देशातील परिस्थिती अनेक प्रकारे उत्तरोत्तर अधिक वाईट होत चालली होती. राजकीय दृष्टीने पाहिले तर हे अगदी स्पष्टच दिसत होते. आर्थिकदृष्ट्यासुध्दा, युध्दपरिस्थितीमुळे शेतकरी व कामकरीवर्गातल्या काही लोकांची स्थिती थोडीफारा सुधारली असती तरी एकंदरीत पाहिले तर फार लोकांना कठीण काळ आला होता. युध्दाच्या निमित्ताने ज्यांना नफेबाजी साधली ते, व ज्यांनी कंत्राटे घेतली होती ते, व युध्दाकरिता चालविलेल्या खात्यांतून भरमसाठी पगारावर नेमलेल्या व मुख्यत: ब्रिटिशांचा भरणा केलेल्या अधिकार्यांचा तांडेच्या तांडे, या लोकांचे मात्र खरेखरे नशीब उघडले. सकृद्दर्शनी असे वाटे की, युध्दोपयोगी कार्य करण्याचा सर्वांत उत्तम उपाय म्हणजे भरमसाठ नफा करून घेण्याची जी व्यापारी प्रवृत्ती असते तिला उत्तेजन देणे हा होय, अशीच सरकारी कल्पना आहे. लाचलुचपत व वशिलेबाजीला ऊत आला होता, व त्या प्रकाराला लोकमताचे नियंत्रण घालण्याला काही साधन नव्हते. कोणी प्रसिध्दपणे या असल्या प्रकारावर टीका केली तर त्यामुळे युध्दकार्यात अडथळा येतो असे समजले जाई व असा अधिकपणा कोणी करील तर हिंदुस्थान संरक्षण कायद्याचा बडगा त्याला दाखविलाच पाहिजे असे सरळ धरले जाई. पाहावे तिकडून निराशाच वाटे.
या अशा सार्या प्रकारामुळे आम्हाला असे वाटू लागले की, ब्रिटिश सरकाशी तडजोड करण्याचा पुन्हा एकवार आटोकाट प्रयत्न करून पाहावा. त्यात या येण्याचा संभव, परिस्थिती पाहता, फारच थोडा दिसत होता. राज्यकारभाराच्या सगळ्या खात्यांतून काम करणारा जो कायम नोकरवर्ग होता त्या सबंध वर्गाला गेल्या दोन पिढ्यांत कधी नव्हते असे मनमुराद वागण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते. त्यांच्या चुका दाखवून देण्याची किंवा त्यांना ताळ्यावर आणण्याची काही सोय राहिली नव्हती. कोणी एखादा माणूस या अधिकार्यांना नकोसा झाला की त्याच्यावर खटला भरून चौकशी करून, किंवा तीही न करता, त्याला तुरुंगात एका झटक्यात डांबण्याची सत्ता त्यांच्या हाती होती. मोठमोठ्या अवाढव्य प्रांतावर मन मानेल तसे राज्य करण्याचा अधिकार व सत्ता गव्हर्नरांना लाभली होती. अशी स्थिती असल्यामुळे, तसेच काही घडून त्यांचा निरुपाय झाल्याखेरीज, ह्या मंडळींनी तरी, आहे त्या स्थितीत पालट करण्यास संमती काय म्हणून द्यावी ? साम्राज्यशाहीच्या या यंत्राच्या चौकशीवर शिरोभागी, व्हॉइसरॉय लाई लिनलिथगो त्यांच्या थोर पदवीला शोभेल अशा थाटामाटात विराजमान झाले होते. देहाची स्थूल स्थिती व बुध्दीची मंद गती, दगडासारखे घट्ट व जवळजवळ तितकेच मठ्ठ, जुन्या जमान्यातल्या ब्रिटिश सरदारांचे सारे गुणावगुण अंगी बाणलेले, अशा या राजेश्रींनी या चक्रव्यूहातून वाट काढण्याचा मोठ्या सचोटीने व कसोटीने प्रयत्न चालविला. पण त्यांना आंगचीच, वैयक्तिक बंधने फार होती; त्यांची बुध्दी जुन्या चाकोरीतून चाले, व नवे काही दिसले की बिनचूक जाई; ज्या सत्ताधारी वर्गात त्यांचा जन्म झाला त्या वर्गाच्या परंपरेची ढापणे त्यांच्या डोळ्यांवर चढलेली असल्यामुळे त्यांची दृष्टी मर्यादित झाली होती; इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधील कायम सनदी अधिकारी व व्हाइसरायच्या भोवती गराडा घालून असलेले इतर लोक यांच्याकडून जे काय दिसेल व ऐकू येईल तेवढीच काय ती देशातील माहिती त्यांना असे; राजकीय व सामाजिक बाबतीत मुळापासून फरक करण्याच्या गोष्टी जे काढतील त्यांचा त्यांना भरवसा नव्हता; ब्रिटिश साम्राज्य व त्याचे हिंदुस्थानातले शिरोमणी राजप्रतिनिधी यांचे जसे करावे तसे मोठे कौतुक कोणी केले नाही तर तसल्या माणसांचा त्यांना राग येई.