्याची त्यांची स्वप्ने अस्तास गेली; परंतु हळूहळू पुन्हा त्यांनी डोके वर केले व मराठी राज्य अनेक स्वतंत्र अशा लहान लहान राज्यांत विभागले जाऊन या स्वतंत्र मराठे अधिपतींनी पुण्याच्या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली एक संघराज्य स्थापून एकजूट केली.  मोठमोठ्या राज्यांचे मालक शिंदे, होळकर, गायकवाड हे होते.  मध्य व पश्चिम हिंदुस्थानात काही काळ हे संघराज्य प्रभावी राहिले, परंतु पानिपतच्या पराजयामुळे मराठे नेमके ज्या वेळेस दुबळे झाले त्या वेळेसच इंग्लिश कंपनी एक महत्त्वाची सत्ता म्हणून उदयास येत होती.

कधीकधी हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ १७५७ पासून धरतात.  त्या साली क्लाईव्हने बनावट लेख व फंदफितुरी करून फारशी लढाई न करता प्लासीची लढाई जिंकली होती.  राज्याचा हा आरंभ कडू होता, त्या राज्याला त्या वेळेपासून पुढे काहीतरी कडवटपणा चिकटून राहिला आहे.  लौकरच सगळा बंगाल व बिहार ब्रिटिशांनी घेतले.  त्यांच्या नवसत्तेच्या आरंभीच इ.स. १७७० मध्ये या दोन्ही प्रांतांत भयंकर दुष्काळ पडून समृध्द, विस्तृत घनदाट वस्तीच्या या प्रांतातील तिसरा हिस्सा प्रजा दुष्काळात मेली. 

दक्षिण हिंदुस्थानात ब्रिटिश आणि फ्रेंच यांची झटापट चालू होती.  जगभर त्यांची दोघांची जी लढाई चालली होती, तिचाच येथील लढाई हा एक भाग होता.  शेवटी ब्रिटिश विजयी झाले आणि हिंदुस्थानातून फ्रेंच जवळजवळ पार नाहीसे झाले.

फ्रेंचांचा निकाल लागल्यावर हिंदी अधिसत्तेसाठी तीन सामनेवाले उरले : मराठी संघराज्य, दक्षिणेकडील हैदर आणि ब्रिटिश.  ब्रिटिश प्लासीस विजयी होऊन बंगालबिहारवर त्यांचा कबजा बसला होता, तरीही सर्व हिंदुस्थानवर उद्या हे राज्य करतील, ही एक प्रभावी सत्ता आहे असे हिंदुस्थानात कोणासच वाटले नाही.  मध्य व पश्चिम हिंदुस्थानात मराठे मातबर होते, दिल्लीपर्यंत त्यांचा बोलबाला होता, त्यांचे धैर्य लोकोत्तर होते; त्यांचे शौर्य लोकविश्रुत होते, म्हणून हिंदुस्थानचे अधिराजे मराठेच होणार असे त्यांच्याकडे बोट करून कोणीही त्या वेळेस म्हटले असते.  हैदर व टिपू हे दुर्दम्य शत्रू होते, त्यांनी ब्रिटिशांना एकदा चांगलाच हात दाखवून लढाईत त्यांचा पराभव केला होता, आणि ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात येणार असे वाटले.  परंतु हैदर व टिपू यांचा जोर दक्षिणेपुरताच होता, सगळ्या हिंदुस्थानचे भवितव्य ठरवायला त्यांची शक्ती अपुरी होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel