हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांत हे असले किंवा इतर फरक आहेत ते तसे पाहिले तर चित्तवेधक आहेत.  हळूहळू ही प्रांतिक वैशिष्टये कमी होत असली तरी ती अद्याप आहेत.  मद्रास हा बुध्दिमंतांचा प्रांत आहे.  या प्रांतात तत्त्वज्ञानी, गणिती, विज्ञानवेत्ते पूर्वी झाले, आजही आहेत.  मुंबई आता उद्योगधंद्यातच गढून गेले आहे व त्याचे फायदे आणि तोटेही आहेत.  बंगाल उद्योग व व्यापार यात मागासलेला आहे, परंतु तेथे उत्कृष्ट शास्त्रज्ञ झाले आहेत.  विशेषत: कला, वाङ्मय यात बंगालने कीर्ती मिळविली आहे.  पंजाबात अलौकिक माणसे फारशी झाली नाहीत हे खरे, परंतु अनेक क्षेत्रांत तो प्रांत प्रगतिपथावर आहे. पंजाबी लोक व्यवहारात मोठे दक्ष, धूर्त आहेत.  त्यांच्यात यंत्राची माहिती असणारे चांगले कारागीर निघतात, व लहानसहान उद्योगधंद्यांत, छोट्या छोट्या व्यापारात ते चांगला जम बसवितात.  दिल्लीसह संयुक्तप्रांतात म्हणजे भारताचा एक प्रकारे सारसंग्रहच आहे.  त्याची घडणी अजब पंचरसी आहे.  प्राचीन हिंदू संस्कृती त्याचप्रमाणे अफगाण व मोगल यांच्या काळात आलेली पर्शियन संस्कृती या दोन्ही संस्कृतींचे हे पीठ झाल्यामुळे विशेषत: हे सारे भेद भौगोलिक आहेत, धार्मिक नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे.  बंगाली मुसलमानाला पंजाबी मुसलमानापेक्षा बंगाली हिंदू अधिक जवळचा वाटतो.  हाच प्रकार सर्वत्र आहे. बंगाली हिंदुमुसलमान हिंदुस्थानात कोठेही किंवा अन्यत्र भेटले तर लगेच त्यांचे जमून जाते व दोघांनाही अगदी घरचा भेटल्यासारखे होऊन अगदी मोकळेपणा वाटतो.  तसेच पंजाबमधील हिंदू, मुस्लिम, शीख यांचे होते.  मुंबई प्रांतातील मुसलमाना मध्ये (खोजा, बोहरी, मेमन) कितीतरी हिंदू चालीरीती आहेत.  खोजा हे आगाखान पंथी आहेत.  उत्तरेकडचे मुसलमान, खोजा व बोहरी यांना सनातनी मुसलमान असे समजत नाहीत.

मुसलमान विशेषत: बंगाल व उत्तर हिंदुस्थानातील मुसलमान इंग्रजी शिक्षणापासून दूर राहिले.  एवढेच नव्हे, तर कारखानदारीतही त्यांनी फारसे लक्ष घातले नाही.  याचे अंशत: कारण विचार जहागिरदारी काळातले होते व शिवाय रोमन कॅथोलिक धर्माप्रमाणे यांच्याही धर्मात व्याजबट्टा करणे निषिध्द मानले आहे.  परंतु आश्चर्य हे की, हिंदुस्थानात कडवे व कठोर सावकार म्हणून आज सरहद्दीवरच्या पठाणांचा दुर्लौकिक आहे.  एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुसलमान हे एकंदरीत इंग्रजी शिक्षणात मागासलेले होते, त्यामुळे पाश्चिमात्य विचारांशीही त्यांचा कमी संबंध आला; सरकारी नोकरीचाकरीत, उद्योगधंद्यातही ते तितकेसे नव्हते.

हिंदी उद्योगधंद्यांची वाढ जरी मंद होती, अडवली जात होती, तरी जी काही थोडीफार प्रगती होत होती तिच्यावरून देश भरभराटत आहे असे वाटू लागले व लोकांचे लक्ष तिकडे वेधू लागले.  परंतु बहुजनसमाजाच्या दारिद्र्याचा प्रश्न तसाच होता.  तो सोडवायला उद्योगधंद्यातील या अल्पशा वाढीने काही मदत झाली नाही.  जमिनीवरचा बोजा वाढला होता, तो वाढतच होता.  कोट्यवधी बेकारांतून- अर्धबेकारांतून पाच-दहा लाख लोक उद्योगधंद्यात गेले.  परंतु त्याने फारसा बदल झाला नाही.  कोट्यवधी लोक शेतीवरच धडपडत होते, कसेतरी जगत होते, व भरमसाठ बेकारी होती.  त्यामुळे परदेशात मजुरी करायला लोक जाऊ लागले.  अपमानास्पद स्थिती पत्करूनही नाइलाज म्हणून ते जात.  दक्षिण आफ्रिका, फिजी, त्रिनिदाद, जमेका, ग्वायना, मॉरिशस, सिलोन, मलाया, बर्मा इत्यादी देशांना हिंदी मजूर गेले.  हिंदुस्थानात परकी सत्तेखाली ज्या व्यक्तींना किंवा छोट्या वर्गांना वाढीची, भरभराटीची संधी मिळाली, त्यांचा बहुजनसमाजाशी संबंध राहिला नाही.  जनतेची स्थिती अधिकाधिक हालाखीची होऊ लागली.  काही थोड्या जमातींच्या हाती काही भांडवल जमत होते, व त्यामुळे ह्या वर्गाची आणखी वाढ होण्यासारखी परिस्थिती हळूहळू येत होती.  परंतु दारिद्र्य व बेकारी हे मूलभूत प्रश्न तसेच राहिले.  त्यांना हातही लागला नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel