वेदान्तातील अद्वैत तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत व विचारप्रधान मानवजातीचा हाच भविष्यकालात धर्म होणार असे त्यांना निश्चितपणे वाटे. कारण वेदान्त केवळ आध्यात्मिक नाही तर तो बुध्दिप्रधानही आहे. मानवी सृष्टीतील वैज्ञानिक शोधांशी त्यांचा विरोध तर नाहीच, उलट सुसंवाद आहे. ''विश्वातील अशा एखाद्या ईश्वराने हे विश्व निर्मिलेले नाही; ते एक अनंत अपार ब्रह्म, ते एकं सत्—स्वत:च स्वयंभू आहे, स्वत:चा आविष्कार करीत आहे, स्वत:चा विलयही करीत आहे. मनुष्याच्या ठायी भरलेले स्वयंभू परब्रह्म व मनुष्य ही वस्तुत: एकच आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी हा वेदान्ताचा सिध्दान्त आहे व या ध्येयप्राप्तीकरता वेदान्ताचा ध्यास आहे. मनुष्याच्या ठायी असलेल्या ह्या देवपणाची ओळख पटणे म्हणजेच खरा ईश्वरी साक्षात्कार, प्राणिमात्रातही परमोच्च योनी—मनुष्ययोनी. परंतु हा तात्त्विक वेदान्त रोजच्या व्यवहारात प्रत्यक्षात उतरला पाहिजे. त्याच्या स्फूर्तीने संसार काव्यासारखा सुरम्य झाला पाहिजे. कथापुराणांच्या गुंतागुंतीने हतबुध्द न हाता त्यातूनच न्यायनीतीचे आदर्श अवतार घेतले पाहिजेत, व योगशास्त्राने गोंधळून न जाता त्यातूनच अत्यंत शास्त्रीय व व्यवहारोपयोगी मानसशास्त्राची मांडणी केली पाहिजे.'' भारताची अवनती झाली याचे कारण आपली दृष्टी संकोच पावली, आपण हातपाय आवरून इवल्याशा घरट्यात घुसून बसलो, इतर राष्ट्रांशी संबंध सोडला व त्यामुळे आपली संस्कृती इजिप्तमधल्या प्रेतासारखी बाहेरून दिसायला कायम व आतून निर्जीव, ठरीव आकाराची होऊन बसली. जातिसंस्था, वर्णव्यवस्थाही आरंभीच्या त्यांच्या स्वरूपात अवश्य होती, ग्राह्य होती. व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, व्यक्तिस्वातंत्र्य मिळावे म्हणून निघालेल्या संस्थेचे असे हिडिस विडंबन झाले की, मूळचा हेतू नाहीसा होऊन उलट त्यामुळे बहुजनसमाज या जातिसंस्थेखाली चिरडला गेला. वर्णव्यवस्था हा सामाजिक संघटनेचा एक प्रकार होता, त्याचा धर्माशी काही संबंध नव्हता व तसा संबंध ठेवू नये. सामाजिक संघटनेच्या स्वरूपात कालमानाप्रमाणे स्थित्यंतर होणे अवश्य आहे. विधिनिषेध व विशेषत: सोवळ्याओवळ्याचा, शिवाशिवीच्या प्रकाराचा जो अर्थहीन आध्यात्मिक काथ्याकूट व जे वाद आहेत त्यांचा विवेकानंदांनी निषेध केला आहे. ''आमचा धर्म चुलीजवळ जाऊन बसला आहे. स्वयंपाकाचे भांडे हा आमचा देव झाला आहे आणि 'मला शिवू नको, मी सोवळा आहे' हाच आमचा धर्म' असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
