गांधीजींच्या ह्या वेळच्या भाषणांनी व लेखांमुळे देशात जी नवी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आमच्यापैकी काही लोकांना अस्वस्थता आली, कारण आपले काम नक्की साधेल अशी खात्री असल्याखेरीज गांधीजी सुचवीत होते तसा जनतेचा उठाव करणे अंती निरुपयोगी ठरणार.  उठाव झाला तर प्रस्तुत युध्दाच्या तयारीत त्यामुळे व्यत्य खासच येणार आणि तोही अशा वेळी की, हिंदुस्थानवर परचक्र येण्याचा धोका त्याच वेळी आला होता.  जनतेचा उठाव करण्याची कल्पना विचारात घेताना गांधीजींनी काही महत्त्वाच्या आंतराष्ट्रीय घटनांकडे दुर्लक्ष केले आहे असे दिसे, त्यांनी आपले विचार राष्ट्रीयत्वाच्या संकुचित दृष्टीने ठरविले आहेत असे वाटे.  या वेळेपावेतो हे दुसरे महायुध्द सुरू झाल्याला तीन वर्षे झाली होती, या तीन वर्षांत सरकारला पेच पडेल अशी काहीही चळवळ न करण्याचे धोरण आम्ही मुद्दाम स्वीकारले होते, अधूनमधून काही एखादी चळवळ आम्ही केलीच तर ती नुसती लाक्षणिक स्वरूपाची असे.  अशी लाक्षणिक असूनही सन १९४०-४१ साली केलेल्या एका चळवळीचा विस्तार अफाट वाढला होता व आमच्यापैकी प्रमुख असे सुमारे तीस हजार स्त्री-पुरुष तुरुंगात गेले होते.  तसे पाहू गेले तर तो त्या वेळचा सत्याग्रह वैयक्तिक स्वरूपाचा होता व तो अगदी निवडक मंडळींनाच आम्ही करू दिला होता.  सामान्य जनतेचा सामुदायिक सत्याग्रह होऊ नये व सरकारी राज्ययंत्राला त्या सत्याग्रहात प्रत्यक्ष व्यत्यय येऊ नये अशी आम्ही दक्षता बाळगली होती.  आता पुन्हा तसलाच सत्याग्रह करण्याचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता, सत्याग्रहाचा दुसरा काही प्रकार काढणे व तोही यशस्वी होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर काढणे प्राप्त झालो असते.  तसे आम्ही केले असते तर हिंदुस्थानच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोचलेल्या ह्या युध्दावर परिणाम होऊन शत्रूला उत्तेजन मिळणे अपरिहार्य होते.

अशा या जनतेचा उठाव करण्याच्या मार्गात अडचणी दिसत होत्या व आम्ही त्यावर काँग्रेसमधल्या नेत्यांनी गांधीजींच्याबरोबर त्याबद्दल चर्चा चालवली, पण त्यात गांधीजींचे किंवा आमचे, कोणाचेच, मतपरिवर्तन झाले नाही.  काही चळवळ करू जावे तर ह्या अडचणी ठेवलेल्या, न करावे तर स्वस्थ बसण्यानेही नाना प्रकारची संकटे व धोके येतील.  तेव्हा अखेर मार्ग उरला तो एवढाच की, ह्या दोन्हींची तुलना करून त्यातल्या त्यात कमी वाईट ते पत्करावे.  आमची जी काही चर्चा झाली त्यात उभयतांचेही जे बरेचसे मोघम व अस्पष्ट विचार होते ते स्पष्ट व निश्चित झाले, विचारात घेण्यासारख्या ज्या आंतरराष्ट्रीय गोष्टी होत्या त्यांतल्या पुष्कळशा गांधीजींना समजावून दिल्यावर पटल्या, ही आमची चर्चा झाल्यानंतर गांधीजींनी जे लेख लिहिले त्यांचा सूर बदलला होता व त्यातून त्यांनी या आंतरराष्ट्रीय गोष्टींवर भर देऊन जगाच्या पार्श्वभूमीच्या दृष्टीने हिंदुस्थानच्या प्रश्नाचा विचार केला होता.  