तो उद्योग करायचा सोडून अंतिम गूढाच्या शोधाचे वेड घेऊन बसणे अवश्य आहे किंवा योग्य आहे असे दिसत नाही. अंतिम गूढाचा शोध लावण्याचा मानवी मनाला लागलेला छंद तूर्त बाजूला ठेवला तरी त्या मनाला गुंतवून ठेवायला जीवनातील रमणीयता आपल्या पुढे उभी आहे. एवढेच नव्हे तर वाटेवर चमत्कारामागून आढळणारी, पदोपदी संकटे येणारी, नवेनवे शोध अखंड लावीत जाण्याची यात्रा त्याकरिता करण्याजोगी आहे. या शोधयात्रेच्या वाटेवर नवी नवी विशाल व भव्य विहंगमदृश्ये डोळ्यासमोरून सरकत जातील, जीवनाला अधिक विविधता आणणारे, जीवन अधिक संपूर्ण करणारे नवेनवे जीवनाचे प्रकार माहीत होतील त्यांचे ज्ञान अवगत करण्याचे काम मनाला लागेलच.
म्हणून विज्ञानशास्त्राची वृत्ती व दृष्टिकोन यांना तत्वज्ञानाची जोड देऊन व विज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या क्षेत्रापलीकडच्या अज्ञातावर श्रध्दा ठेवून आपण जीवनाभिमुख व्हायला सिध्द झाले पाहिजे. आपल्या विशाल विस्ताराने भूतकाल व वर्तमानकाल व्यापीत असलेल्या ह्या जीवनाचे, त्याच्या कधी उच्च तर कधी नीच अशा सर्व अवस्था दाखविणारे, असे एक अखंड सत्य कल्पनाचित्र आपल्या आपल्या मनश्चक्षूं पुढे आपल्याला या साधनांच्या साहाय्याने व या मार्गाने चालले तर आणता येईल, आणि शांत व प्रसन्न मनाने आपल्याला भविष्यकाळाकडे दृष्टी वळवता येईल. या चित्रात जीवनाच्या नीचावस्थाही येणारच, त्यांच्याकडे डोळेझाक करुन काही उपयोग नाही. आपल्या भोवतालच्या जगातल्या रमणीयतेच्या शेजारी खेटूनच जगातले दु:खदैन्यही सतत बसलेले आहे. मानवी जीवनयात्रा मोठी विचित्र आहे, तिच्यात सुख आहे, दु:ख आहे, आणि ही सरमिसळ असली तरच त्या अनुभवाने त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याची प्रगती होते जिवाच्या यातना भोगताना जीव आपल्या ठायीच कष्टी होतो, त्याच्या त्यालाच त्या भोगाव्या लागतात. आपल्या भोवतालच्या जगात जे काही घडेल ते व त्याचे परिणाम आपल्याला भोवतातच, पण त्याहीपेक्षा आपल्याच मनात आपण ज्या शंकाकुशंका घेत बसतो, आपल्याच अंतर्यामी विरुध्द विचारांची जी ओढाताण चालते त्यांचा त्रास मनाला अधिक होतो. आपले अस्तित्व कायम राखण्याकरिता बाह्य परिस्थितीशी झगडत राहून आपली प्रगती करीत राहणे मानवाला भाग आहे, पण त्याबरोबरच त्याला त्याच्या अंतर्यामी चाललेली ही बंडाळी मोडून मन:शांती मिळविली पाहिजे आणि बाह्य परिस्थितीशी आपला मेळ बसवला पाहिजे. ही अंतर्बाह्य शांतता त्याला साधली म्हणजे त्याच्या अधिभौतिक जीवनाला येणारी उणीव दूर होऊन तो समाधान पावतो. एवढेच नव्हे तर मानवाला प्राणिसृष्टीत थोरवी प्राप्त करून देणार्या विचाराच्या आणि कृतीच्या क्षेत्रात मानवाने आपल्या कष्टमय जीवनयात्रेला आरंभ केल्यापासून त्याच्या अंतर्यामी त्याच्या कल्पनाशक्तीमुळे उद्भवलेल्या आकांक्षा व त्याची साहसप्रवृत्ती यांचेही समाधान होते. या प्रवासाचे काही अंतिम साध्य आहे की नाही याचे ज्ञान मानवाला झालेले नाही, तत: किम् हा त्याला पडलेला प्रश्न आहेच, पण ह्या प्रवासात कष्टाबरोबर सुखही आहे, साधण्यासारखी अशी अनेक साध्ये वाटेने दृष्टीने पडतात, आणि एक साधले की तेथून दुसर्या साध्याकडे नव्याने त्याची प्रगती चालू राहते.
पाश्चात्त्य जगावर विज्ञानशास्त्राची मोठी छाप बसली आहे आणि तिकडे प्रत्येकजण त्या शास्त्राचे वर्चस्व मान्य करीत असतो, पण खरी विज्ञानशास्त्रीय वृत्ती त्यांच्या अंगी अद्यापही आलेली नाही. तिच्यात खूपच कमतरता आहे. आधिभौतिक व अध्यात्म यांचे एकमेकांशी सहकार्य होऊन त्यातून काही नवनिर्मिती व्हावी असा त्यांचा मेळ, पाश्चात्त्य जगाला अद्यापही बसविता आला नाही. तसा मेळ हिंदुस्थानात बसवायला आपल्याला अद्याप खूपच अंतर तोडावयाचे आहे. हे अनेक बाबतीत स्पष्टच दिसते. पण तसे पाहू गेले तर त्या वाटेवर त्यांच्यापेक्षा आपल्याला अडचणी कमीही निघतील, कारण भारतातील विचार वंतांच्या विचारसरणीचे व्यवहारातले रूप पुढे पुढे कितीही वेगळे दिसत असले तरी अतिप्राचीनकालापासून युगानुयुगे आतापावेतो भारतीय विचारसरणी विज्ञानशास्त्राच्या पध्दतीशी व वृत्तीशी, आणि सर्व राष्ट्रांत ऐक्य नांदाचे या मताशी जुळती आहे, मुळात तिचा पाया तसाच घातलेला आहे. अभयवृत्तीने सत्त्याचा शोध करीत राहावे, सर्व मानवजात एक आहे अशी 'वसुधैव कुटुंबकम्' वृत्ती ठेवावी, माणसातच नव्हे तर सर्वांभूती दैवी अंश आहे ही जाणीव असावी, आणि व्यक्तींचा व वर्गांचा त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे व एकमेकांशी सहकार्य करीत राहून विकास होत जावा, उत्तरोत्तर मानवाला अधिक स्वातंत्र्य मिळत जावे व त्याची उन्नती अधिकाधिक होत जावी, अशा तत्त्वांच्या आधारानेच भारतीय विचारसरणी चालत आली आहे.