काय करावे, काय न करावे, याबद्दल हिंदी लोकांच्या मनात या अशा उलटसुलट विचारांचा झगडा चालला होता, व लोकांची हताश वृत्ती वाढत होती. त्या सुमारास गांधीजींनी त्या विषयावर बरेचसे लेख लिहून प्रसिध्द केले. या लेखांमुळे लोकांच्या विचारांना एकाएकी वेगळेच वळण लागले, किंवा खरे म्हणजे अनेकवार होत असते त्याप्रमाणे लोकांच्या मनी वसत असलेल्या अमूर्त विचारांना गांधीजींच्या लेखांतून साकार मूर्तीचे रूप आले. अशा य आणीबाणीच्या वेळी काही हालचाल न करता निष्क्रिय बसणे किंवा देशात जे काही घडत होते ते मुकाट्याने सोसणे त्यांना असह्य झाले होते. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला मान्यता देणे, व स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानने दोस्त राष्ट्रांशी सहकार्य करून आपल्या देशावर आक्रमण करण्याकरिता आलेल्या परचक्राचा प्रतिकार करणे. सरकारकडून ह्या देशाचे स्वातंत्र्य मान्य केले जात नसेल तर राज्यकारभाराच्या ह्या चालू पध्दतीविरुध्द सरकारला उघड आव्हान देण्याकरिता, व निष्क्रियतेची जिकडे तिकडे झापड पसरून गात्रे बधिर होत चालल्यामुळे कोणत्याही अन्यायी आक्रमणापुढे मुकाट्याने बळी जाणार्या जनतेला खडबडून जागे करण्याकरिता, काहीतरी उठाव करणे अवश्य झाले होते.
आम्ही स्वातंत्र्य मागत होतो ती आमची मागणी काही नवीन नव्हती, आजपर्यंत आम्ही वारंवार जे म्हणत आलो तेच पुन्हा या वेळीही उच्चारले, पण गांधीजींच्या त्या वेळच्या भाषणांतून व लेखांतून वेगळीच निकड व फारच तीव्र भावना दिसत होती; आणि त्यातच उठावाची अस्पष्ट सूचनाही आढळत होती. देशातील यच्चयावत जनतेची त्या खणी जी भावना होती तीच गांधीजी बोलून दाखवीत होते, हे नि:संशय होते. स्वदेशप्रीतीविरुध्द आंतरराष्ट्रीय दृष्टी ह्यांचा सामना होऊन राष्ट्रीय वृत्तीची सरशी झाली, व गांधीजींच्या नव्या लेखांनी हिंदुस्थानात जिकडे तिकडे खळबळ उडाली. खरोखर पाहू गेले तर ही हिंदी राष्ट्रीय वृत्ती आंतरराष्ट्रीय वृत्तीला विरोधी अशी कधीच नव्हती. आपल्या देशापुरते पाहण्याच्या दृष्टीने नव्हे, तर अधिक विशाल अशा आंतरराष्ट्रीय दृष्टीने पाहून, आपल्या राष्ट्राच्या राष्ट्रीय वृत्तीचा उपयोग करून घेता यावा याकरिता काही स्वाभिमानाचा व उपयुक्त मार्ग निघतो की काय हे शोधण्याकरिता हिंदी राष्ट्रीय पक्षाने आपल्याकडून पराकाष्ठेचे प्रयत्न चालवले होते. युरोपातील देशांतून आढळणारी राष्ट्रीय वृत्ती आक्रमक स्वरूपाची होती तशी हिंदुस्थानची राष्ट्रीय वृत्ती नव्हती. युरोपियन राष्ट्रांना इतरांच्या कारभारात हात घालण्याची इच्छा होती तशी हिंदी राष्ट्राला नसून इतर राष्ट्रांच्या सहकार्याने सर्वांच्या हिताकरिता काही करीत जावे अशी हिंदुस्थानला इच्छा होती, त्यामुळे हिंदी राष्ट्रीय वृत्ती व आंतरराष्ट्रीय वृत्ती या दोहोंत विरोध आलाच पाहिजे अशी स्थिती नव्हती. हिंदी राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांच्या मते खर्या आंतरराष्ट्रीयत्वाला मुळात अगोदर राष्ट्रीय स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक आहे व म्हणून स्वातंत्र्यप्राप्ती हाच खरा आंतरराष्ट्रीयत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे; फॅसिझम व नाझीझमच्या सोटेशाही तत्त्वाने चालणार्या राष्ट्रांचा प्रतिकार आपणा उभयतांनाही करावयाचा आहे. त्या कामी आपले दोघांचे सहकार्य व्हायला खरा आधार म्हणजे आमचे स्वातंत्र्य. ही चर्चा चालली असतानाच ज्याचा एवढा ऊहापोह होत होता ते आंतरराष्ट्रीयत्व म्हणजे काही नवे नसून आमच्या जुन्या ओळखीचे साम्राज्यशाहीचे धोरण आहे असा संशय येण्यासारखे त्या आंतरराष्ट्रीयत्वाचे अंतरंग दिसू लागले, त्याचा वेष नवा भासे पण तोही विशेष नवा नव्हता. या आंतरराष्ट्रीयत्वाचे अंतरंग पाहिले तर ते म्हणजे आपल्या राष्ट्राचे वर्चस्व दुसर्या राष्ट्रावर चालविण्याची इच्छा असलेली आक्रमक राष्ट्रीय वृत्ती हेच होते. त्याने त्याकरिता नावे मात्र साम्राज्य किंवा राष्ट्रसमूह किंवा प्रतिपालक राष्ट्र अशी वेगवेगळी घेतली होती, पण अंतरी ही आंतरराष्ट्रीय वृत्ती म्हणजे आक्रमक राष्ट्रीय वृत्तीच होती.