पण त्यांची मूळ भूमिका कायम होती; ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या राज्यकारभारात चालवलेले धोरण एकतंत्री व दडपशाहीचे होते.  त्या धोरणापुढे नमते घेऊन स्वस्थ बसण्याला गांधीजींचा विरोध व या ब्रिटिश धोरणाला उघड आव्हान देण्याकरिता काही तरी केले पाहिजे ही त्यांची तळमळ कायमच होती.  गांधीजींचे मत असे होते की, या वेळी आपण नमते घेऊन स्वस्थ बसलो तर देशाचा तेजोभंग होईल आणि या युध्दाचे रूप कसेही पालटले व शेवट काहीही झाला तरी हिंदुस्थानातल्या जनतेला लाचारीने वागण्याची संवय जडून त्यांचे स्वातंत्र्य फार काळ दुरावेल.  ही लाचार वृत्ती आली की युध्दात केव्हा किरकोळ अपयश आले किंवा माघार घ्यावी लागली की नेटाने प्रतिकार चालविण्याऐवजी एकदम मान टाकून देण्याची प्रवृत्ती येईल, कोणतेही परचक्र आले की निमूटपणे शरण जाण्याची संवय होऊन बसेल.  गांधीजींच्या मते, आज निमूटपणे स्वस्थ राहणे याचा अर्थ लोकांचा संपूर्ण नैतिक अध:पात करणे, गेली पंचवीस वर्षे स्वातंत्र्याकरिता सतत झगडत राहिल्यामुळे जनतेच्या अंगी जे सामर्थ्य आले होते ते सर्वस्वी गमावून बसणे.  त्याचा आणखी अर्थ असा की, हिंदुस्थान स्वातंत्र्याची मागणी करते आहे या गोष्टीचा जगाला विसर पडेल व युध्द संपल्यावर जे काही तहनामे होतील, जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था ठरेल त्यात जुन्या साम्राज्यशाही वृत्तीचा व महत्त्वाकांक्षेचा वरपगडा राहील.  गांधीजींना हिंदी स्वातंत्र्याची तळमळ तर होतीच, पण हिंदुस्थान म्हणजे आपली प्रिय मातृभूमी एवढीच तिची कल्पना त्यांच्या दृष्टीसमोर नव्हती.  त्यांच्या दृष्टीने हिंदुस्थान म्हणजे जगातल्या साम्राज्यशाहीच्या सगळ्या वसाहती राज्यांचे, सार्‍या नागावलेल्या दीन दलित देशांचे, प्रतीक होते.  कोठल्याही जागतिक धोरणाच्या भलेबुरेपणाची खरी कसोटी म्हणजे त्या धोरणामुळे हिंदुस्थानचे काय होणार, ही आहे.  हिंदुस्थानची परवशता अशीच कायम राहिलीतर जगातले साम्राज्यशाहीखाली गेलेले देश, जगातली सारी परतंत्र राष्ट्रे यांची हल्ली आहे ती स्थिती पुढेही कायम राहणार, जगात एवढे मोठे घनघोर युध्द होऊन गेले तरी ते सारे फुकटच गेले.  या महायुध्दाचे सारे नैतिक अधिष्ठान बदलून टाकले पाहिजे.  युध्दात पडलेल्या देशांची सैन्ये, आरमार, विमानदले, आपापल्या विवक्षित क्षेत्रात आपापली कामगिरी बजावतील व ज्यांची हिंसापध्दती अधिक प्रभावी असेल त्यांचा जयही होईल, पण जय मिळविण्याचा उद्देश काय?  पुढे काय ?  आणि शस्त्रास्त्रांनी लढू म्हटले तरी हातातल्या शस्त्राला देखील आपला सत्पक्ष आहे अशा मनातल्या भावनेचा आधार असल्याखेरीज जोर चढत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel