सांस्कृतिक आधाराच्या शोधाने हे सुशिक्षित मुसलमान इस्लामिक इतिहासाकडे वळले.  ज्या काळात इस्लाम जयिष्णू होता, सर्जनशील होता, त्या काळाकडे ते वळले.  बगदाद, स्पेन, इस्तंबूल, मध्य आशिया आणि जेथे जेथे इस्लाम एकेकाळी जयशाली म्हणून शोभत होता, त्या काळाकडे ते वळले.  या इतिहासविषयी पूर्वीपासूनच कौतुक होते आणि शेजारच्या मुस्लिम राष्ट्राशीही संबंध होते.  अनेक राष्ट्रांतील मुसलमानांस एकत्र आणणारी हाजची यात्रा होती.  परंतु हे सारे संबंध मर्यादित होते, वरवरचे होते आणि हिंदुस्थानपुरती मर्यादित असणारी हिंदी मुसलमानांची जी दृष्टी, तिच्यावर यांचा फारसा परिणाम झाला नाही.  दिल्लीच्या अफगाण राजांनी विशेषत: महंमद तघलख याने कैरो येथील खलिफासही मान्यता दिली होती.  पुढे इस्तंबूलचे सुलतान खलिफा झाले.  परंतु हिंदुस्थानातील सम्राटांनी त्यांना फारसे मानलेले दिसत नाही.  मोगल सम्राट हिंदुस्थानाबाहेरच्या खलिफांना किंवा कोणा धार्मिक श्रेष्ठांना मानायला तयार नव्हते.  एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात मोगली सत्ता संपूर्णपणे कोलमडल्यावरच हिंदुस्थानातील मशिदीतून तुर्की सुलतानाच्या नावाचा उल्लेख होऊ लागला.  १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर या पध्दतीला अधिकृत आणि निश्चित स्वरूप आले.

अशा रीतीने इसलामच्या भूतकालीन मोठेपणाच्या चिंतनाने आणि विशेषत: इतर देशांतील मोठेपणाच्या आठवणीने, तसेच अद्याप एकतरी का होईना स्वतंत्र असे तुर्की राष्ट्र आहे या विचाराने ते स्वत:चे मानसिक समाधान मिळवू लागले.  या भावनेचा हिंदी राष्ट्रीयतेशी विरोध किंवा संघर्ष नव्हता.  एवढेच नव्हे, तर कितीतरी हिंदूही इस्लामच्या भव्य इतिहासाचे कौतुक करीत, त्याच्याशी ते परिचित होते.  तुर्कस्थानाविषयी त्यांनाही सहानुभूती वाटे.  कारण तुर्कस्थानाकडे एक आशियातील देश या दृष्टीने बघत आणि युरोपियन आक्रमणाला तो बळी पडत असलेला पाहून हिंदूंनाही वाईट वाटे.  परंतु मुसलमानांच्या बाबतीत ज्याप्रमाणे एक मानसिक आवश्यकता पुरी केल्यासारखे होत असे तसे हिंदूंच्या बाबतीत नसे.  हिंदूंनी दृष्टी निराळी, निराळ्या मुद्दयावर त्यांचा जोर होता.  मुसलमानांची दृष्टी वेगळी होती.

स्वातंत्र्ययुध्दानंतर कोणत्या बाजूला वळावे याविषयी हिंदी मुसलमानांचा निश्चय होईना, ब्रिटिश सरकारने जाणूनबुजून त्यांना दडपून टाकले होते; हिंदूंपेक्षा अधिक दडपले होते.  आणि ज्या मुसलमानांतून नवीन मध्यमवर्ग जन्माला येत होता, नवीन पंतप्रवृत्तीची मंडळी जन्माला येणार होती, त्यांच्यावरच या दडपशाहीचा अधिक परिणाम झालेला होता.  ते विमनस्क होते, खिन्न होते, रुष्ट होते.  १८७० नंतर ब्रिटिश मुस्लिमसंबंधी धोरणात फरक पडून ते त्यांना अनुकूल होऊ लागले.  कोणाचेही पारडे वरचढ होऊ द्यायचे नाही हे जे ब्रिटिशांचे सनातन धोरण त्याला ते अनुसरूनच होते.  परंतु हे धोरण अनुकूल व्हायला सर सय्यद अहमद खान यांचे प्रयत्नही पुष्कळसे कारणीभूत आहेत.  ब्रिटिश अधिकार्‍यांशी सहकार्याने वागूनच मुसलमानांना आपण वर आणू शकू याविषयी त्यांची खात्री झाली होती.  म्हणून त्यांना इंग्रजी शिक्षण घ्यायला लावून बिळातून बाहेर यावयास लावायचे ही सय्यद अहमदांची धडपड होती.  ते युरोपचा प्रवास करून आले होते.  युरोपियन संस्कृतीच्या दर्शनाने त्यांच्यावर फारच परिणाम झाला होता.  युरोपातून त्यांनी पाठविलेल्या पत्रांवरून तर असे दिसते की, त्या संस्कृतीने ते केवळ दिपून गेले होते; त्या संस्कृतीचे स्तोत्र गाताना त्यांचा तोलही सुटलेला दिसतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel