या काळाच्या जरा आधी मोगली साम्राज्याचे जरी तुकडे पडले होते तरीही हिंदुस्थानातील मोठमोठ्या प्रदेशांत मुळीच अव्यवस्था नव्हती. बंगालचा सुभेदार अलिवर्दी हा जवळजवळ स्वतंत्र म्हणून वागत होता. त्याच्या दीर्घ कारकीर्दीत तेथे व्यवस्थित आणि निर्वेध असे सरकार होते, व्यापार-उदीम भरभराटीत होता, आणि प्रांताची संपत्ती वाढत होती. अलिवर्दीच्या मृत्यूनंतर थोड्या वर्षांनी प्लासीची लढाई झाली. ईस्ट इंडिया कंपनी दिल्लीच्या बादशहाजवळून सनद घेऊन त्याच्या नावे बंगालचा कारभार पाहू लागली. नाममात्र ते दिल्लीची अधिसत्ता मानीत. वाटेल त्या गोष्टी करायला ते मोकळे होते. कंपनीकडून तिच्या हस्तकाकडून बंगालची भयंकर लुटमार सुरू झाली. प्लासीच्या लढाईनंतर काही वर्षांनी इंदूरला अहिल्याबाईची कारकीर्द सुरू झाली (१७६५-१७९५). तिच्या कारकीर्दीत प्रजा सुखी होती. सर्वत्र नीट व्यवस्था होती. राज्यकारभार नीट चालला होता. आदर्श कारभार म्हणजे अहिल्याबाईचा अशी म्हणच पडली. अहिल्याबाई कर्तृत्ववान होती, नीट घडी बसविणारी होती. तिच्याविषयी सर्वांना पूज्यभाव वाटे व मृत्यूनंतर कृतज्ञ प्रजा तिला संत मानू लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या नव्या राजवटीखाली बंगाल आणि बिहार यांना अवकळा, मरणकळा येत होती; संघटित लूटमार चालली होती. राजकीय व आर्थिक साराच सावळागोंधळ होता, परंतु त्याच काळात मध्य हिंदुस्थान आणि इतर भाग हे भरभराटीच्या स्थितीत होते.
ब्रिटिश लोक सत्ता व संपत्ती घेऊन बसले होते, पण चांगल्या राज्यकारभाराची, साध्या व्यवस्थेची त्यांना कधी जबाबदारी वाटली नाही. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी नफा किती मिळतो, खजिना किती मिळतो इकडे लक्ष देत; आपल्या ताब्यात आलेल्या प्रजेची सुधारणा करणे, निदान त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटले नाही. मांडलिक संस्थानांतून तर सत्ता आणि जबाबदारी यांची संपूर्ण फारकतच झालेली होती.
मराठ्यांचा प्रश्न निकालात निघाल्यावर व इंग्रजांना आपण आता स्थिर झालो असे नक्की वाटल्यावर ते राज्यकारभाराकडे थोडे वळले. काहीतरी एक घडी त्यांनी बसविली, परंतु मांडलिक संस्थानांत मात्र सारे आस्ते कदम चालू होते. कारण जबाबदारी आणि सत्ता यांची तेथे कायमची काडीमोड होती.
आपण कदाचित विसरू म्हणून आपणांस पुन:पुन्हा जाणीव करून देण्यात येत असते की, अंदाधुंदी व अराजकता यापासून ब्रिटिशांनी या देशाला वाचविले. ज्या काळाला मराठ्यांनी 'भीषण काळ' असे संबोधले, त्या काळानंतर ब्रिटिशांनी व्यवस्थित सरकार सुरू केले हे खरे. पंरतु गोंधळ व बजबजपुरी, अराजकता व अव्यवस्था जी माजली होती, तिला ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी आणि तिचे प्रतिनिधी यांचे धोरण सर्वांशी नसले तरी काही अंशी कारणीभूत होते. आणि ब्रिटिशांनी आपण होऊन मोठ्या उत्सुकतेने उपकार करायची जी घाई केली, ती ते न करते तरीही एकदा प्रभुत्वाच्या लढ्याचा निकाल लागला असता म्हणजे हिंदुस्थानात शांती आणि सुव्यवस्था स्थापिली गेली असती. इतर देशांतल्याप्रमाणे हिंदुस्थानच्याही पाच हजार वर्षांच्या इतिहासात अशा गोष्टी घडलेल्या आहेत.