त्यांनी राजकारण वर्ज्य केले होते व त्यांच्या समकालीन राजकीय पुढार्यांबद्दल त्यांचे प्रतिकूल मत होते. पण बहुजनसमाजाची स्थिती सुधारली पाहिजे, सर्वत्र समता व स्वातंत्र्य पाहिजे ह्या मुद्दयावर त्यांनी वारंवार भर दिला आहे. ''विचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य असणे हाच चैतन्याचा, विकासाचा, स्वास्थ्याचा देहस्वभाव आहे. हे स्वातंत्र्य नसेल ती व्यक्ती, ते राष्ट्र, तो वंश विनाश पावणार असे नक्की समजावे. भारताला काही आशास्थान असेल तर ते म्हणजे भारतातला बहुजनसमाज. वरिष्ठ वर्ग शारिरिकदृष्ट्या, नैतिक अर्थाने मृतप्राय झालेला आहे.'' पाश्चिमात्य प्रगतीची हिंदू आध्यात्मिक पार्श्वभूमीशी ते सांगड घालू पाहात होते. ''समाज असा घडवा की त्याचा धर्म हिंदुत्व व सामाजिक रचना युरोपिय होईल. समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उद्योग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा, परंतु धार्मिक संस्कृती व वृत्तिप्रवृत्ती यांत शंभर टक्के हिंदू राहा'' अशी त्यांची वचने आहेत. पुढे पुढे विवेकानंद हे अधिक आंतरराष्ट्रीय वृत्तीचे होऊ लागले. ''राजकारणात किंवा सामाजिक शास्त्रांत जे प्रश्न वीस वर्षांपूर्वी केवळ राष्ट्रीय वाटत असत ते आता केवळ राष्ट्रीय भूमिकेवरून सोडविणे अशक्य आहे. या प्रश्नांचा विस्तार प्रचंड होत चालला आहे, त्यांचे आकार विक्राळ होत आहेत. आता आंतरराष्ट्रीय प्रकाशात पाहू तरच ते प्रश्न सुटणे शक्य आहे. आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघ, आंतरराष्ट्रीय कायदे ही आजची घोषणा आहे. सारे जग एक आहे हे यामुळे दिसून येत आहे. विज्ञानातही दिवसेंदिवस याच एकतेकडे आपण जात आहोत, हीच विशाल दृष्टी जडसृष्टिशास्त्रात अधिकाधिक घ्यावी लागत आहे.'' पुन्हा ते म्हणतात, ''सारे जग पाठोपाठ आल्याशिवाय खरी प्रगती अशक्य आहे. केवळ वांशिक किंवा राष्ट्रीय किंवा अशा कोणत्याही संकुचित भूमिकेवरून कोणताही प्रश्न सोडविणे अशक्य आहे ही गोष्ट दिवसेंदिवस आधिकाधिक स्पष्ट होत आहे. प्रत्येक विचार सार्या जगाला व्यापण्याइतका मोठा झाला पाहिजे, प्रत्येक आकांक्षेने सार्या मानवजातीला, सार्या प्राणिमात्राला आपल्या कक्षेत घेतले पाहिजे.'' हे सारे विचार वेदान्त तत्त्वज्ञानात बसतात असे विवेकानंद म्हणत, आणि हिंदुस्थानभर हिंडून त्यांनी हा प्रचार चालविला. ते म्हणतात, ''अलग राहून कोणत्याही जातीचा वा देशाचा आता तरणोपाय नाही अशी माझी बालंबाल खात्री झाली आहे. सर्वांशीच मिळूनच राहिले पाहिजे. मोठेपणाच्या, धोरणाच्या किंवा पावित्र्याच्या नावाखाली जेथे जेथे असे अलग राहण्याचे प्रयत्न करण्यात आले, तेथे तेथे अलग राहणार्यांची हानीच झालेली दिसते. आपल्या अध:पाताचे मुख्य कारण म्हणजे जगातील इतर राष्ट्रांपासून आपण अलग राहिलो हे आहे, आणि आता पुनरुद्वाराचा उपाय हाच की जगाच्या विशाल प्रवाहात पुन्हा शिरावे. गती हीच जिवंतपणाची खूण आहे.''