ब्रिटिश सत्तेचे दृढीकरण आणि राष्ट्रीय चळवळीचा उदय

साम्राज्यशाही विचारसरणी : एक नवीन जात


हिंदुस्थान आणि हिंदी इतिहास यांचा चांगला परिचय असलेला एक इंग्रज लिहितो, ''आपण केलेल्या अनेक गोष्टींचा हिंदी लोकांना संताप येतो, परंतु त्यांचा सर्वांत अधिक संताप कशाने होत असेल तर तो आपण लिहिलेल्या हिंदुस्थानच्या इतिहासाने होतो.''  हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवटीत आम्हाला कशाचा अधिक संताप येतो ते सांगणे कठीण आहे, कारण संतापजनक गोष्टींची यादी नाना प्रकारांनी भरपूर भरलेली आहे.  परंतु हे खरे की, ब्रिटिशांनी लिहिलेला हिंदुस्थानचा इतिहास विशेषत: ब्रिटिश अंमल म्हणून ज्याला म्हणतात त्याचा त्यांनी दिलेला वृत्तान्त पाहून फार चीड येते.  इतिहास बहुधा जेत्यांकडून, विजयी आक्रमकांकडून लिहिला जात असतो आणि त्यांचा दृष्टिकोणच त्यात असतो, निदान जे त्यांच्या दृष्टिकोणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले असते, त्यालाच येथे प्राधान्य असते.  हिंदुस्थानातील आर्यांचे जे प्राचीन वृत्तान्त आहेत, जे ग्रंथ आहेत, रामायण-महाभारतादी जी महाकाव्ये आहेत, ज्या दंतकथा व आख्यायिका आहेत, त्यांतून सर्वत्र आर्यांचा गौरव आहे आणि ज्यांना त्यांनी जिंकून घेतले, त्यांचे वर्णन यथायोग्य झाले नसण्याचा संभव आहे.  कोणत्याही व्यक्तीला आपला वंशपरंपरागत दृष्टिकोण, संस्कृतीची बंधने, संपूर्णपणे सोडणे शक्य नाही.  आणि दोन मानववंशांमध्ये, दोन देशांमध्ये जेव्हा विरोध येतो, तेव्हा नि:पक्षपातीपणाचा प्रयत्नही देशद्रोह-स्वजनद्रोह म्हणून मानला जात असतो.  युध्द हे या विरोधाचे आत्यंतिक स्वरूप असते, आणि ते सुरू झाले की शत्रुराष्ट्रासंबंधीचा सर्व नि:पक्षपातीपणा, सारी न्यायबुध्दी यांना तिलांजली देण्यात येत असते.  मनाची ठेवण बिघडून जाऊन दृष्टी अशी एकांगी बनते की दुसर्‍या बाजूने डोक्यात काही शिरणेच अशक्य होते.  आपल्या पक्षाच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करून ती उचलून धरावी व शत्रुपक्ष जे जे करील त्याची निंदा करून त्यावर काळोखी फासावी हा एकच ध्यास मनाला लागतो.  बिचारे सत्य विहिरीच्या तळाशी कोठल्यातरी कानाकोपर्‍यात दडून बसते व असत्याचा निर्लज्ज नंगानाच जिकडे तिकडे बिनदिक्कत चालू असतो.

प्रत्यक्ष हातघाईची लढाई सुरू नसली तरी, प्रतिस्पर्धी राष्ट्रे व प्रतिस्पर्धी हितसंबंध यांच्या दरम्यान पुष्कळ वेळा युध्दाच्या अगोदरच तंग वातावरण व संघर्ष सुरूच असतात.  परकीय सत्तेखालच्या देशात तर असा संघर्ष क्रमप्राप्तच असतो व तो अखंड चालतो.  त्यामुळे देशातील लोकांची मने बिघडून त्यांच्या विचारात व कृतीत वाकडेपणा येतो; युध्दकालीन परिस्थिती जाऊन मन साफ निवळले आहे असा क्षण येतच नाही, आणि उभय देशांतील लोकांच्या विचारांना, कृतींनाही विकृती प्राप्त होते.  प्राचीन काळी युध्द आणि त्याचे परिणाम म्हणजे पाशवी अत्याचार, जय, व तो झाला की जेत्यांनी जितांना गुलामगिरीत लोटणे इत्यादी गोष्टी निसर्गप्राप्त अतएव अपरिहार्य अशी मानल्या जात.  युध्द म्हटले की हे सारे व्हायचेच असे मानीत, त्यामुळे त्या गोष्टींवर पांघरूण घालण्याची, एखादी विशिष्ट दृष्टी घेऊन, त्याचे समर्थन करण्याची विशेष जरूर नसे.  परंतु मानवी कृत्यांचे मोजमाप करण्याची नवीन उच्चतर ध्येये आल्यावर, आपापल्या कृत्यांचे समर्थन करीत बसण्याची आवश्यकता भासू लागते, आणि त्यामुळे कधी कधी हेतुपुरस्सर- जाणूनबुजून खर्‍या गोष्टींचाही विपर्यास केला जातो.  पुष्कळ वेळा हा विपर्यास अहेतूकपणे होतो.  धर्माचे, न्यायनीतीचे श्रेष्ठत्व मान्य करून त्यांना अशा प्रकारचा दांभिकपणाही खंडणी देतो व हे धर्मनिष्ठेचे किळसवाणे सोंग अघोर कृत्यांची साथ करते.

कोठल्याही देशात विशेषत: हिंदुस्थानसारख्या गुंतागुंतीचा इतिहास व संमिश्र संस्कृती असलेल्या विशाल देशात एखाद्या विशिष्ट सिध्दान्ताचे समर्थन करण्यापुरते खरे घडलेले प्रकार व प्रवृत्ती सहज शोधून काढता येतात व असा सिध्दान्त कोणी मांडला की तो गृहीत धरून त्याच्या आधाराने नवे वाद निघतात.  अमेरिकेत सर्व एका मापाने मोडले जातात, सगळीकडे समानता आहे, तरीसुध्दा परस्परविरोधी दृश्यांचे ते आगर मानले जाते.  तर मग हिंदुस्थानात किती विसंगती आणि विरोध असतील बरे ?  येथेच काय, कोठल्याही देशात जे आपणांस हवे असेल ते आढळते, आणि अशा पूर्वग्रहदूषित पुराव्यावर, पक्षपाती गोष्टींवर आपल्याला आपल्या मतांची, समजुतीची इमारत बांधता येते.  परंतु या सर्व इमारतीचा पाया केवळ असत्यरूप असतो आणि सत्यविकृत स्वरूपच, अयथार्थ स्वरूपच आपणांस तेथे दिसेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel