ही अशी गांधींची विचारसरणी होती खरी, पण प्रत्यक्ष जीवनात संसारातल्या अडचणी हिशेबात न घेता आपल्या कल्पनेने काढलेल्या अद्भुत सृष्टीत रंगून जाऊन व त्या स्वप्नातच दंग होऊन बसणे त्यांच्या प्रकृतीतच नव्हते. केवळ टक्क्यांचा हिशेब पाहणार्या व्यवहारदक्ष गुजराथ प्रांतात त्यांचा जनम; तेथील खेड्यातील, त्यातील ग्रामीण जीवनाची माहिती त्यांच्याइतकी कोणालाच नव्हती. त्यांच्या स्वत:च्या त्या अनुभवामुळेच त्यांनी आपला सूतकताई व ग्रामोद्योगाचा कार्यक्रम काढला. उद्योगधंदा मिळत नसल्यामुळे सर्वस्वी किंवा अंशत: बेकार पडलेल्या लाखो लोकांना काही आधार द्यावयाचा असेल, नुसते बसून राहाून जागच्या जागी कुजण्याची जी साथ सार्या देशभर पसरून सर्वसामान्य जनता बधीर होत चालली होती, ती साथ बंद पाडावयाची असेल, ग्रामीण जनतेपुढे ठेवल्या जाणार्या आदर्श स्थितीची उंची थोडी का होईना पण सर्वांना साधेल अशी वाढवावयाची असेल, नुसते वार्यावर सोडून दिलेल्या भणंग भिकार्यासारखे मदतीकरता ज्याच्या त्याच्या तोंडाकडे पाहात न बसता स्वत:च्या बळावर काही उद्योग करावा अशी शिकवण त्यांना द्यायची असेल, आणि हा सारा खटाटोप, सारा उद्योग फारसे भांडवल न लागता करावयाचा असेल, तर गांधींनी काढलेल्या मार्गावाचून दुसरा काही उपाय दिसत नव्हता. परकीय सत्ता व परिस्थितीचा फायदा घेऊन अन्यायाने चाललेले शोषण यांतून आपोआप उद्भवणारी संकटे व परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरता एखादी विशाल योजना अमलात आणून ती शेवटपर्यंत पार पाडण्याकरता अवश्यक त्या स्वातंत्र्याचा अभाव ह्या अडचणी तर देशापुढे उभ्याच होत्या, पण ह्याखेरीज आणखी एक प्रश्न देशापुढे असा होता की, आमच्याजवळ आमच्या देशातले असे भांडवल फार थोडे होते व मनुष्यबळ मात्र वाटेल तितके होते. तेव्हा काही कामधंदा नाही म्हणून काहीही उत्पादन न होता फुकट चाललेले हे मनुष्यबळ काही उपयुक्त कार्यात कसे गुंतवावे हा मोठा प्रश्न पडला होता. एखादे मात्र यंत्रावाचून नुसते माणसाकरवी केले व तेच काम यंत्रांच्या साहाय्याने केले तर या प्रत्येक प्रकारात शक्ती किती लागते ह्याचा हिशेब काढून त्यांची तुलना करण्याचा मुर्खपणा काही लोक करतात. मोठे यंत्र घेतले तर ते एकच काय पण दहा हजार माणसांचे काम एकटे यंत्र करू शकेल, पण एका यंत्राकडून काम करवून त्यापायी जर ही दहा हजार माणसे काम नाही म्हणून स्वस्थ बसण्याचा प्रसंग आला तर एकंदर समाजाच्या नफातोट्याच्या हिशेबाने अशा यंत्राचा उपयोग म्हणजे एकंदर समाजाचा तोटाच ठरतो; समाजात हल्ली चालू असलेली कामाची व्यवस्था बदलण्याचा लांबवरचा विचार करून तशी काही योजना असली तर गोष्ट वेगळी. पण आपल्याजवळ मुळात असले यंत्रच नसले तर मनुष्यबळ व यंत्रबळ यांची ही तुलना करण्याचे कारणच नाही. उत्पादन करण्याच्या कामी आपल्याजवळ आहे ते मनुष्यबळ वापरण्यात राष्ट्राला व व्यक्तीला दोघांनाही निव्वळ फायदाच पदरात पडणार. यंत्रशक्ती वापरात आणावयाची ती त्या यंत्रामुळे किती माणसांच्या उद्योगधंद्याची सोय होते ते प्रथम पाहून मग यंत्रे आणली व त्या यंत्रांमुळे लोकांचे काम सुटून बेकारीत भर पडत नाही याची खबरदारी ठेवली तर अशा यंत्राकरवी शक्य तितके अधिक प्रमाणावर काम घेण्याचा उपक्रम करावा, त्याला अवश्य विरोधच केला पाहिजे असे नाही.
यंत्रशक्तीच्या साहाय्याने उद्योगधंद्यांची खूप वाढ केलेले परंतु आकाराने अगदी छोटे असे पश्चिमेकडचे देश व रशिया किंवा अमेरिका यांच्यासराखे विरळ वस्तीचे मोठे देश यांच्याशी हिंदुस्थानची तुलना करण्यात दिशाभूल होते. पश्चिम युरोपमध्ये उद्योगधंदे यंत्रसाहाय्याने चालविण्याचे काम गेली १०० वर्षे वाढत वाढत आलेली आहे व एवढ्या अवधीत लोकसंख्येचा या यंत्रयुगव्यवस्थेशी जम हळूहळू बसत आला आहे. प्रथम आरंभी लोकसंख्या झपाट्याने वाढली, नंतर तेवढीच स्थिर झाली व आता लोकसंख्या कमी होते आहे. रशिया किंवा अमेरिकन संयुक्त संस्थाने यांतील लोकसंख्या वाढत असली तर मुळातच थोडी व त्यांच्या देशातून पडीत जमिनीची वाटेल तेवढी विशाल क्षेत्रे मोकळी आहेत. तेथे जमीन वहितीस आणावयाची म्हटले तर मोठाले यांत्रिक नांगर वगैरे यांत्रिक अवराजावाचून चालणे अशक्य. गंगा नदीच्या खोर्यातल्या दाट वस्तीच्या प्रदेशात जेथे लाखे लोकांचे पोटाचे साधन शेतीवरचा कामधंदा हेच अद्याप आहे, तेथे ही असली यंत्रे कशी काय अवश्य आहेत ते कळत नाही. याशिवाय आणखीही पुष्कळ भानगडी या यंत्रापायी निघत असतात, त्या अमेरिकेतसुध्दा निघाल्या आहेत. हिंदुस्थानात आज हजारो वर्षे शेती चालता चालता जमिनीचा कस पार संपल्यासारखा आहे. इकडची जमीन यांत्रिक नांगर लावून खूप खोलीपर्यंत उलथली गेली तर जमिनीचा कस आणखी कमी होत जाईल की काय, जमीन धुपून जाईल की काय? हिंदुस्थानात रेल्वेचे-रस्ते तयार केले व त्याकरता ठिकठिकाणी भराव घालून मोठमोठे बांध घातले तेव्हा त्या प्रदेशातून आपोआप पाणी वाहून जाण्याची काय निसर्गत:च सोय होती, काय करावी याचा काही विचारच झाला नाही. पावसाचे पाणी आपोआप वाहून जाण्याची निसर्गत:च जी काय सोय होती तिच्यात या बांधांमुळे घोटाळा झाला व त्याचा परिणाम असा झाला की, वारंवार पुरांचा त्रास वाढत्या प्रमाणावर होऊ लागला, शेतजमिनी धुपून जाऊ लागल्या व जिकडे तिकडे हिंवताप पसरू लागला.