जयपूर शहर त्यानेच बांधले. नगर-रचनेचा त्याला नाद होता. तत्कालीन युरोपातील अनेक नगरांचे नकाशे गोळा करून स्वत:च्या नगरीचा नकाशा त्याने स्वत: तयार केला. जयपूरच्या संग्रहालयात जयसिंगाने गोळा केलेले युरोपियन नगरांचे नकाशे अद्यापही दिसून येतील. जयपूर शहराची रचना इतक्या सुंदर रीतीने करण्यात आली होती की, आजही ते शहर आदर्श नगर-रचनेचा नमुना म्हणून मानण्यात येते.
तसे पाहिले तर जयसिंग काही फार वर्षे जगला नाही, परंतु थोड्याशा काळात त्याने कितीतरी केले. आणि आजूबाजूला सदैव लढाया-खडेजंगी; नाना कारस्थाने आणि कारवाया. तोही कधी कधी त्यात गुंतून जात असे. त्याच्या मृत्यूच्या आधी चारच वर्षे नादिरशहाची ती टोळधाड येऊन गेलेली. अशा धामधुमीच्या, अशांत, अस्थिर काळात जयसिंगने हे सरे केले. तो कोठेही आणि कोणत्याही काळी जन्मता तरी नामवंत झाला असता. परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, हिंदी इतिहासातील एका अतिअंधारमय कालखंडात, सर्वत्र उत्पात, विनाश आणि प्रक्षोभ यांचा धिंगाणा चालू असताना; आणि रजपुतान्यासारख्या सरंजामशाही कल्पनांच्या बालेकिल्ल्यात जयसिंग शास्त्रज्ञ म्हणून पुढे आला आणि कार्य करून दाखविता झाला. यावरून एकच गोष्ट दिसून येते की, शास्त्रीय जिज्ञासा वृत्ती या देशात सर्वस्वी मेलेली नव्हती; तिचीही धडपड चालू होती; आणि संधी मिळती, वाढावयाला अवसर मिळता तर शास्त्रीय शोधबोधांचे भरगच्च पीक येथेही आले असले. जयसिंग भलत्या काळात होऊन गेला, किंवा त्यालाच हे विचार येत, आसपासचे कोणीही तिकडे ढुंकून पाहावयाला किंवा आस्थेने विचारपूस करावयाला तयार नव्हते असे मुळीच नव्हे. स्वत:च्या काळाचे तो अपत्य होता व स्वत:बरोबर काम करायला कितीतरी शास्त्रीय सहकारी त्याने गोळा केले होते. त्यांच्यातील काहींना त्याने पोर्तुगालकडे पाठविलेल्या शिष्टमंडळात धाडले. तेव्हा परदेशात लांब आपले लोक कसे पाठवायचे असे त्याच्या मनातही आले नाही व सामाजिक रूढी त्याच्या इच्छेच्या आड आल्या नाहीत. असे वाटते की, त्या वेळेस तत्त्वदृष्टीने व व्यावहारिक तंत्रदृष्टीने शास्त्रीय शोधबोधाचे कार्य करायला देशात पुष्कळच अनुकूलता होती, फक्त कार्य करण्याची संधी मिळायला हवी होती. परंतु कितीतरी काळ ती संधी मिळालीच नाही, आणि देशातील अव्यवस्था व गोंधळ संपल्यावरही, ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी शास्त्रीय संशोधनकार्यास कधी उत्तेजन दिले नाही.
भारताची आर्थिक पार्श्वभूमी : दोन इंग्लंडे
हे दूरगामी राजकीय फेरबदल देशात होत असता येथील आर्थिक परिस्थिती कशी बरे होती ? तिची पार्श्वभूमी कशी होती ? व्ही. अॅन्स्टेने लिहिले आहे की, ''अठराव्या शतकापर्यंत तरी हिंदी उत्पादनपध्दती आणि हिंदी औद्योगिक व्यापारी संघटन जगातील कोणत्याही भागाशी तुलना केली असता समबल ठरली असती.'' हिंदुस्थान माल तयार करण्याच्या बाबतीत चांगलाच पुढारलेला देश होता. युरोपाला व आणखी इतर देशांना तो स्वत:चा तयार माल पाठवी. पेढ्यांची पध्दती परिपूर्ण होती आणि सर्व हिंदुस्थानभर ती पसरली होती, व मोठमोठ्या पेढीवाल्यांच्या, व्यापार्यांच्या हुंड्या देशात कोठेही वटविल्या जात असत. हिंदुस्थानातच नव्हे, तर इराण, काबूल, हिरात, ताश्कंद आणि मध्य आशियातील अन्य शहरे येथेही या हुंड्या स्वीकारल्या जात. व्यापारी भांडवल उत्क्रांत होत होत, आणि दलाल, अडत्ये, मुकादम इत्यादींचे एक भरगच्च नीट संघटन उभे राहिलेले होते. गलबते बांधण्याचा धंदा चांगलाच भरभराटलेला होता आणि नेपोलियनजवळच्या आरमारी लढाईतील एका इंग्रज दर्यासारंगाचे मुख्य गलबत हिंदुस्थानात बांधलेले होते, एका हिंदी व्यापारी संधाने हे बांधून दिलेले होते. औद्योगिक क्रांती होण्याच्या आधी इतर कोणत्याही देशाइतपत हिंदुस्थानही व्यापारी दृष्ट्या, औद्योगिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या पुढारलेला देश होता. स्थिर आणि निर्वेध असा राज्यकारभार दीर्घकाल मिळाल्याशिवाय. तसेच दळणवळणासाठी, व्यापारासाठी खुष्कीचे त्याचप्रमाणे दर्यावरचे मार्ग मोकळे असल्याशिवाय अशी वाढ करून घेता आली नसती.