आणि म्हणून हिंदी राष्ट्राचे आध्यात्मिक ऐक्य पुन्हा स्थापण्यासाठी ते उभे राहिले. वरच्या बाजूला असलेले मूठभर पाश्चिमात्य विद्याविभूषित लोक आणि खालाच्या बाजूला असलेला बहुजनसमाज यांच्यातील सारे बांध-बंधारे फोडायला ते उद्युक्त झाले. प्राचीन सांस्कृतिक आधारात जिवंतपणा कशात आहे त्याचा त्यांनी शोध सुरू केला; निर्जीव मुळे कोणती, सजीव कोणती ते ते पाहू लागले आणि त्यांच्या आधारावर नवीन इमारत उभारू लागले. जनतेची झपड उडवून, त्यांच्या डबक्यातून त्यांना बाहेर काढून गतिमान करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यांचा एक निश्चित मार्ग होता. तरी त्यांचा स्वभाव विविधतेने नटलेला आहे. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत; त्यांची अनेक कार्यक्षेत्रे आहेत. परंतु त्यांच्या जीवनातील परम प्रभावी अशी जर कोणती भावना असेल तर ती बहुजनसमाजाशी एकरूप होणे ही होय. त्याच्याशी त्यांचा आत्मा समरस होतो. हिंदुस्थानातील अकिंचन आणि निर्धन जनतेशी ते एकजीव होतात असे नाही तर जगातील सर्वच दलित आणि दरिद्री लोकांशी आश्चर्यकारक रीतीने ते एकरूप होतात. त्या दारिद्र्यदास्याच्या गर्तेत बुडून गेलेल्या लोकांना वर काढण्यासाठी त्यांची इतकी तगमग असते की, क्षणभर धर्मालाही ते दुय्यम स्थान देतील. ते म्हणतात, ''अर्धपोटी राष्ट्राला कोठला धर्म, कोठून कला, कोठून संघटना ?'' पुन्हा म्हणतात, ''उपासमारीत पडलेल्या कोट्यवधी लोकांच्या जे जे उपयोगाचे आहे, ते ते माझ्या मनाला सुंदरच दिसते. आज जीवनाच्या अत्यंत आवश्यक गरजा सर्व जनतेला आपण प्रथम देऊ या, मागून जीवनातील सारी सुंदरता आणि सुभगता आपोआप येईल... लाखो लोकांशी बोलणारी कला आणि वाङ्मय मला हवी आहेत.'' हे दु:खी, दरिद्री, अकिंचन लोक-हे कोट्यवधी दरिद्री नारायण, यांचीच मूर्ती अहोरात्र त्यांच्या डोळ्यासमोर असते; सारे काही या मुख्य गोष्टीभोवती फिरत आहे असे त्यांना वाटे. ''कोट्यवधी लोक चिरंतन वाट पाहात आहेत, त्यांना झोप नाही, ते कायमचे पडून आहेत.'' ते म्हणतात, ''प्रत्येक डोळ्यातील अश्रू पुसणे ही माझी महत्त्वाकांक्षा आहे.''
असा हा अलौकिक पुरुष होता. त्याची उत्साहशक्ती अगम्य, अपूर्व होती. आत्मविश्वासाने तो नटलेला होता. एक प्रकारची अव्दितीय शक्ती या महापुरुषाजवळ होती. प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समतेसाठी तो उभा होता. सारे काही गरिबातल्या गरिबाच्या दृष्टीने तो मोजी. अशा या पुरुषाने एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे सार्या राष्ट्राचे, सर्व जनतेचे लक्ष खेचून (वेधून) घेतले यात आश्चर्य नाही. भूतकाळाचा भविष्याशी संबंध जोडणारा हा आहे असे लोकांना वाटली. अशा आणि नवजीवन यांनी भरलेल्या भविष्याकडे जाण्यासाठी सद्य:कालीन दु:खीकष्टी वर्तमानकाळाची पायरी करा असे जणू त्यांनी सांगितले. केवळ बहुजनसमाजालाच त्यांनी खेचले असे नाही तर बुध्दिमंतांना आणि इतरांनाही ओढले. अर्थात सुशिक्षितांच्या मनात गोंधळही उडाला. ते जरा बेचैन अस्वस्थही झाले; बर्याच दिवसांच्या सवयी क्षणात दूर करणे त्यांना कठीण जात होते. अशा रीतीने गांधीजींनी एक विराट मानसिक क्रांती घडवून आणिली. स्वत:च्या अनुयायांच्या मनात नव्हे तर प्रतिस्पध्यांच्याही. जे तटस्थ होते, काय करावे, कोणता मार्ग घ्यावा या बाबतीत ज्यांचा अद्याप निर्णय होत नव्हता, अशांच्याही मनात त्यांनी परिवर्तन केले.
आता राष्ट्रसभेवर गांधीजींचे प्रबल प्रभुत्व होते. परंतु हे प्रभुत्व विशिष्ट स्वरूपाचे होते. राष्ट्रसभा ही कार्यरत, बंडखोर, बव्हंगी अशी सभा होती. तिच्यात नाना मतमतांतरे होती. तिला या किंवा त्या बाजूला ओढणे तितके सहज सोपे नव्हते. दुसर्यांच्या इच्छांशी मिळवून घेण्यासाठी गांधीजी कधीकधी मिळते घेत, नमते घेत. कधी कधी विरुध्द निर्णयही ते स्वीकारीत, मान्य करीत. अर्थात ज्या गोष्टी त्यांना प्राणमय वाटत, त्यांच्या बाबतीत ते अभंग असत. एकदाच नव्हे तर अनेकदा राष्ट्रसभेचे आणि त्यांचे तुटण्यापर्यंत पाळी आलेली आहे. परंतु गांधीजी म्हणजे हिंदी स्वातंत्र्याचे चढाऊ राष्ट्रवादाचे अखंड प्रतीक. हिंदुस्थानला गुलामगिरीत लोटू पाहणार्या सर्वांचे खंबीर शत्रू आणि म्हणून या स्वातंत्र्याच्या प्रतीकाभोवती पुन्हा सारे गोळा होत आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारीत. इतर बाबतीत मतभेद दूर करून ते नेतृत्व मान्य करीत. जेव्हा प्रत्यक्ष लढा नसे तेव्हा त्यांचे नेतृत्व नेहमीच मान्य करण्यात येई असे नाही, परंतु लढा अटळ होताच, या स्वातंत्र्याच्या प्रतीकाला सर्व महत्त्व प्राप्त होई आणि इतर सार्या गोष्टी दुय्यम ठरत.