हिंदी मुसलमानांच्या वैचारिक वाढीच्या इतिहासात सन १९१२ ला महत्त्व आहे. मुसलमानांची अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक आणि कॉम्रेड हे इंग्रजी साप्ताहिक- अशी दोन साप्ताहिके सुरू झाली. अल्-हिलाल हे (आजचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष) अबूल कलाम आझाद यांनी सुरू केले होते. त्या वेळेस ते २४ वर्षांचे एक तेजस्वी तरुण होते. बाळपणातच अरबी आणि पर्शियन भाषांतील पारंगतत्वाबद्दल त्यांची ख्याती पसरली होती. पुढे कैरो येथील 'अल् अझहार' विद्यापीठात त्यांचे अध्ययन झाले. हिंदुस्थानाबाहेरील इस्लामी जगाचे आणि त्यात सुरू असलेल्या अनेक सुधारणांविषयक चळवळींचे, त्याबरोबरच युरोपातील घडामोडींचे-असे बहुविध मौल्यवान ज्ञान त्यांनी आपल्या ज्ञानास जोडले. ते बुध्दिप्रामाण्यवादी होते; इस्लामी विद्या आणि इतिहास यांत आकंठ डुंबलेले होते. त्यांनी कुराणाचे नवीन दृष्टीकोणाने विवरण केले. इस्लामी परंपरेत ते रंगलेले होते; इजिप्त, तुर्कस्थान, सिरिया, पॅलेस्टाईन, इराक, इराण इत्यादी देशांतील अनेक मुस्लिम पुढार्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध जडले होते, त्या देशांतील राजकीय आणि सांस्कृतिक चळवळींचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला होता. हिंदुस्थानातील कोणाही मुसलमानापेक्षा स्वत:च्या लिखाणाने बाहेरच्या मुस्लिम जगात ते अधिक ज्ञात झालेले आहेत. तुर्कस्थानावर युध्दांच्या ज्या लागोपाठ आपत्ती ओढवल्या त्यामुळे तुर्कस्थानाविषयी त्यांना उत्कटपणे सहानुभूती वाटू लागली. परंतु जुन्या मुस्लिम पुढार्यांच्या दृष्टीपेक्षा अबुल कलामांची दृष्टी निराळी होती. त्यांची दृष्टी अधिक व्यापक आणि बुध्दिप्रधान अशी होती. जुन्या मुस्लिम पुढार्यांची दृष्टी सरंजामशाही काळातील आणि धार्मिक दुष्ट्या संकुचित अशी होती; त्यांची वृत्ती अलग राहण्याची, सवता सुभा करण्याची होती. आझाद या लोकांपासून निराळे झाले आणि अपरिहार्यपणे ते हिंदी राष्ट्रवादी झाले. तुर्कस्थानात आणि अन्य इस्लामी देशांत वाढणारी राष्ट्रीय भावना त्यांनी स्वत: अवलोकिली होती. तो अनुभव, ते ज्ञान त्यांनी हिंदुस्थानाच्या बाबतीत लाविले. हिंदी राष्ट्रीय चळवळीत तत्सम घटनाच आहे हे त्यांनी ओळखले. अन्य देशांतील राष्ट्रीय चळवळींची हिंदुस्थानातील इतर मुसलमानांना वास्तपुस्तही नव्हती. ते आपल्या सरंजामशाही वातावरणातच गुरफटलेले होते. इतर मुस्लिम देशांत घडणार्या गोष्टींची त्यांना फारशी गोडीही नव्हती. त्यांची केवळ धार्मिक दृष्टी होती आणि तुर्कस्थानाविषयी त्यामुळेच त्यांची सहानुभूती. ती त्यांची सहानुभूती उत्कट असूनही तुर्कस्थानातील नवीन राष्ट्रीय आणि धर्माशी संबंध नसणार्या चळवळींविषयी त्यांना मुळीच जिव्हाळा वाटत नसे.
अबुल कलाम आझाद आपल्या अल्-हिलाल साप्ताहिकातून नवीन भाषेत हिंदी मुसलमानांजवळ बोलू लागले. त्यांची भाषा, विचार आणि दृष्टिकोण यामुळे नवीन होतीच, परंतु शैली आणि मांडणी यामुळेही ती नवीन, अभिनव वाटे. आझादांची शैली अत्युत्कट आणि प्राणमय अशी होती. कधी कधी पर्शियन पार्श्वभूमीमुळे ती समजणेही कठीण होई. नवीन विचारांसाठी नवीन शब्द ते बनवीत, आजकालच्या उर्दूला नवीन रंगरूप देण्यात तेही अग्रेसर आहेत. मुसलमानांतील जुनी सनातन मंडळी आझादांच्या मतांवर, दृष्टिकोणावर टीका करू लागली. त्यांना आझादांचे म्हणणे पसंत नसे. परंतु आझादांशी वादविवाद कोण करणार ? धर्मग्रंथ घ्या, परंपरा घ्या त्यांचेही आझादांचे ज्ञान अगाध होते. कोण टिकणार त्यांच्याबरोबर दोन हात करायला ? आझाद म्हणजे मध्ययुगी धार्मिक ज्ञान, अठराव्या शतकातील बुध्दिवाद आणि अर्वाचीन दृष्टी यांचे एक अपूर्व असे मिश्रण होते.
जुन्या पिढीतील थोड्या लोकांना आझादांचे म्हणणे, मांडणे रुचत होते. प्रसिध्द पंडित मौलाना शिब्ली हे त्यांपैकीच एक होते. शिब्लीसाहेब तुर्कस्थानात जाऊन आले होते. अलीगढ कॉलेजशी आणि सर सय्यद अहमदखानांशी त्यांचा संबंध होता. अलीगढ कॉलेजची परंपरा अर्थात राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या निराळी होती, सनातनी होती. त्या कॉलेजच्या विश्वस्त आणि पुरस्कर्त्या मंडळींत मोठमोठे अमीर उमराव, नबाब, राजेमहाराजे होते. ते सरंजामशाही परंपरेचे मासलेवाईक प्रतिनिधी होते. या कॉलेजच्या प्राचार्यांची मालिकाही इंग्रजांची होती. सरकारी गोटाशी त्यांचा सदैव संबंध असायचा. त्यामुळे सवत्यासुभ्याची वृत्ती—अ-राष्ट्रीय आणि राष्ट्र-सभाविरोधी वृत्ती येथे वाढीस लागलेली होती. विद्यार्थ्यांसमोर दुय्यम नोकर्याचाकर्यांत शिरा हे एकच ध्येय ठेवण्यात येत असे. त्यासाठी सरकारनिष्ठ धोरण अवलंबणे आणि राष्ट्रीयता आणि राजद्रोह यांपासून दूर राहणे जरूरच होते. अलीगढ कॉलेजमधील हा नवीन संच अत:पर नवीन मुस्लिम सुशिक्षितवर्गाचा मार्गदर्शक झाला; आणि प्रत्येक मुस्लिम चळवळीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्यांनी परिणाम केला.